Home » अयोध्येत राममंदिर तर बांधून झालं, पण मशिदीचं बांधकामाचं काय?

अयोध्येत राममंदिर तर बांधून झालं, पण मशिदीचं बांधकामाचं काय?

by Team Gajawaja
0 comment
Ram Mandir and Mosque
Share

अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचं संपूर्ण बांधकाम अखेर पूर्ण झालं आहे. दहा दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करून राम मंदिराचं काम पूर्ण झालं. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार आता मुख्य मंदिराचं काम पूर्ण झालं आहे. सोबतच मंदिराची सीमा भिंत आणि सभागृहाचं लँडस्केपिंग आणि बांधकाम २०२६ पर्यंत पूर्ण होईल. बांधकाम लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आलं आहे. आता राम लल्लाच्या मंदिराचं संपूर्ण दर्शन भाविकांना घेता येणार आहे. (Ram Mandir and Mosque)

मात्र सोबतच एक गोष्ट कायम लक्षात राहते, ती म्हणजे शेकडो वर्षे चाललेल्या राम मंदिर बाबरी मस्जिद वादात दिलेला सुप्रीम कोर्टाचा निकाल. सुप्रीम कोर्टाने विवादित जागेवर राम मंदिरच होणार असा निकाल दिला होता. मात्र सोबतच या जागेवर जी मस्जिद होती, त्यासाठीही एक महत्त्वाची तरतूद सुप्रीम कोर्टाने केली होती. २०१९ मध्ये वादग्रस्त अयोध्याची जागा हिंदू पक्षाला देताना सर्वोच्च न्यायालयाने नवीन मशिदीसाठी अयोध्यामध्ये ५ एकर जमीन ‘योग्य आणि मुख्य ठिकाणी’ देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आता या ठिकाणी मशीद उभारली गेली आहे का? ही मशीद उभारणं सुरू होणार आहे का? तर सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या निर्णयातच मशिदीसाठीही जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने २०२० मध्ये राज्याच्या सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला धनीपूरमधील जमीन दिली होती. (Social News)

याच ट्रस्टने पुढे मशिदीच्या बांधकामाच्या उद्देशाने इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली. आता हेच फाउंडेशन, ज्याला अयोध्येतील धन्नीपूर गावात मशीद बांधण्यासाठी ५ एकरचा भूखंड देण्यात आला आहे, हे अजूनही मशिदीच्या प्लॅनिंगवरच अडकले आहेत. त्यामुळे अजूनही मशिदीचं काम पुढे सरकलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे याआधीही मशिदीचं एक डिझाइन पुढे आलं होतं. २०२१ मध्ये अनावरण झालेल्या मशिदीच्या आधीच्या डिझाइनला ‘अत्यंत आधुनिक’ आणि ‘मॉडर्न’ म्हणून पाहिलं गेलं, ज्यामध्ये काचेचा घुमट होता. मात्र हे डिझाइन लोकांच्या पसंतीस उतरलं नाही. अशावेळी मग लोकवर्गणीतूनच मशीद बांधावी लागणार असल्याने पुन्हा एकदा मशिदीसाठी डिझाइन बनवण्यात आलं आहे. (Ram Mandir and Mosque)

आता ही नवीन डिझाइन अधिक पारंपरिक शैलीत आहे, ज्यामध्ये पाच मिनार आणि पारंपरिक घुमट रचना आहेत. या मशिदीतील पाच मिनार हे इस्लामच्या पाच मुख्य तत्त्वांचं प्रतिनिधित्व करतील – कलिमा, नमाज, रोजा, जकात आणि हज. महत्त्वाचं म्हणजे मशिदीच्या प्रार्थना कक्षात एकाच वेळी ९,००० लोकांसाठी जागा असेल, ज्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीनंतर जिथे २५,००० लोक सामावू शकतात.  त्यानंतरची ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्रार्थनेची जागा असेल. सोबतच देणगीदारांना, विशेषतः बाहेरील देणगीदारांना आकर्षित करण्यासाठी, मशिद फाउंडेशन रुग्णालय, सामुदायिक स्वयंपाकघर आणि संग्रहालय या गोष्टीही हायलाइट करत आहे. या मशिदीच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मशिदीचं नाव बाबरच्या नावावर ठेवण्यात येणार नसून, मोहम्मद पैगंबरांच्या वडिलांच्या नावावरून या मशिदीचं नाव “मुहम्मद बिन अब्दुल्ला मशीद” असं ठेवलं जाणार आहे. (Social News)

मशिदीच्या बांधकामाला उशीर होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे देणग्यांचा अभाव. राम मंदिर असो किंवा मशीद दोन्ही बांधकामं लोकवर्गणीतूनच होणार आहेत. सरकारी पैशातून या दोन्ही प्रार्थना स्थळांचं बांधकाम होऊ शकत नाही. राम मंदिरासाठी तब्बल ३००० कोटी रुपये देणगी स्वरूपात जमा झाले होते, ज्यातील १८०० कोटी रुपये बांधकामावर खर्च झाले. आता या मशिदीच्या ट्रस्टलाही तसाच मोठा निधी गोळा करावा लागत आहे. त्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या वेबसाइटवर देणग्या मागवण्यात येत आहेत. (Ram Mandir and Mosque)

========

हे देखील वाचा : Datta Mandir : ‘प्रति गाणगापूर’ अशी ओळख असलेले नाशिकचे एकमुखी दत्त मंदिर

========

“तुमच्या उदार देणग्यांद्वारे मुहम्मद बिन अब्दुल्लाह मशिदीच्या बांधकामाला पाठिंबा द्या. हा प्रकल्प दुवा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी एक पवित्र जागा निर्माण करेल. येणाऱ्या पिढ्यांसाठी समुदायांची सेवा करेल. तुमचं योगदान केवळ मशीद बांधण्यासाठी नाही, तर करुणा, ऐक्य आणि सेवेचं केंद्र निर्माण करण्यासाठी आहे, ज्याचा आज आणि भविष्यात समाजाला फायदा होईल.” असा मजकूर मशिदीच्या वेबसाइटवर दिला आहे. जर वेळेत देणग्या मिळाल्या, तर २०२६ मध्ये मशिदीच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती मिळते. थोडक्यात, राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आहे, पण त्याचवेळी मशिदीचं बांधकाम मात्र अजून सुरू झालेलं नाही. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.