नवरात्रीचा उत्सव नुकताच भारतभर साजरा झाला आहे. आता सर्वांना वेड लागले आहेत, ते प्रकाशाच्या सणाचे, अर्थात दिवाळीचे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. या धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वत्र दिव्यांची रोषणाई करत धन आणि धन्वंतरींची पूजा होते. मात्र उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील एका मंदिरात या दिवशी भारतभरातून आलेले भाविक गर्दी करतात. त्यामागे या मंदिराबाबत असलेल्या रहस्यांची आख्यायिका आहे. अल्मोडा येथील जागेश्वर धाम मंदिरात धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचे नाणे नेऊन त्याची पूजा केल्यास धनसंपदेचा देव असलेल्या कुबेराचा आशीर्वाद मिळतो, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे जागेश्वर धाम मंदिरात धनत्रयोदशीच्या दिवशी हजारो भाविक दाखल होतात आणि चांदीच्या नाण्याची पूजा करुन ते नाणे आपल्या तिजोरीमध्ये ठेऊन देतात. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या या परंपरेमागे अनेक पौराणिक आख्यायिका आहेत. (Jageshwar Temple)
धनत्रयोदशीचा सण यावर्षी 18 ऑक्टोबर रोजी, देशभरात साजरा केला जाईल. या दिवशी भगवान कुबेर, देवी लक्ष्मी आणि देवांचे वैद्य म्हणून पूजनीय असलेल्या धन्वंतरींची विशेष पूजा केली जाते. याचदिवशी उत्तराखंडमधील जागेश्वर धाममध्ये भगवान कुबेराचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. अल्मोडा जिल्ह्यातील या जागेश्वर धाम मंदिराची देश विदेशात ख्याती आहे. या मंदिरातील मातीही घरी नेल्याने समृद्धी येते असे मानले जाते. या जागेश्वर धाम येथे भगवान कुबेर एकमुखी शिवलिंगाच्या रुपात विराजमान आहेत. या मंदिरात भगवान शंकर आणि कुबेर या दोघांचीही पूजा केली जाते.
या भागातील स्थानिक नवा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी या मंदिराच्या गर्भगृहातील माती नेऊन तिची पूजा करतात. यामुळे व्यवसायात यश मिळते, अशी मान्यता आहे. याशिवाय धनत्रयोदशी आणि जागेश्वर धाम मंदिर यांचे अनोखे नाते आहे. अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी या मंदिरात चांदीचे नाणे घेऊन जाणे शुभ ठरते. या चांदीच्या नाण्याची मंदिरात मंत्र पठण करुन पूजा करण्यात येते. त्यानंतर हे नाणे एका कपड्यात गुंडाळून घरात ठेवल्यास घरात सुख संपत्ती यांची भरभराट होते, असे मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी येथे भगवान कुबेराला खीर देण्यात येते. तसेच भाविकांनाही प्रसाद म्हणून खीरीचे वाटप केले जाते. (Jageshwar Temple)
जागेश्वर धाम मंदिरात एऱवीही भाविकांची गर्दी असते. मात्र दिवाळी आणि धनत्रयोदशीच्यावेळी मंदिरात विशेष प्रार्थना केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी येथे एकमुखी शिवलिंगाशेजारी असलेल्या कुबेराला पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमतात. जागेश्वर धाम मंदिर ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. हे मंदिर सुमारे 2500 वर्षे जुने आहे. शिवपुराण, लिंग पुराण आणि स्कंद पुराण यासारख्या पौराणिक ग्रंथांमध्येही या मंदिराचा उल्लेख आहे. जटगंगा नदीच्या खोऱ्यात असलेल्या या मंदिराचे स्थापत्यशास्त्रही अभ्यासाचा विषय आहे. हजारो वर्ष जुन्या या मंदिराने आत्तापर्यंत अनेक वादळे सहन केली आहेत. मात्र या मंदिराची रचना भक्कम आहे. त्यामुळे भारतीय स्थापत्यशास्त्रातील अलौकिक मंदिर म्हणून या जागेश्वर धामचा उल्लेख होतो. या मंदिराची रचना ही केदारनाथ मंदिरासारखी आहे. या मंदिरात भगवान शंकर आणि सप्तर्षींनी तपश्चर्या केल्याचीही आख्यायिका आहे.
==============
हे देखील वाचा : Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज
==============
शिवाय केदारनाथ मंदिराला जाण्यासाठी या मंदिराच्या खालून गुप्त भूयारी मार्ग असल्याचेही सांगितले जाते. या सर्व आख्यायिकांमुळे या मंदिराबाबतचे गुढ अधिक वाढले आहे. जागेश्वर धाम परिसरात जवळपास 124 लहान मंदिरे आहेत. त्यामुळे हजारो वर्षापूर्वी हे मंदिरांचे संकुल कुठल्या उद्देशानं उभारले गेले, असा प्रश्नही विचारला जातो. येथे प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार, केदारनाथला जाण्यापूर्वी आदि शंकराचार्य यांनी जागेश्वर धाम येथे मुक्काम केला होता. जागेश्वर धाम मधिल मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केल्याचीही माहिती आहे. या मंदिराचा त्यानंतर अनेक तत्कालीन राजांनी जीर्णोद्धार केला. त्यात 7 व्या शतकात, राजा शालिवाहन यांनी लाकडी मंदिरांची पुनर्बांधणी दगडाने केल्याची माहिती आहे. मुख्यम्हणजे, मंदिराच्या भिंतींवर 25 हून अधिक शिलालेख आहेत. या शिलालेखांचा अभ्यास करण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला आहे. त्यातून या मंदिराबाबत असलेल्या अनेक गुढ कथा उलगडण्यास मदत होईल अशी आशा आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics