विचार करा, एक दोन अडीच वर्षांची मुलगी… जी आज खेळतेय, बोबडं- बोबडं बोलतेय, घरभर धिंगाणा घालतेय अचानक त्या छोट्याश्या मुलीला दुसऱ्याच दिवशी एक संपूर्ण देश देवाप्रमाणे पुजतो! हा देश आहे नेपाळ… भारत आणि चीनच्या मधला देश! जो तसा तर छोटासा आहे पण या देशाशी संबंधित अनेक रहस्य आहेत. शिवाय जगातील सर्वात उंच पर्वत, माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे, गौतम बुद्धांचा जन्म इथेच झाला. नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये ३००० पेक्षा जास्त मंदिरे आहेत. दरम्यान नेपाळ हा बहुधार्मिक आणि बहुभाषिक देश आहे. इथे जवळपास १२५ हुन अधिक जाती आणि १२३ हुन अधिक भाषा बोलल्या जातात. थोडक्यात भारत आणि नेपाळमध्ये अनेक गोष्टी समान दिसून येतात. (Nepal)
पण अशी एक गोष्ट आहे जी नेपाळला भारतापेक्षा वेगळं ठरवते ती म्हणजे ‘लिविंग गोडेस ऑफ नेपाळ’ अर्थात नेपाळची कुमारी देवी! ही देवी म्हणजे कुणी मूर्ती नाही तर एक जिवंत कुमारी मुलगी असते. हल्लीच अडीच वर्षांच्या आर्यतारा शाक्य या चिमुकल्या मुलीची नेपाळची कुमारी देवी म्हणून निवड करण्यात आली. पण ही प्रथा नेमकी कधीपासून सुरु झाली? ही कुमारी निवडली कशी जाते? आणि तिच्याशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेऊ.
तर या प्रथेची सुरुवात झाली एका राजामुळे ! याची गोष्ट अशी आहे की, १७ व्या शतकात नेपाळमध्ये जयप्रकाश मल्ल नावाचा राजा होऊन गेला. असं म्हणतात की हा राजा आणि देवी तलेजू जी की दुर्गामातेचं प्रतीक मानली जाते हे दोघे रोज रात्री महालात त्रिपाशा म्हणजेच dice खेळायचे. देवी तलेजू रोज रात्री महालात येऊन राजासोबत हा खेळ खेळायची. पण तिची एक अट होती की राजाने ह्या खेळाबद्दल किंवा त्यांच्या रोज रात्री भेटण्याबद्दल कोणाला काही सांगता कामा नये. कारण ती एक देवी होती आणि जर लोकांना याबद्दल कळलं असत तर त्यावर खूप चर्चा झाली असती.(Nepal)
अगदी त्या राजाच्या राणीलासुद्धा याबद्दल काही माहिती नव्हती. पण राजा दररोज रात्री कुठेतरी एकटाच जातो हे पाहून एक दिवशी ती राणी त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत गेली. तिथे देवीला पाहून राणीला धक्काच बसला. पण देवीची अट यामुळे मोडली होती. त्यामुळे देवी रागावली आणि तिथून गायब झाली. यानंतर राजासह देवीने त्रिपाशा खेळण थांबवल. राजाने देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप पूजा अर्चा केली. मग देवीने राजाला सांगितले की मी तुला माझ्या खऱ्या स्वरूपात भेटणार नाही. पण हो, निवारी समुदायातील एका मुलीच्या रूपात मी तुला भेटेन. तिच्यामार्फत तू मला भेटू शकतोस, माझी पूजा करू शकतोस आणि तेव्हापासून कुमारी देवीची ही प्रथा सुरु झाली. थोडक्यात नेवारी कंम्म्युनिटीच्या एका मुलीला देवी तलेजूचा अवतार मानलं जातं. पण हे तोपर्यंतच जोपर्यंत ती मुलगी किशोरावस्थेत येत नाही थोडक्यात जोपर्यंत तिचे Periods येत नाही! तोपर्यंत त्या मुलीला देवीचा अवतार मानून तिला पुजलं जात. तिला लिविंग Goddes ऑफ नेपाळ असं म्हटलं जात.
आता पुन्हा एकदा अडीच वर्षांच्या आर्यतारा शाक्य हिची कुमारी देवी म्हणून निवड करण्यात आली आहे. पण ही निवड प्रक्रिया सोप्पी नसते. कुमारी देवीसाठी त्याच मुलींची निवड केली जाते ज्यांच वय 2-4 वर्ष इतक आहे. जी नेवारी समाजातली आहे. जिच्या शरीरावर कोणतेही व्रण किंवा खूण नाहीये. जी नाजूक पण तितकीच निडर असेल. तिला कुठलाही आजार नसला पाहिजे. तिचे हात पाय नाजूक असले पाहिजे. डोळे आणि केस पूर्ण काळे असले पाहिजे. तिचा रंग गोरा किंवा सावळा असला पाहिजे. शिवाय तिचे दात पूर्णपणे असले पाहिजे म्हणजे जे आपण दुधाचे दात म्हणतो ते २० च्या २० ही दात असले पाहीजेत. ह्या सर्व गोष्टी ज्यांच्यामध्ये परफेक्ट असतील त्याच मुली या प्रोसेसमध्ये पुढे जातात. या सिलेक्टिव्ह मुलींची कुंडली राजाच्या कुंडलीसोबत मॅच केली जाते आणि जिची कुंडली जास्तीत जास्त मॅच होईल तिला राजा ‘कुमारी देवी’ म्हणून सिलेक्ट करतो.(Nepal)
यानंतर विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी काली मातेला १०८ म्हैस आणि बकऱ्यांचा बळी दिला जातो आणि ज्या मुलीची कुमारी देवी म्हणून निवड केलेली असते तिला एक रात्र त्या अंगणात चालावं लागत जिथे बळी दिलेल्या म्हशी आणि बकऱ्यां असतील. जर ती मुलगी न घाबरता इथे चालली तर तिला पुढच्या परीक्षेसाठी पात्र ठरवलं जात आणि ती जर का घाबरली तर दुसऱ्या मुलीची निवड केली जाते. पण जर ती घाबरली नाही तर त्या मुलीला एक दिवस एकटीलाच एका खोलीत रात्रभर राहावं लागत जिथे या १०८ प्राण्यांची फक्त मुंडकी असतील. यानंतर शेवटची परीक्षा असते ती म्हणजे या मुलींना एक्स कुमारीचे दागिने आणि काही गोष्टी ओळखायच्या असतात. जर तिला हे ओळखता आलं तर मग फायनली तिला ‘कुमारी देवी’ म्हणून घोषित केलं जात आणि तिला ‘कुमारीघर’ मध्ये शिफ्ट केलं जातं. थोडक्यात तिला तिच्या आई बाबांना सोडून, आपल्या घराला सोडून इथे येऊन राहावं लागतं.
तसं तर नेपाळमध्ये अश्या अनेक कुमारी देवी असतात पण काठमांडूची कुमारी देवी खास असते. म्हणून तिला ‘रॉयल कुमारी’ म्हटलं जातं. त्यांच्या देखभालीसाठी केअरटेकर असतात, आणि त्यांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. पण बाकीच्या कुमारी देवी त्यांच्या त्यांच्या घरीच राहतात. पण तिथे त्यांना देवीसारखंच ठेवलं जात. त्यांची पूजा केली जाते. रोज आरती केली जाते. तिला घरातले कोणीच नावाने हाक मारत नाही, तिला देवीच्याच नावाने हाक मारली जाते. तिचं दर्शन घेण्यासाठी रोज अनेक भाविक येत असतात. या सगळ्यामुळे अनेकदा त्या कुमारी देवीचे आईवडील नोकरी वैगरे सोडून देतात आणि त्यांना घरातच लक्ष द्यावं लागतं. या कुमारींना अनेक गोष्टी नंतर फॉलो कराव्या लागतात.
जसं की कुमारी कोणाशीही बोलू शकत नाही unless आईवडील आणि केअरटेकर. इव्हन ती आलेल्या भक्तांशीसुद्धा बोलू शकत नाही. तिला लाल रंगाचेच कपडे घालावे लागतात. ती कुठेही चालत जात नाही. तिला सगळीकडे उचलून नेलं जात. हे यासाठी कारण चालता चालता जरी तिला काही लागलं आणि तिच्या पायातून रक्त आलं तर देवीचं तिच्यातलं अस्तित्व निघून जाईल आणि तिला ‘कुमारी देवी’ म्हणून स्वीकारलं जाणार नाही. या कुमारी देवीबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीचे फेशिअल एक्सप्रेशन! तिच्या या एक्सप्रेशन्सना फार महत्त्व आहे. यात कुमारीचे सिरीयस एक्सप्रेशन म्हणजे भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. जर कुमारी रडली तर काहीतरी वाईट होणार आणि जर ती हसली तर कोणाचा तरी मृत्यू होणार असं मानलं जात. म्हणूनच जितका तिचा फेस सिरीयस तितका चांगला असं म्हणतात. (Nepal)
=================
हे देखील वाचा : NRI Village : भारतातील हे गाव ओळखले जाते परदेशात राहणाऱ्या रहिवाशांमुळे, जाणून घ्या यामागचं रहस्य!
=================
पण या एका परंपरेसाठी एक कुमारी स्वतःच्या आयुष्यातली ८ ते १० वर्ष देते. हा मान्य आहे कि या काळात तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातात, तिला अगदी प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली जाते. दूरदूरहून लोकं फक्त तिच्या दर्शनासाठी येतात. पण या सगळ्यात त्या मुलीच्या वेलबीइंगच काय? तिच्या मेंटल हेल्थवर, तिच्या प्रोग्रेसवर परिणाम होतो त्याचं काय? आणि अचानक एक दिवस त्या मुलीचे पीरिअड्स आल्यावर रातोरात ती मुलगी देवीपासून सामान्य मुलगी बनते. आणि सुरु होते तिची खरी परीक्षा ! कारण त्यानंतर त्या मुलींना साधं नीट चालायलाही जमत नाही. ना ही त्या कोणाशी नीट बोलू शकतात कारण ओव्हरऑल सोशलाईस व्हायला त्या घाबरतात. पुढे जाऊन तर अशा मुलींशी कोणी लग्नसुद्धा करायला मागत नाही. याच एक कारण म्हणजे नेपाळमध्ये असं मानलं जातं कि जो पण कोणी कुमारीशी लग्न करेल त्याचा काही वर्षातच मृत्यू होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर एक प्रश्न पडतो कि एखादी परंपरा एका लहान मुलीच्या जीवापेक्षा, तिच्या हक्कांपेक्षा मोठी आहे का? प्रत्येक गोष्टीला २ बाजू असतात तसंच या गोष्टीलाही आहेत. पण याच्या नेगेटिव्ह बाजूकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. (Top stories)
दरम्यान हल्ली नेपाळच्या सोशल आक्टिविस्टच्या सतत होणाऱ्या प्रोटेस्टमुळे आता यात थोडे बदल केले गेले आहेत. जसं की या कुमारींना शिकण्याची परवानगी आहे. मित्र मैत्रिणीसोबत थोडंफार बोलण्याची परवानगी आहे. पण रॉयल कुमारीला मात्र शिक्षक घरी येऊनच शिकवतात. ती फक्त वर्षातले १२/१३ दिवसच जे कि सण उत्सव असतात तेव्हाच बाहेर पडते. शिवाय कुमारिकेच्या आर्थिक स्थिरतेसाठी नेपाळ सरकार पेन्शनसुद्धा देतं. पण अगेन ज्या गोष्टी आपल्याला त्या त्या वयात घराच्या बाहेर पडून, ४ लोकांत मिसळल्यावर कळतात, त्या बंद महालात नाही कळू शकत. आणि नेमकं हेच होतं कुमारी देवीच्या बाबतीत ! तुम्हाला या परंपरेबद्दल काय वाटतं ? आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा !