सिकंदर शेख (Sikandar Sheikh) २०२३ ची महाराष्ट्र केसरीची फायनल. पंचानी आपला निकाल दिला. निकाल सिकंदरच्या विरोधात गेला. मात्र लोकांना तो निकाल पटला नाही. लोकं सिकंदराच्या बाजूने उभी राहिली आणि फायनल हारुनही सिकंदर जिंकला. त्यानंतर पुढच्याच वर्षी २०२४ मध्ये सिकंदरने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आणि लोकांचा विश्वास सार्थ केला. त्याने 2020 साली महान भारत केसरी ही स्पर्धाही जिंकली. सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याने आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे सिकंदर शेखने 2024 मध्ये पंजाबमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा सिकंदर शेख महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला.
यामुळे सिकंदर शेख हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झालं. महाराष्ट्र कुस्तीतलं एक नाव जे उद्या देशपातळीवरही चमकेल म्हणून सिकंदरकडे पाहिलं जात होतं. मात्र तेवढ्यात एक धक्कदायक बातमी आली आहे. सिकंदर शेखला हत्यारे तस्करी केल्याच्या गुन्ह्यात पंजाबमध्ये अटक झाली आहे. पंजाब पोलिसांनी त्याला रंगेहात पकडल्याची माहिती आहे. तर त्याचवेळी वर्षाला १५ कोटी कमावणारा सिकंदर शेख अशी कामं करणार नाही त्याला या प्रकरणात अडकवल्यात आल्याचं त्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे? नरसिंग यादवसारखंच सिकंदरला अडकवण्यात आल्याचा आरोप का होतोय? जाणून घेऊ. (Trending News)

अवघ्या २६ वर्षात करियरच्या शिखरावर पोहचण्याच्या तयारीत असलेल्या सिकंदर शेख याला गेल्या आठवड्यात मोहालीमध्ये उत्तर प्रदेशातील दोन कथित गुंडांसह अटक करण्यात आली होती आणि पोलिसांनी दावा केला होता की त्यांनी या कारवाईत पाच पिस्तूल, जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि दोन वाहने जप्त केली आहेत. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजबमधील खरारच्या सीआयए कर्मचाऱ्यांना २४ ऑक्टोबर रोजी गुप्त माहिती मिळाली होती की मथुरा येथील दोन जण मोहाली जिल्ह्यात हत्यारांची डिलिव्हरी घेऊन येत आहेत. गुप्त माहितीवरून कारवाई करत पोलिसांनी खरार-मुल्लानपूर-विमानतळ रस्त्यावर संशयितांना अडवले आणि सदर खरार पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५, ५४ आणि ५९ अंतर्गत एफआयआर क्रमांक ३४५ नोंदवला. या कारवाईत दोन जिवंत काडतुसांसह चार. ३२ बोर पिस्तूल, दोन जिवंत काडतुसांसह एक .४५ बोर पिस्तूल, १.९९ लाख रुपये रोख,आणि दोन कार जप्त केल्या आहेत . पोलिसांनी सांगितले आहे पापला गुज्जर या कुख्यात गुन्हेगारी टोळीचा एक मुख्य शुटर असलेल्या दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून, दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पंजाबमधील गुन्हेगारी गटांना पुरवण्यासाठी त्याने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून शस्त्रे खरेदी केल्याचा आरोप आहे. आणि अशा कुख्यात गुंडासोबत आणि त्या टोळीतल्या सदस्यांसोबत सिकंदर सापडला आहे. (Sikandar Sheikh)
महत्त्वाचं म्हणजे या हत्यार तस्करी नेटवर्कचे अनेक राज्यात संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. सोबतच कुस्तीगीरच्या अटकेमुळे गुन्हेगारी संबंध असलेल्या खेळाडूंचा राज्य-विदेशी शस्त्रास्त्र व्यवहारांसाठी वापर होण्याचा वाढता ट्रेंड वाढत असल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे.
मात्र इकडे सिकंदरच्या कुटुंबाने आणि समर्थकांनी वेगळीच बाजू मांडली आहे. सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात.सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले. त्यांनी हमाली करून मुलाला पैलवान केलं हे स्टोरी आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांनीही आपला मुलगा असं करणार नाही असं म्हटलं आहे. “माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो एक प्रामाणिक, मेहनती खेळाडू आहे. त्याने कुस्तीच्या मैदानावर महाराष्ट्राचं नाव उंचावलं, पण आता त्याला गुन्हेगारी प्रकरणात ओढलं जातंय.” असा विश्वास सिकंदरच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. सोबतच सिकंदरला राजकीय पाठिंबाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाप्रमुख उमेश पाटील, जे स्वतः मोहोळचे आहेत, त्यांनी संशय व्यक्त केला आहे की शेखला “स्थानिक कुस्तीगीरांनी क्रीडा स्पर्धांमुळे फसवले असावे”. (Trending News)
==============
हे देखील वाचा : Cricket : टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावलेले कोच अमोल मुजुमदार कोण आहेत?
==============
“दरवर्षी, तो कुस्ती क्षेत्रात ४-५ कोटी बक्षीस रक्कम कमावतो… जर तो एका स्पर्धेत भाग घेतो तर तो दररोज १ लाख ते १.५ लाख कमावतो. हंगामात, तो दोन-तीन स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि दररोज ३ लाख ते ४ लाख कमावतो… तो अशा प्रकारे का पैसे कमावेल जेव्हा त्याने आधीच इतके पैसे कमावले आहेत… त्याला इतर बक्षिसांच्या रकमेसह १४ वाहने अवॉर्ड म्हणून मिळाली आहेत,” असंही उमेश पाटील म्हणाले आहेत. महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी, रिअल इस्टेट आणि चित्रपट क्षेत्रातील पुनीत बालन ग्रुपने शेखला तीन वर्षांसाठी वार्षिक १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही सिकंदर शेखला पाठींबा देत त्याची सुटका करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपण स्वतः पंजाब सरकारशी बोलणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सत्य बाहेर येईलंच आणि सिकंदर अडकला की अडकवला यावरचाही पडदा बाजूला होईल.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
