जपान या देशात सर्वात जास्त भूकंप होतात. मात्र गेल्या काही महिन्यात या भूकंपाचे प्रमाण जेवढे वाढले आहे, तेवढीच त्या भूकंपाची तीव्रताही वाढल्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरात जपानच्या दोन मुख्य शहरांमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवल्यानं अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. (Earthquake)

आओमोरीजवळ ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर ९०,००० लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यानंतर होक्काइडो आणि तोहोकू प्रदेशात ६.७ रिश्टर स्केलचे भूकंप झाले. यामुळे जपानच्या हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये भूकंप होणे हे सामान्य मानले जाते. जपानमध्ये वारंवार भूकंप होण्याचे मुख्य कारण म्हणजे हा देश “रिंग ऑफ फायर” नावाच्या अत्यंत सक्रिय भूकंपीय क्षेत्रात स्थित आहे. येथे पॅसिफिक, फिलीपीन, युरेशियन आणि उत्तर अमेरिकन या चार प्रमुख टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांखाली आदळतात आणि सरकतात. यामुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते आणि भूकंप होतात. या सर्व भौगोलिक परिस्थितीमुळे जपानची घरे ही भूकंपांचे धक्के सहन करु शकतील, अशी तयार करण्यात येतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून या भूकंपाची तीव्रता वाढल्यानं या घरानांही तडे बसू लागले आहेत. (International News)
काही भागातील इमारती या भूकंपाच्या धक्क्यानं कोसळल्या आहेत. त्यामुळे या सर्व भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावऱण तयार झाले आहे. त्यातच काही तज्ञांनी जपानच्या उत्तर किनाऱ्यावर पुढील काही दिवसांमध्ये मेगा भूकंप येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे जपानच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जपानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण वाढले आहे. या भूकंपाचा अभ्यास करणा-या हवामानशास्त्र संस्थेनं जपानच्या उत्तर किना-यावर ८ हून अधिक क्षमतेचा भूकंप केव्हाही होण्याची भीती व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात याच भागात ७.५ तीव्रतेचा भूकंप आल्यानंतरही या भागात लहान भूकंपाचे धक्के जाणवत होते. त्यानंतर जपानच्या हवामानशास्त्र संस्थेचे विशेष पथक या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी दाखल झाले. (Earthquake)
या भूकंपाचे केंद्र आओमोरीच्या पॅसिफिक किनाऱ्यापासून ५४ किलोमीटर खोलवर होते. या सर्व भागाची पाहणी केल्यावर उत्तर पॅसिफिक किनाऱ्यावर ८ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा धोका सामान्यपेक्षा जास्त असल्याचे या पथकानं स्पष्ट केले आहे. मेगाकंप हा रिश्टर स्केलवर ८.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप आहे. हे भूकंप दुर्मिळ आहेत परंतु विनाशकारी ठरतील. अशा भूकंपाना विनाशकारी भूकंप म्हटले जाते. यामुळे घरांची पडझड, इमारती कोसळणे आणि मोठ्या त्सुनामी लाटा येऊ शकतात. अशा विनाशकारी भूकंपामुळे ३० मीटर उंचीपर्यंत त्सुनामी येऊ शकते. यामुळे लाखो पायाभूत सुविधा नष्ट होऊ शकतात आणि मोजता येणार नाही, असे आर्थिक नुकसान होऊ शकते. (International News)

जपान हा भूकंपप्रवण क्षेत्रात असलेला देश आहे. या भूकंपापासून बचाव करण्यासाठी येथील सर्व साधनसामुग्री तयार करण्यात आली आहे. अगदी येथील इमारत बांधणीमध्येही वजनाला हलक्या असलेल्या साधनांचा वापर करण्यात येतो. तसेच भूकंप झाल्यास स्वतःचा जीव कसा वाचवायचा, याचे प्रशिक्षण येथील शाळांमध्ये दिले जाते. त्यामुळेच जपानी नागरिक भूकंपाचा धक्का जाणवला तरी घाबरत नाहीत. मात्र आता हेच जपानी नागरिक भूकंपाची तीव्रता हळूहळू वाढत असल्यानं घाबरत आहेत. यासर्वांसाठी जपानची भौगोलिक रचना कशी आहे, हे पहाणेही गरजेचे आहे. जपान एका मोठ्या सबडक्शन झोनच्या वर आहे जिथे पॅसिफिक प्लेट जपान आणि कुरिल खंदकांसह उत्तर अमेरिकन आणि ओखोत्स्क प्लेट्सच्या खाली उपसर्ग करते. यामुळे मोठ्या प्रमाणात ताण जमा होतो जो कधीकधी मेगाथ्रस्ट भूकंपांच्या स्वरूपात सोडला जातो. (Earthquake)
=======
हे देखील वाचा : Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !
=======
यामुळेच येथे मोठे भूकंपाचे धक्के बसतात. हे धक्के कधीतरी विनाशकारी स्वरुपाचेही असतात. असाच २०११ मधील जपानच्या तोहोकू येथील ९.० तीव्रतेचा भूकंप विनाशकारी ठरला आहे. यामुळे त्सुनामी आली. त्यात २०,००० लोकांचा मृत्यू झाला, तर फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले होते. या भूकंपानंतर जपानमधील घरबांधणीवर नव्यानं अभ्यास करण्यात आला, आणि अधिक प्रगतपणे घरे बनवण्यात आली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या भूकंपामध्ये या प्रगत घरांमध्येही भेगा पडल्या. मोठा भूकंप झाल्यावरही अनेक लहान भूकंपाच्या धक्क्यांची जाणीव होत आहे. या सर्व बदलांमुळे येथील शास्त्रज्ञ चिंता व्यक्त करीत असून ही भविष्यातील अधिक विनाशकारी भूकंपाची चाहूल असल्याची भीती त्यांना आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
