”भाजपला सत्तावंचित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीत बिकट पेचप्रसंग निर्माण करण्याची भाजपतर्फे एकही संधी सोडली जात नाही. याबाबतीत विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘माहीर’ आहेत. आपण ‘फडणवीस’ आहोत आणि आपल्या अंगात ‘नाना’ कळा आहेत, हे ते वारंवार दाखवून देत असतात.
मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे एक नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे एका खासगी कारणानिमित्त औरंगाबादचे ‘एमआयएम’चे (मुस्लिम इत्तेहादुल मजलिस) खासदार इम्तियाज जलील यांना भेटावयास जातात काय आणि त्या भेटीत इम्तियाज जलील राजेश टोपे यांच्याजवळ महाविकास आघाडीत ‘एमआयएम’ही येण्यास उत्सुक आहे अशी इच्छा व्यक्त करतात काय? आणि तसा प्रस्तावही देतात काय? आणि याची ‘कुणकुण’ लागताच देवेंद्र फडणवीस लगेच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी आपला ‘तोफखाना’ सज्ज ठेवतात काय? हे सारेच अगम्य आणि अतर्क्य आहे. अर्थात हल्लीचे राजकारण एवढे ‘गतिमान’ झाले आहे की, काहीही घडू शकते यावर आता जनतेचा चांगलाच विश्वास बसत चालला आहे.
महाविकास आघाडीत येण्याचा ‘एमआयएम’चा हा प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार का? असा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’, शिवसेना म्हणजे ‘मजलिस सेना’ असा उल्लेख करीत शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले.
अर्थात शिवसेनापक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी त्वरेने ‘एमआयएम’ चा हा प्रस्ताव आपण धुडकावत असल्याचे जाहीर केले, हे जरे खरे असले तरी या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात जो गदारोळ उडणार होता तो उडालाच.
‘एमआयएम’चा हा प्रस्ताव फेटाळताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ‘ठाकरी’ भाषेतच समाचार घेतला. त्यांनीही, ‘एमआयएम’ ही भाजपाची ‘बी टीम’ आहे, असे सांगताना, भाजप म्हणजे ‘हिजबुल सेना’, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामागे भाजप आता ‘खान’ लावणार का? असा उलटा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिले आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
त्यानंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी देखील ‘एमआयएम’ चा हा प्रस्ताव निरर्थक असल्याचे सांगून यामुळे राजकारणात उठलेल्या वादळाला थोपवून धरण्याचा प्रयत्न केला.
मात्र पवार यांनी हा खुलासा करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीच याबाबत उलटसुलट विधाने करून संभ्रम निर्माण केला होता. शरद पवार यांच्या खुलाशाने हा संभ्रम दूर झाला असला तरी ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी, आपण यापुढेही महाविकास आघाडीत येण्याचे प्रयत्न चालूच ठेवणार, असे सांगून हा संभ्रम कायम ठेवण्याचा प्रयास चालू केला आहे. त्यादृष्टीने आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वास्तविक भाजप आणि ‘एमआयएम’ यांच्यात छुपी युती असल्यामुळे ‘एमआयएम’ ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा विरोधकांकडून आरोप केला जातो. त्यामध्ये बरचसे तथ्य आहे. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतरही आले. समाजवादी पार्टीला मुस्लिमांची जास्त मते मिळू नयेत म्हणून भाजपच्या सांगण्यावरूनच ‘एमआयएम’ने अनेक मुस्लिमबहुल मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला.
====
हे देखील वाचा: AIMIM Offer To NCP: एमआयमकडून राष्ट्रवादी काॅंग्रेसला ऑफर, राज्याच्या राजकारणात नवीन चर्चा
====
सुमारे ऐंशी मतदारसंघात सपाच्या उमेदवारांचा अतिशय थोड्या मतांनी पराभव झाला. निवडणुकीदरम्यान ‘एमआयएम’चे नेते ओवेसी यांच्यावर झालेला गोळीबार देखील असाच संशयास्पद होता, असे बोलले जाते. मात्र गोळीबाराच्या घटनेमुळे अपेक्षित तो परिणाम साधला गेला हे मात्र सत्य आहे.
दीड -दोन वर्षांपूर्वी बिहार विधानसभेच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील ‘एमआयएम’ ची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडून नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पुन्हा सत्तारूढ करण्यात भाजपाला यश आले.
राजकारणात एरवी कट्टर शत्रू असलेला कसा ‘मित्र’ होऊ शकतो याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेचप्रसंग उभा करण्यासाठी ‘एमआयएम’ चा वापर करण्यात आला असावा आणि त्यानुसार ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला असावा, असे दिसते.
====
हे देखील वाचा: ‘शिमगा’ संपला तरी राजकीय ‘बोंबा’ चालूच राहणार?
====
राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यात औरंगाबाद येथे झालेल्या प्रस्तावासंदर्भातील चर्चा लगेच देवेंद्र फडणवीस यांना कशी कळते आणि त्यावर ते तातडीने आपली सविस्तर प्रतिक्रिया कशी काय देतात हाही संशोधनाचा विषय ठरावा.
थोडक्यात सांगायचे तर, पाच राज्यांतील भाजपच्या नेत्रदीपक विजयानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याच्या हेतूने भाजपच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा जोर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना आघाडी सरकार वाचविण्यासाठी कशा प्रकारच्या कसरती कराव्या लागणार आहेत हेही नजीकच्या काळात दिसून येणार आहे.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)