Home » जागतिक क्षयरोग दिवस – आव्हान टीबी मुक्तीचं 

जागतिक क्षयरोग दिवस – आव्हान टीबी मुक्तीचं 

by Team Gajawaja
0 comment
World TB Day
Share

क्षयरोग म्हणजे टीबी (ट्यूबरक्युलॉसिस) या आजाराने होणारे मृत्यू रोखण्याचं आव्हान पेलण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस (World TB Day) म्हणून साजरा करते. यंदा ‘इनव्हेस्ट टू एंड टीबी – सेव्ह लाईव्ह्ज’ या मध्यवर्ती संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्याचं आवाहन डब्ल्यूएचओ कडून करण्यात आलं आहे. 

टीबी हा आजार होण्यासाठी कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया आपल्यापैकी अनेकांच्या शरिरात असतात. पण म्हणून आपल्या सगळ्यांना टीबी होतोच असं नाही. टीबी होतो तेव्हा मात्र ते काळजीचं कारण ठरतं. 

टीबी हा दीर्घकाळ चालणारा आजार आहे. त्यावर उपचारही दीर्घकाळापर्यंत घ्यावे लागतात. उपचारांदरम्यान झालेला थोडासा हलगर्जीपणाही पेशंटची तब्येत ढासळवण्यास पुरेसा ठरतो. त्यामुळे टीबी या आजाराबद्दल, “तो कधीही बरा न होणारा आजार आहे”, असा गैरसमजही आहे. पण नियमित आणि शिस्तशीर औषधोपचारांनी टीबी पूर्णपणे बरा होतो, हे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी लक्षात ठेवायला हवं. 

डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार जगाच्या पाठीवर दररोज २८,००० माणसांना टीबीचा संसर्ग होतो. दररोज सुमारे ४००० माणसं टीबीने दगावतात. टीबी झालेल्या जगातील लोकसंख्येच्या २६ टक्के लोकसंख्या ही भारतात आहे. (World TB Day)

मलेरिया, एड्स या आजारांनी होणाऱ्या मृत्यूसंख्येच्या तुलनेत टीबीने होणारे मृत्यूही अधिक आहेत. सन २००० पासून डब्ल्यूएचओने टीबी निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. कोविड काळात हे प्रयत्न जवळजवळ निष्फळ ठरावेत एवढ्या प्रमाणात टीबी निदान आणि निर्मुलनाकडे दुर्लक्ष झालं. काही प्रमाणात हे स्वाभाविक होतं. 

पल्मनरी म्हणजे श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा आणि श्वसनसंस्थेबरोबर संपूर्ण प्रकृतीवर परिणाम करणारा असे टीबीचे प्रमुख प्रकार आहेत. त्याबरोबरच दुर्मिळ गटात मोडणारे डोळ्यांचा, त्वचेचा टीबी असे प्रकारही आहेत. मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारा ‘लिंफ नोड टीबी’ हाही एक प्रकार टीबीमध्ये दिसून येतो. (World TB Day)

====

हे देखील वाचा: ‘या’ शाकाहारी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला कुठल्याही प्रोटीन पावडरची गरज नाही

====

लहान मुलांमध्ये टीबीचं प्रमाण लक्षणीय आहे. कोविड काळात मुलांमधल्या टीबीचं निदान काहीसं दुर्लक्षित राहिल्यामुळे येत्या काळात मुलांच्या प्रकृतीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खोकला हे टीबी या आजाराचं मुख्य लक्षण आहे. साधारण दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस खोकला बरा होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. खोकल्याबरोबरच रात्री भरणारा ताप, थकवा असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

अचानक वजनाचा काटा घट दाखवत असेल तर त्याकडेही धोक्याची घंटा म्हणून बघायला हवं. सिगरेट, अल्कोहोल या व्यसनांमध्ये गुरफटलेल्या व्यक्तींनी टीबीची कुठलीही लक्षणं दिसत असल्यास तातडीनं त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

====

हे देखील वाचा: घरी बसून जाणून घ्या तुम्ही रोगी आहात की निरोगी! करा फक्त ‘या’ तीन गोष्टी…

====

जीवनशैली हा अलिकडे सगळ्याच बाबतीत परवलीचा शब्द झालाय. टीबी सारखे आजार होणं आणि ते बरे होणं यातही लाईफस्टाईल महत्त्वाची भूमिका बजावते. चांगला आहार, व्यायाम, व्यसनांपासून दूर राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमित औषधं घेणं या गोष्टी टीबीच्या पेशंटला ठणठणीत बरं व्हायला मदत करु शकतात (World TB Day). 

थोडक्यात, टीबी गंभीर आजार असला तरी त्यातून पेशंट नक्की बरा होतो, हे जागतिक टीबी दिवसाच्या निमित्तानं अधोरेखित करण्याची गरज आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.