संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी चित्रपट बॉक्स ऑफीसवर बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. पण या चित्रपटासोबत बॉलिवूडमध्ये आलेल्या एका नव्या चॉकलेट बॉयचीच चर्चा अधिक चालू आहे. हा कलाकार आहे शांतनु माहेश्वरी (Shantanu Maheshwari)
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक असलेल्या शांतनुला भन्साळी यांनी ब्रेक दिला आणि शांतनुने त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याचे सार्थक केले आहे. आलिया भट समोर अफसानच्या भूमिकेत असलेल्या शांतनुच्या अभिनयाचे मान्यवरांनी कौतुक केले आहे. त्यामुळेच आगामी काळात हा नवा चॉकलेट बॉय मोठ्या बॅनरच्या बॉलिवूडपटात दिसला तर नवल नाही. सात मार्च रोजी बत्तीसवा वाढदिवस साजरा करणारा शांतनु महेश्वरी (Shantanu Maheshwari) छोट्या पडद्याच्या माध्यमातून युवकांच्या मनात खास जागा ठेऊन आहे.
उत्कृष्ट कोरीओग्राफर म्हणून ओळखला जाणारा शांतनु महेश्वरी (Shantanu Maheshwari) मुळचा कलकत्त्याच्या. तेथील द पार्क इंग्लिश स्कूल आणि सेंट जोसेफ कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईत एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतल्यावर शांतनुला एक वेगळीच ओळख मिळाली.
कॉलेजच्या स्ट्रीट सोल डान्स क्रू मध्ये तो सहभागी झाला आणि तिथूनच त्याच्या कोरीओग्राफीला सुरुवात झाली. चॅनल V साठी दिल दोस्ती डान्समध्ये काम करण्याच्या संधी त्याला मिळाली. त्यात त्याची प्रमुख भूमिका होती. आंतराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत तो विजयी ठरला.
====
हे देखील वाचा: ‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम निमिषा सजयन (Nimisha Sajayan) करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
====
ऑनस्क्रीन कपल ऑफ द इयरसाठी पुरस्कारासाठीही शांतनुची निवड झाली. त्यानंतर शांतनु झिंग चॅनलच्या; ‘प्यार तुने क्या किया’ या मालिकेत दिसला. अमेरिकेच्या गॉट टॅलेंट (सीझन 11) मध्ये शांतनुने सादर केलेल्या नृत्याची तारीफ झाली होती. त्यांनतर शांतनुला एमटीव्हीवरील कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.
कलर्सवरील सेलिब्रिटी डान्स रिॲलिटी शोमध्ये त्याची विशेष छाप पडली. हृतिक रोशनने शांतनुचा उल्लेख फ्लाइंग स्टार म्हणून केला. तो या शोचा उपविजेता होता. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर मोठ्या ब्रेकसाठी धडपडणाऱ्या शांतनुने खतरों के खिलाडीच्या सीझन आठ मध्ये आपली छाप पाडली. दिग्दर्शक रोहीत शेट्टी हे या शोचे होस्ट होते. शांतनुचा उल्लेख त्यांनी सायलेंट किलर केला होता. अर्थात तोच या शोचा विजेता ठरला.
====
हे देखील वाचा: ऋतिक रोशन (Hrithik Roshan) साकारणार नकारात्मक भूमिका
====
या सर्वात शांतनुचा चाहता वर्ग वाढला. विशेषतः तरुणांवर त्यांच्या नृत्य कौशल्याची छाप पडली. काही वेबसिरीजमध्येही शांतनुला छोट्या भूमिका मिळाल्या. याच शांतनुला संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्ट सोबत एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी साईन केले.
25 फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर आलेला हा चित्रपट खूप रखडला. त्यावेळी शांतनु निराश झाला होता. पण आता त्यातील त्याच्या भूमिकेला मिळणारी दाद त्याला सुखावत आहे.
– सई बने