Home » Pakistan : पाकिस्तानमध्ये दाणादाण आणि डुरंड रेषा !

Pakistan : पाकिस्तानमध्ये दाणादाण आणि डुरंड रेषा !

by Team Gajawaja
0 comment
Pakistan
Share

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील परिस्थिती सध्या युद्धसदृश आहे. काबूलवर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, अफगाण सैन्याने पाकिस्तानी सीमा चौकीवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानी सीमा चौक्याही ताब्यात घेतल्या असून किमान ५८ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या तणावाच्या मध्यभागी पाकिस्तान अफगाणिस्तान डुरंड रेषा आहे. अफगाणिस्तानवर जेव्हा पुन्हा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले, तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटले होते. तालिबान सरकारचे स्वागत करण्यासाठी पाकसरकारने त्यांचे मंत्रीही अफगाणिस्तानमध्ये पाठवले. (Pakistan)

मात्र या सर्वात तालिबानचे मत डुरंड रेषेबाबत ठाम राहिले. इंग्रजांनी मारलेल्या या रेषेमुळे अफगाणिस्तानमधील काही भाग हा पाकिस्तानमध्ये गेला आहे, आणि हे स्विकारण्यास तालिबाननं कायम नकार दिला आहे. त्यामुळेच ज्या तालिबान सरकारचे स्वागत पाकिस्तानमध्ये करण्यात आले, त्याच तालिबाननं पाकिस्तानमध्येच चांगलीच दाणदाण उडवून दिली आहे. शिवाय पाकिस्ताननं आपल्या भूमीवर अतिरेक्यांना संरक्षण देऊ नये, असा कानमंत्रही दिला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्णाण झाला असला तरी हा वाद नवीन नाही. या दोन देशांमधील २,६४० किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा ही डुरंड रेषा म्हणून ओळखले जाते. ही डुरंड रेषाच या दोन देशामध्ये तणावाचे कारण ठरत आहे. तालिबानने या डुरंड रेषेचे अस्तित्वच नाकारले आहे. (International News)

त्यांच्याकडून पाकिस्तानच्या या सीमावर्ती भागात धार्मिक आणि राजकीय प्रभाव वाढवला जात आहे. त्यातूनच आता ही संघर्षाची ठिणगी पडली आहे. अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानने हवाई हल्ले केल्यावर अफगाण सैन्याने पाकिस्तानी सीमा चौकीवर हल्ला चढवला. त्यात पाकिस्तानी सीमा चौक्या ताब्यात घेतल्या. तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यानं पाकिस्तानी हल्ल्याला तेवढ्याच तीव्रतेनं उत्तर देत, पाकिस्तानने पुन्हा हल्ले केले तर थेट पाकिस्तानमध्ये अफगाण सैन्य घुसवण्याचा इशारा दिला आहे. या संघर्षात ५८ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. यातून डुरंड रेषेचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. डुरंड रेषा काश्मीर, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान सारख्या संवेदनशील भागातून जाते. तिला जगातील सर्वात धोकादायक सीमा म्हटले जाते. येथे दररोज सीमापार हल्ले, बेकायदेशीर व्यापार आणि दहशतवादी कारवाया होतात. या सीमावर्ती भागात रहाणा-या लोकांचे जीवन कायम छोट्यामोठ्या हल्ल्यांच्या भीतीत जात असते. (Pakistan)

अफगाणिस्तानच्या मते, डुरुंड रेषा ही ब्रिटिश सरकारने स्वतःच्या हितासाठी तयार केली असून ती काल्पनिक आहे. १८९३ मध्ये ही रेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये ब्रिटिश सरकारनं आखून दिली. यात तत्कालीन अफगाण शासक अब्दुर रहमान खान आणि ब्रिटिश अधिकारी सर हेन्री डुरंड यांच्यात झालेला करार आधारभूत आहे. रशियाच्या विस्तारवादी धोरणांना तोंड देण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानमध्ये बफर झोन तयार करण्यासाठी ब्रिटिशांनी ही डुरंड रेषा आखली. या भागात पश्तून आणि बलुच आदिवासी कुटुंबे आहेत. या सीमेमुळे या समुदयाची अनेक कुटुंबे विभाजीत झाली आहेत. विशेषतः डुरंड रेषेचा पश्तून समुदायावर सर्वाधिक परिणाम झाला. या रेषेनंतर त्यांची कुटुंबे आणि जमाती दोन्ही देशांमध्ये विभागली गेली. हाच मुद्दा तालिबान पुढे करुन डुरंड रेषेचे अस्तित्व नाकारत आहे. त्यांच्या मते, ब्रिटिशांनी स्थानिकांच्या हिताचा विचार न करता त्यांच्या राजकीय आणि लष्करी लाभासाठी ही रेषा काढली. म्हणूनच ब्रिटिश सरकार गेल्यावर आता या रेषेचेही अस्तित्व नसल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. (International News)

इकडे पाकिस्तान मात्र डुरंड रेषा मानतो. २०२१ मध्ये जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आले, तेव्हा पाकिस्तानला सख्खा मित्र भेटल्याचा आनंद झाला. मात्र या मित्रानं पाकिस्तानच्या हो ला हो उत्तर देण्यास नकार दिला. तेव्हा तालिबान सत्तेत आल्यावर जे अफगाण नागरिक पाकिस्तानच्या आश्रयाला आले होते, त्यांची हाकालपट्टी करण्याची सुरुवात पाकिस्ताननं केली. शिवाय डुरंड रेषेवर पाकिस्तानवर या कुंपण उभारण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हापासून, तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात अनेक सीमा संघर्ष झाले आहेत. तालिबान समर्थित दहशतवादी संघटना टीटीपी, म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान देखील पाकिस्तानमध्ये हल्ले करत असून यामुळे दोन देशातील तणावात भर पडत होती. (Pakistan)

या सर्व युध्दजन्य वातावरणात आता हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या नावाची चर्चा होत आहे. हिबतुल्ला अखुंदजादा यांना तालिबानमध्ये “अमीर अल-मुमिनिन” म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ “निष्ठावंत सेनापती” असा होतो. १९६० च्या दशकात जन्मलेले अखुंदजादा हे नूरझाई जमातीचे आहेत आणि ते दीर्घकाळ शरिया न्यायालयांचे प्रमुख राहिले आहेत. त्यांना तालिबानच्या धार्मिक बाबींमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते. २०२१ मध्ये जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतली तेव्हा अखुंदजादा यांनी स्वतःला “इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान” चे सर्वोच्च नेते घोषित केले. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरिया कायद्याची पूर्ण अंमलबजावणी जाहीर केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. आता त्यांच्याच इशा-यावरुन अफगाण सैन्य पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडले. डुरंड रेषेवर रात्रीच्या वेळी झालेल्या या प्रतिहल्ल्यात अफगाण सैन्याने २० हून अधिक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. (Pakistan)

================

हे देखील वाचा : Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

=================

शिवाय ५८ पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. शिवाय अफगाणिस्तानच्या सैन्याने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी सैनिक त्यांची शस्त्रे सोडून पळून गेल्याची माहिती आहे. अफगाण सैन्याने हेलमंड, कंधार, झाबुल, पक्तिका, खोस्त, नांगरहार आणि कुनार प्रांतांमधून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला. या सर्वात आता सौदी अरेबिया काय निर्णय घेणार याकडेही लक्ष लागले आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये नुकताच एक संरक्षण करार झाला असून त्याअंतर्गत पाकिस्तानवरील हल्ला हा सौदी अरेबियावर हल्ला मानला जाईल,असाही मुद्दा आहे. त्यामुळेच सौदी अरेबिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युद्धात कोणाची बाजू घेणार यावर या दोन देशांमधील तणाव किती काळ रहाणार हे अवलंबून आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.