प्रिन्स जॉर्ज
सेलिब्रिटी म्हणजे काय… हे कळत देखिल नाही त्या वयात तो सेलेब्रिटी झालाय… वय तरी किती त्याचं… अवघं सात…. तो जन्माला आला… किंबहुना त्याच्या जन्माची चाहूल लागल्यापासून तो सेलेब्रिटी झालाय… हा आहे ब्रिटनचा राजकुमार… जॉर्ज ॲलेक्झाडर लुई… म्हणजेच प्रिंन्स जॉर्ज ऑफ केंब्रिज…. प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट यांचा मोठा मुलगा… ब्रिटनच्या राजघराण्याचा सदस्य असलेला हा ज्युनिअर प्रिन्स सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
22 जुलै रोजी जॉर्ज याचा वाढदिवस… प्रिन्स आता सात वर्षाचा होतोय. दरवर्षी या राजकुमाराचा वाढदिवस राजघराण्याच्या परंपरा नुसार साजरा होत असे. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसनं त्याला ब्रेक लावला आहे. असे असले तरी प्रिंन्स जॉर्जचे गेल्या वाढदिवसाचे, म्हणजेच तो सहा वर्षाचा असतांनाचे फोटो व्हायरल होत आहेत. फुटबॉल जर्सीमध्ये असलेले जॉर्जचे फोटो सध्या चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
ब्रिटीश राजघराण्याच्या गादीवर तिसर्या क्रमांकाचा वारसदार असलेला प्रिंन्स जॉर्ज सर्वाधिक लोकप्रिय आहे. भावी राजा म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. त्याचा जन्म झाला तेव्हा ब्रिटनबरोबरच, न्युझिलंड, कॅनडा आदी देशात जॉर्जला एकवीस तोफांची सलामी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी तर पार्लमेंट हाऊस, कॅनबेरा येथून भविष्यवाणी केली की, जॉर्जचे एक दिवस ऑस्ट्रेलियात राजा म्हणून स्वागत होईल. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रिन्स जॉर्ज यांची भेट तर चांगलीच गाजली होती. ब्रिटनच्या राजवाड्यात सकाळी आलेल्या बराक ओबामा यांना भेटायला जॉर्ज थेट ड्रेसिंग गाऊन घालूनच बाहेर आला होता. बराक ओबामा प्रिंन्ससाठी बोलतांना खाली बसले होते, हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. अर्थात त्यानंतर जॉर्जनं घातलेल्या ड्रेसिंग गाऊन सारख्या गाऊनची लंडनमध्ये विक्री वाढल्याचे सांगण्यात आले….
तीन वर्षापूर्वी प्रिंन्स जॉर्ज ब्रिटीश राजघराण्याची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेस्टकार मोंटेसरी स्कूलमध्ये दाखल झाला. प्रिन्स विल्यमचा हात धरुन शाळेत जाणारा ज्युनिअर प्रिंन्स तेव्हा सगळ्यानाच भावला होता. न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर जेव्हा हा ज्युनिअर प्रिंन्स गेला, तेव्हा त्याने घातलेल्या कपडंयासारखेच कपडे आपल्या मुलांसाठी अनेक पालकांनी घेतले होते.
आता हा ज्युनिअर राजकुमार सात वर्षाचा होतोय. मे महिन्यात त्याची बहिण शार्लेट पाच वर्षांची झाली. लॉकडाऊनमुळे या बहिण भावाचा वाढदिवस राजघराण्याच्या परंपरानुसार साजरा झाला नाही. गेल्या वर्षी जॉर्जचा फुटबॉल टीमचा लोगो असलेल्या टीशर्टवरील फोटो राजघराण्याने इंस्टाग्रामवर शेअर केलं होतं. दात पडलेल्या आणि हस-या जॉर्जच्या या फोटोला तेव्हा लाखो लाईक मिळाले होते. यावर्षी या राजकुमाराचा कुठला नवा लूक राजघराणं जाहीर करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागले आहे.
सई बने