Home » Japan : १८ तास काम करणा-या जपानच्या पंतप्रधान आणि वाद !

Japan : १८ तास काम करणा-या जपानच्या पंतप्रधान आणि वाद !

by Team Gajawaja
0 comment
Japan
Share

जपानच्या नव्या पंतप्रधान शानाए ताकाची यांच्या कामाची पद्धत पाहून जपानमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. जपानच्या नवनियुक्त पंतप्रधान ताकाची या पहाटे ३ वाजल्यापासून कामाला लागतात. त्यांच्या कामाचा हा झपाटा जपानच्या विकासाला पुरक असला तरी, त्यांच्यासोबत काम करणा-या कर्मचा-यांच्या आरोग्याला मात्र हानिकारक असल्याची ओरड सुरु झाली आहे. जपानच्या नवनियुक्त पंतप्रधान शानाए ताकाची यांनी अर्थसंकल्प समितीची बैठक चक्क पहाटे ३ वाजता आयोजित केली. ताकाची यांच्या या निर्णयामुळे जपानमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. शानाए यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यावरच त्यांनी देशाच्या विकासासाठी २४ तास काम करण्याची गरज आहे, असे सांगितले होते. जपानचा विकासदर पाहता ताकाची यांनी देशाच्या नागरिकांनी पुन्हा आपल्या देशासाठी मोठे योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले होते. (Japan)

फक्त देशातील नागरिकांना असे आवाहन करुन ताकाची शांत राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःपासून हा पायंडा पाडला आहे. सध्या जपानमध्ये या नवनियुक्त पंतप्रधान ताकाची यांची कार्यपद्धती चर्चेच विष्य ठरली आहे. ताकाची या सलग १७ ते १८ तास काम करत आहेत. पहाटे ३ वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरु होतो. त्यामुळे मंत्रीमंडळाची बैठक ठेवायची असेल, तरीही त्यांना ही पहाटे ३ ची वेळ य़ोग्य वाटते. यानंतर मात्र जपानमध्ये या सर्वात आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याबाबत काय करायचे, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. वास्तविक जपान हा देश त्याच्या कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धाचा जपानला जबरदस्त फटका बसला. त्यात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यांनी या देशातील मनुष्यबळ मोठ्याप्रमाणात कमी झाले. अशा परिस्थितीत देश उभा करण्याचे आव्हान प्रत्येक जपानी माणसांनी स्विकारले. यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन पाळण्यात आले नाही. (International News)

मात्र या सर्वांचे काही वर्षानंतर विपरीत परिणाम तेथील नागरिकांवर होऊ लागले. जलद आर्थिक वाढीसाठी झटणा-या नागरिकांच्या शरीरावर आणि मनावर कामाचा ताण इतका वाढला की, हृदयविकार आणि तणावामुळे अनेक नागरिकांच्या मृत्यूची शृंखलाच सुरु झाली. सुरुवातीला हा कुठला रोग आहे का, अशी धास्ती वाटली. मात्र तज्ञांनी या मृत्युचे कारण स्पष्ट केल्यावर याला कारोशी असे म्हटले जाऊ लागले. करोशी या शब्दाचा अर्थ आहे, अतिकामामुळे होणारा मृत्यू. त्यानंतर जपानमध्ये असे करोशीनं होणारे मृत्यू हे सर्वसामान्य घटना झाली. अनेक तरुणांनीही यात आपला जीव गमावला. त्यामुळे जपान सरकारनं यासंदर्भात काही नियमावली तयार केली. तोपर्यंत जपान देशानं दुस-या महायुद्धात गमावलेलं वैभव पुन्हा मेहनतीनं कमावलं होतं. त्यामुळे सरकारनं ओव्हरटाईम मर्यादित करणारे आणि कामगारांना विश्रांती देणारे कठोर नियम लागू केले. हे नियम जपानमध्ये आतापर्यंत लागू आहेत. (Japan)

मात्र जपानच्या नवीन पंतप्रधान ताकाची यांची कार्यशैली या सर्वांविरुद्ध आहे. त्यांनी पुन्हा अहोरात्र काम करण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे जपानमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. करोशी सारखे मृत्यू पुन्हा होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटे ३ पासून कामाला लागणा-या ताकाची यांना माजी पंतप्रधान आणि मुख्य विरोधी पक्षाचे नेते योशिहिको नोडा यांनी वेळीच योग्य निर्णय घ्या, असे सांगितले आहे. अर्थात ताकाची या याधीपासूनच दिवसाचे १८ तास काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्यासारखीच अन्य मंत्रीमंडळाचीही कार्यपद्धती असावी, हा त्यांचा अट्टाहास चुकीचा असल्याची टीका होत आहे. जपानमध्ये मानक काम मर्यादा दररोज ८ तासाची आहे. दरम्यान, ओव्हरटाइमची मर्यादा दरमहा ४५ तास आहे. आता ताकाची सरकार ओव्हरटाइमची मर्यादा आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. यामुळे पंतप्रधान ताकाची यांच्यावर टीका होत आहे. (International News)

========

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये उत्तम नफा मिळवण्यासाठी ‘या’ आहेत भन्नाट योजना

========

कर्मचाऱ्यांवर अनावश्यक ताण येईल, अशी भीती व्यक्त कऱण्यात येत आहे. दुस-या महायुद्धानंतर जपानमध्ये लाइफटाइम जॉब मॉडेल मांडले गेले. त्यात आजीवन रोजगार असे वाक्य होते. त्यातून देशाला पुन्हा उभे कऱण्यात आले. पण याचा परिणाम असा झाला की, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये रहायचे. कामाचा ताण इतका वाढला होता की, प्रवास करताना लोक जिथे जागा मिळेल तिथे झोपी जायचे. १९६० आणि १९७० च्या दशकात कामाचा ताण इतका वाढला की, ऑफिसमध्ये काम करतांना कर्मचारी चक्कर येऊन पडत असत. तर ट्रेनमधून उतरताना बेशुद्ध पडणाऱ्या लोकांची संख्याही मोठी होती. यानंतर कारोशी हा शब्द आला, आणि मग जपानमध्ये कामाच्या तासांवर मर्यादा घालण्यात आली. आता ताकाची सरकारच्या निर्णयामुळे या सर्वांची पुन्हा जपानमध्ये चर्चा होऊ लागली आहे. (Japan)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.