अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर पडली आहे. कारण अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनी चक्क ‘ग्रेटर अफगाणिस्तान’चा नकाशाच जाहीर केला आहे. या नकाशानुसार तालिबान खैबर-बलोच प्रदेशासह पाकिस्तानचे तीन भाग करणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. या नकाशाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यापासून पाकिस्तानी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतात गेल्यावर्षापासून सुरु असलेल्या उद्रेकात भर पडत आहे. त्यातून पाकिस्तानचे तुकडे होणार अशी चर्चा आहे. मात्र अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनीच आता पाकिस्तानचे विभाजन कसे होणार हे दाखवल्यामुळे पाकिस्तानी जनतेला जबर धक्का बसला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या मागे भारत सरकार असून पाकिस्तानचे विभाजन करण्याचा डाव भारताच्या मदतीनं तालिबानने आखल्याचा आरोप आता पाकिस्तान सरकार करत आहे. (Pak Vs Afghan)

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील वाद वाढवण्यासाठी आता नवीन कारण पुढे आले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये एक व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाला असून यात भविष्यात पाकिस्तानचे कसे विभाजन होणार हे पद्धतशीर दाखवण्यात आले आहे. तालिबान सरकारनं जाहीर केलेल्या या नकाशामुळे पाकिस्तानी जनता संभ्रमात आहे. या संदर्भातील व्हिडिओमध्ये, अफगाणिस्तानचे उप-गृहमंत्री मोहम्मद नबी ओमारी एका सरकारी कार्यक्रमादरम्यान ‘ग्रेटर अफगाणिस्तान’चा नकाशा दाखवत आहेत. हा नकाशाच या दोन्ही देशांमधील वादात भर घालणारा आहे. कारण या नकाशात खैबर पख्तूनख्वा, गिलगिट-बाल्टिस्तान आणि बलुचिस्तान असे अनेक पाकिस्तानी प्रांत अफगाणिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहेत. यातच तालिबानने पुन्हा एकदा डुरंड रेषा म्हणजे, सध्याची अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा ओळखण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्णाण झाला आहे. (International News)
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दरम्यान सुरु असलेल्या वादामध्ये डुरंड रेषा ही सर्वात वादाची आहे. अफगाणिस्तानचे मंत्री मोहम्मद नबी ओमारी यांनी ग्रेटर अफगाणिस्तानचा नकाशा दाखवून खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानचा समावेश केल्यामुळे या डुरंड सीमेवरील नागरिकांमध्ये अधिक संभ्रम वाढला आहे. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या सीमेजवळील अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात झाली. यात लष्करी गणवेशातील दोन मुले मंत्र्यांना ढाल सादर करताना दिसत आहेत. अल-मदरसा अल-असरियाच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या या ढालीमध्ये अफगाणिस्तानचा नकाशा दाखवण्यात आला आहे. हा नकाशा वादग्रस्त असून त्याला ग्रेटर अफगाणिस्तान असे म्हटले जाते.(Pak Vs Afghan)
या सर्वात असलेल्या डुरंड रेषेचा उल्लेख तालिबानतर्फे “कृत्रिम वसाहतवादी सीमा” असा करण्यात येतो. त्यामुळे या डुरंड रेषेच्या जवळ असलेल्या प्रांतांचा समावेश अफगाणिस्तानमध्ये करुन तो नकाशाट भेट देणे आणि त्याचे छायाचित्र तालिबाननं जाणूनबुजून प्रसिद्ध केल्याने पाकिस्तान सरकारचा जळफळाट होत आहे. कारण हा व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाल्यावर पाकिस्तानी सोशल मिडियामध्ये पाकिस्तानी सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह विचारण्यात येऊ लागले आहेत. पाकिस्तानी सैन्य तालिबानवर अंकुश ठेवणार का, असे प्रश्न आता पाकिस्तानमधील जनता सरकारला विचारत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धबंदी आहे. मात्र दोन्ही देश ही युद्धबंदी कधीही मोडून एकमेकांवर हल्ला करतील अशी परिस्थिती आहे. या दोन देशातील शांतीसाठी तुर्कीएनं मध्यस्थता केली आहे. यातही तालिबाननं डुरंड रेषेबाबत आपले मत ठाम असल्याचे सांगितले आहे. दोहा येथे या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. (International News)

यातही तालिबाननं आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे. डुरंड रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून कधीही मान्यता देणार नाही, ही तालिबानची भूमिका आहे. तर पाकिस्तानचा दावा आहे की, डुरंड रेषा हीच खरी या दोन्ही देशांमधील सीमा आहे. त्यामुळे आता याच डुरंड रेषेबाहेरील प्रांत अफगाणिस्ताननं आपल्या ताब्यात घेऊन त्यासंदर्भातील ग्रेटर अफगाणिस्तानचा नकाशाच प्रसिद्ध केल्यामुळे पाकिस्तानी सरकार हादरले आहे. ही डुरंड रेषा १८९३ मध्ये ब्रिटिश अधिकारी सर हेन्री मॉर्टिमर डुरंड यांनी तयार केली. त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता असलेला भारत आणि अफगाणिस्तानमधील सीमा म्हणून या डुरंड रेषेला मान्यता देण्यात आली. त्यावेळी अफगाण अमीर अब्दुल रहमान खान यांनी दोन्ही देशांमधील सीमा निश्चित करणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र अफगाणिस्तानमधील जनतेनं ही डुरंड रेषा कधीही मान्य केली नाही. (Pak Vs Afghan)
================
हे देखील वाचा : Zohran Mamdani : ट्रम्पच्या नाकावर टिच्चून भारतीय वंशाचे जोहरान ममदानी बनले न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर
================
ही सीमा ब्रिटिशांनी जबरदस्तीने स्थापित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पश्चिमेकडील इराणपासून पूर्वेकडील चीन सीमेपर्यंत डुरंड रेषा पसरलेली आहे. एका बाजूला १२ अफगाण प्रांत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तान हे भाग आहेत. आपल्याच कुटुंबाचे विभाजन झाल्याची भावना अफगाणिस्तानमध्ये आजही आहे. अफगाणिस्तानचे शेवटचे राजा मोहम्मद झहीर शाह यांच्या कारकिर्दीतही संसदेने या सीमेला विरोध केला होता. आता पुन्हा तालिबानने या डुरंड रेषेने विभाजीत झालेला भाग आपल्या ताब्यात घेतल्याचे छायाचित्र प्रकाशित करुन पाकिस्तानी सरकारला डीवचले आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
