अमेरिकेने व्हिसा नियमात पुन्हा फेरफार केले आहेत. आता अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी जे उत्सुक आहेत, त्यांना त्यांच्या फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कारण अमेरिकन व्हिसा नियमांमध्ये आता आरोग्य आणि फिटनेस हे दोन प्रमुख मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानुसार शारीरिक आजार असलेले नागरिक अमेरिकेत आल्यावर, त्यांच्या आजारपणाचा नाहक भुर्दंड अमेरिकेवर बसत आहे.

त्यामुळे अशांना आता अमेरिकेच्या वेशीवरच रोखण्यात येणार आहे. लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग या रोगानं ग्रस्त असलेल्यांचे अमेरिकेमध्ये जाण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार, अशा प्रकारच्या आजारी लोकांमुळे अमेरिकन सरकारच्या संसाधनांवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेचा व्हिसा मिळवतांना आता कुठल्याही देशातील नागरिकांना प्रथम आपल्या फिटनेस चाचणीचा अहवाल द्यावा लागणार आहे. अमेरिकेत रोज नियम बदलत आहेत. आता अमेरिकेतील व्हिसा नियमांना आणखी कडक करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने यासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे.
यानुसार मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग यासारखे आजार झालेल्या व्यक्तींना रेडझोनमध्ये टाकण्यात आले आहे. यासोबतच अन्य गंभीर आजारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. अशा गंभीर आरोग्य समस्या असलेल्या परदेशी नागरिकाला व्हिसा नाकारला जाणार आहे. प्रशासनानं जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार संसर्गजन्य रोग आणि लसीकरणाचीही अधिक कडक तपासणी कऱण्यात येणार आहे. हृदयरोग, श्वसन रोग, कर्करोग, मधुमेह, न्यूरोलॉजिकल रोग आणि मानसिक आरोग्य स्थिती याबाबत ज्यांच्या आरोग्य अहवालात काही गंभीर सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांचे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याचे स्वप्न भग्न होण्याची शक्यता आहे. सोबतच दमा, झोपेचा त्रास आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठीही अमेरिकेचे दरवाजे बंद होणार आहेत. कारण ट्रम्प प्रशासानानं जाहीर केलेल्या पत्रकानुसार असे रोग असणा-यांवर उपचार करणे खूप महाग असू शकते. संबंधित व्यक्तीची त्याच्या आजारामुळे तब्बेत बिघडली तर त्याचा नाहक भुर्दंड सरकारी तिजोरीवर पडणार आहे. यामुळे अशा व्यक्तींना वेळीच अमेरिकेच्या बाहेर थांबण्यात येणार आहे.
ट्रम्प प्रशासनानं व्हिसा नियम बदलतांना आरोग्याबाबत अनेक नियम घातले आहेत. फक्त जाहीर केलेल्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचाच व्हिसा नाकारण्यात येणार नाही, तर त्या व्यक्ती ज्यांच्याकडे येणार आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याचीही पडताळणी करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या मार्गदर्शकात असे म्हटले आहे की, व्हिसा अधिकारी, संबंधीत अर्जदारांना सरकारी मदतीशिवाय त्यांच्या आजारावर उपचार करता येतील का, हे तपासणार आहेत.

तसेच या अर्जदारांचे नातेवाईक आयुष्यभर अशा व्हिसाधारकांचा वैद्यकीय खर्च करण्यास समर्थ आहेत, की त्यांना सरकारी मदतीची गरज लागेल, हेही तपासण्यात येणार आहे. कुटुंबातील मुले आणि वृद्ध पालक यांच्यासाठीही या आरोग्याच्या अटी कडक करण्यात आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनानं बदललेल्या या नियमांवर आता टीका सुरु झाली आहे. यात इमिग्रेशन तज्ञही आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार व्हिसा अधिका-यांना यासाठी आधी वैद्यकीय प्रशिक्षण देण्याची गरज भासणार आहे. सध्या या व्हिसा अधिकाऱ्यांना वैद्यकीय प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांच्याकडून वैद्यकीय तंदुरुस्तीचे मूल्यांकन करणे अयोग्य असल्याचे त्यांचे मत आहे. जॉर्जटाउन विद्यापीठातील इमिग्रेशन वकील सोफिया जेनोवेज यांनी या धोरणामुळे मूल्यांकन करणारे अधिकारी आणि डॉक्टर या दोघांवरही दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
=========
America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !
=========
सामाजिक संस्थांनीही या नव्या धोरणांचा विरोध केला आहे. घरातील वृद्धांना ते फक्त आजारी आहेत, म्हणून दूर करणे हा मानवतावादी दृष्टीकोन नाही, असे सांगून सुदृढ समाजासाठी लहान मुले आणि वृद्ध या सर्वांचीच गरज असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या नव्या धोरणामुळे प्रामुख्याने अमेरिकेत कायमस्वरूपी निवासासाठी अर्ज करणाऱ्यांवर परिणाम होणार आहे. ग्रीन कार्डसाठी अमेरिकेत लाखो परकीय नागरिक प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी हे व्हिसामधील बदल धक्कादायक मानण्यात येत आहेत. सोबतच पर्यटकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी लागणा-या व्हिसामध्येही अशीच पडताळणी होणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र यावरही अशीच अट असेल, तर अमेरिकेतील पर्यटनाला याचा मोठा फटका बसणार आहे, शिवाय अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये मोठ्या संख्येनं येणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक कमी होणार आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
