Home » Danky soap : गाढवाच्या दुधापासून बनलेल्या साबणाला तुफान मागणी !

Danky soap : गाढवाच्या दुधापासून बनलेल्या साबणाला तुफान मागणी !

by Team Gajawaja
0 comment
Danky soap
Share

प्राचीन इजिप्तची शेवटची शासक क्लियोपात्रा हिच्या सौंदर्याबाबत आजही अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. टॉलेमिक राजवंशाची शेवटची शासक असलेली क्लियोपात्रा जेवढी एक कुशल राणी होती तेवढीच ती शूर सेनानी होती. शिवाय तिचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. असे सर्व असले तरी, क्लियोपात्राची सर्वाधीक चर्चा तिच्या सौंदर्यानं होते. असे सांगितले जाते की, क्लियोपात्रा गाढवीच्या दुधाने आंघोळ करायची, त्यामुळेच तिची त्वचा अतिशय तजेलदार होती, आणि ती कायम तरुण दिसायची. अशा अनेक आख्यायिका क्लियोपात्राबाबत आहेत. क्लियोपात्रा फार नाही, सुमारे ७०० गाढवांच्या दूधानी स्नान करायची अशीही आख्यायिका आहे. (Danky soap)

गाढवीच्या दुधातील लॅक्टिक अॅसिड आणि इतर पोषक घटक त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. ही माहिती त्या काळी क्लियोपात्राला होती, आणि त्यामुळेच आज क्लियोपात्राच्या मृत्यूला २०५५ वर्षे झाली तरी तिच्या सौंदर्याचे वर्णन केले जाते. आता क्लियोपात्राच्या सौंदर्याची आणि या सौंदर्यामागे दडलेल्या रहस्याची उकल करण्याचे कारण म्हणजे, क्लियोपात्रासारखे सुंदर होण्यासाठी आता अनेक तरुण-तरुणी गाढवीच्या दुधाचा वापर करत आहेत. पण क्लियोपात्रा राणी होती, तिच्या आदेशाने ७०० काय ७००० गाढवं उभी करता आली असती. पण सर्वसामान्यांना हे कसं शक्य आहे, हे जाणूनच आता गाढवीच्या दुधाचा वापर केलेले साबण बाजारात आले आहेत. याला डंकी सोप म्हणतात. या डंकी सोपची हजारो रुपये किंमत आहे, अर्थात एवढी किंमत असूनही त्याला प्रचंड मागणी आहे. (Social News)

प्राचीन इजिप्तची राणी क्लियोपात्रा हिच्या सौंदर्याचं गुपित जाहीर झाल्यापासून गाढवाच्या दुधाला मोठी मागणी आली आहे. दुबईमध्ये सध्या गाढवाच्या दुधापासून तयार झालेले साबण हजारो रुपयाला विकले जात आहेत. गाढवाच्या दुधापासून बनवलेला अट्टन साबण जॉर्डन, दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये वेगाने लोकप्रिय झाले आहेत. गाढवाच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, त्याचा फायदा त्वचा मुलायम ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे या गाढवाच्या दुधापासून तयार केलेल्या साबणाची मागणी मोठी वाढली आहे. त्यातही दुबईमध्ये हा साबण प्रचंड लोकप्रिय झाला आहे. युएई, जॉर्डन, इजिप्त आणि इतर आखाती देशांमध्ये असलेल्या पंचतारांकीत ब्युटी पार्लरमध्ये या साबणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सुरुवातीला गाढवाच्या दुधापासून तयार झालेल्या साबणाचा वापर ब्युटी पार्लर आणि अन्य ठिकाणी सुरु झाल्यामुळे त्याबाबत थट्टा करण्यात येत होती. (Danky soap)

मात्र या साबणाची उपयोगीता लक्षात आल्यावर त्याची मागणी झपाट्यानं वाढली आहे. वर्षभरातच हा गाढवाच्या दुधापासून तयार झालेला साबण सर्वाधिक किंमतीनं विकला जाणारा साबण म्हणून प्रसिद्ध झाला आहे. गाढवीचे दूध प्रथिने, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो, तसेच अकाली वृद्धत्वाशी लढण्यास मदत होते. गाढवीच्या दुधावर झालेल्या संशोधनानुसार, गाढवीचे दूध त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यास, सुरकुत्या कमी करण्यास आणि एक्झिमापासून आराम देण्यास मदत करते. सोबतच मुरुमे आणि डाग कमी करण्यात देखील त्याची मदत होते. त्यामुळेच गाढवीच्या दुधापासून तयार झालेल्या साबणाची किंमतही जास्त आहे. ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल, नारळ तेल यांचा समावेश असलेल्या या एका साबणाची किंमत २५०० रुपयांपर्यंत आहे. अर्थात फक्त दुबईच नाही, तर जगभरात गाढवाच्या दुधापासून तयार झालेल्या साबणाची मागणी वाढली आहे. (Social News)

=========

Jewellery : लग्नसराईसाठी पारंपरिक दागिन्यांचे आकर्षक पर्याय

=========

गाढवीचे दूध जगभरात प्रामुख्याने त्याच्यातील उच्च मूल्यामुळे विकले जाते. सौंदर्यप्रसाधने आणि आरोग्य उत्पादनांमध्ये वापरण्यात येत असल्यामुळे त्याची किंमतही जास्त आहे. हे दुध अन्य प्राण्यातील दुधापेक्षा लवकर खराब होते, त्यामळे त्याची साठवणूक करणे हे आव्हान असते. त्यासाठी या दुधाची पावडर किंवा चीजमध्ये त्याचे रुपांतर केले जाते. युरोपमध्ये अशापद्धतीनं साठवलेल्या गाढवाच्या दुधाच्या पावडरची मागणी अधिक आहे. गाढवाच्या दुधाची पावडर ही १ लाख प्रति किलो किंवा त्याहून अधिक दरानं विकली जाते. तर गाढवाच्या दुधापासून तयार झालेले चीज ६५००० प्रति किलोनं विकले जाते. यावरुनच या गाढवाच्या दुधाची मागणी किती आहे, याचा अंदाज येतो. (Danky soap)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.