अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या धमकीनंतर हमासनेही प्रतिसाद देत शांतता मान्य असल्याचे सांगितले आहे. हमास या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने सर्व इस्रायली ओलिसांना सोडण्यास आपण तयार असल्याचे एक निवेदन जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेले गाझा युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. हमासच्या होकारानंतर ट्रम्प यांनी गाझापट्टीवर बॉम्बस्फोट थांबवावे असे, इस्रायलला आवाहन केले. त्यामुळे या पट्ट्यात शांतता येईल, अशी आशा दिसत असली तरी, या शांततेसाठी दिलेला वीसकलमी प्रस्ताव मान्य होणे गरजेचे आहे. यातील अनेक प्रमुख मुद्द्यांमुळे हमास आणि इस्रायली नेत्यांमध्ये मतभेद असण्याची शक्यता आहे. (Gaza)
शिवाय हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांपैकी नक्की किती ओलिस जिवंत आहेत, आणि जे जिवंत आहेत, त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था कशी आहे, यावरही या युद्धाचा शेवट अवलंबून असणार आहे. या ओलिसांवर हमासनं अनेक अत्याचार केले आहेत. त्याचा बदला इस्रायलनं घेतला नाही तर तेथील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर केलेल्या एका वक्तव्यावर इस्रायलमध्ये आक्षेप घेण्यात येत आहे. ट्रम्प यांनी ओलिसांच्या सुरक्षतेसाठी लगेच बॉम्ब हल्ले थांबवण्याच्या सूचना इस्रायलला दिल्या आहेत. मात्र ओलिसांची स्थिती काय आहे, हे जाणणे गरजेचे असल्याचे इस्रायल सरकारमधील काही मंत्र्यांचे मत आहे. त्यामुळे गाझातील पेच जेवढा सोप्पा वाटतो, तेवढा सोप्पा नाही, हे उघड आहे. (International News)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी हमासला दिलेल्या 12 तासांच्या धमकीनंतर हमासने सकारात्मक उत्तर दिले आहे. त्यानंतर गाझामध्ये शांतता येईल, अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही अटींवर हमासनं मंजूरी दिली आहे. यात हमासकडे असलेल्या ओलिसांच्या सुटकेची अट मुख्य आहे. इस्रायलनेही ट्रम्प यांच्या या शांतता प्रस्तावाला मान्यता दिली असली तरी ओलिसांची अवस्था कशी आहे, यावर सगळी योजना अवलंबून राहिल, असे तज्ञांचे मत आहे. कारण हमासनं अमेरिकेच्या सर्व अटी मान्य केल्या असल्या तरी ओलिसांना सोडण्याच्या बदल्यात त्यांनी इस्रायली सैन्याला गाझामधून पूर्णपणे माघारी घ्यावे, अशीही अट ठेवली आहे. त्यामुळे गाझापट्टीमधील युद्ध कधी थांबेल याबाबत सध्या तरी संभ्रम आहे. (Gaza)
ट्रम्प यांच्या योजनेनुसार हमासकडे असलेल्या 48 ओलिसांना सोडण्यात येईल. यापैकी 20 ओलिस जिवंत असल्याची माहिती आहे. मात्र हे ओलिसही गंभीर आहेत. बहुधा सर्वच ओलिसांच्या शरीराचा हाडाचा सापळा झाला आहे. मध्यंतरी हमासकडून एका ओलिसाचे छायाचित्र प्रसिद्ध कऱण्यात आले होते. यात भुयारात ठेवलेला हा ओलिस आपली कबर खोदतांना दाखवण्यात आला होता. यातील ओलिसाच्या शरीराचा सापळा बघून हमासनं या ओलिसांवर किती अत्याचार केले आहेत, याची कल्पना येत होती. त्यामुळे ओलिसांची अवस्था पाहून इस्रायल या शांतता प्रस्तावावर काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. (International News)
हमासनं ट्रम्प यांचा प्रस्ताव स्विकारल्यावर ट्रम्प यांनी इस्रायलपुढेही काही मागण्या ठेवल्या आहेत. त्यानुसार इस्रायलने गाझामधील आपल्या कारवाया थांबवून तेथून माघार घ्यावी. तसेच त्यांच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी. याशिवाय गाझापट्टीच्या पुनर्बांधणीमध्ये सहकार्य करावे, अशीही अपेक्षा आहे. ट्रम्प यांनी आधीच या कामासाठी प्रशासक म्हणून ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची घोषणा केली आहे. टोनी ब्लेअर यांच्या देखरेखीखाली गाझाच्या सुमारे 20 लाख पॅलेस्टिनींसाठी आंतरराष्ट्रीय प्रशासन लागू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी या संदर्भात 20 कलमी प्रस्ताव सादर केला आहे. त्यातील काही मुद्यांवर हमास आणि इस्रायल यांची सहमती झाली असली, तरी काही मुद्दे अजून वादात आहेत. यातील सर्वात लक्षणीय मुद्दा म्हणजे, हमासने आपली शस्त्रे परत करावीत. मात्र गेल्या शांतता चर्चेदरम्यान हमासने आत्मसमर्पण करण्याचा प्रस्ताव नाकाराला होता. (Gaza)
=================
हे देखील वाचा : The Dragon Triangle : पृथ्वीवरचं दूसरं रहस्यमयी बरमुडा ट्रायंगल ?
=================
या सर्वावर इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने सावध प्रतिक्रीया दिली आहे. हमास आपल्या होकारावर किती ठाम रहाणार आहे, याबाबत त्यांच्या मनात शंका आहे. या युद्धबंदीमध्ये मध्यस्थी करणा-या कतारनेही ट्रम्प यांच्या वीस कलमी प्रस्तावाचे स्वागत केले आहे. या वीस कलमी प्रस्तावात, गाझा हा दहशतवादमुक्त क्षेत्र बनवला जाईल जेणेकरून तो शेजारील देशांना धोका निर्माण करणार नाही. गाझामध्ये पुनर्बांधणी आणि विकासाचे काम सुरू होईल. (International News)
ओलिसांच्या सुटकेनंतर, इस्रायल गाझामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 250 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल. शांततेचा करार झाल्यानंतर गाझाला दररोज किमान 600 ट्रक भरलेले मदत साहित्य पोहोचवले जाईल. गाझाचे प्रशासन एक आंतरराष्ट्रीय समिती सांभाळेल, याचे नेतृत्व स्वतः डोनाल्ड ट्रम्प करतील आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर त्यांना पाठिंबा देतील, यांचा समावेश आहे. शिवाय इस्रायल गाझा ताब्यात घेणार नाही, अशी अटही या प्रस्तावात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमेरिका इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दीर्घकालीन राजकीय तोडग्यासाठी वाटाघाटी करेल. शांतता करारातील शेवटच्या दोन अटींबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. (Gaza)
या योजनेअंतर्गत, शस्त्रे सोडून समर्पण करणाऱ्या हमास सदस्यांना माफी दिली जाणार असून गाझा सोडू इच्छिणाऱ्यांना सुरक्षित मार्ग दिला जाईल. मात्र आपल्या नागरिकांचा छळ करुन त्यांना मारणा-या हमासच्या अतिरेक्यांना इस्रायल खरोखर माफी देईल का, यावरच या शांतता कराराचे यश अवलंबून असणार आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
