Home » Harsiddhi Mata : माता हरसिद्धी मंदिराचे रहस्य !

Harsiddhi Mata : माता हरसिद्धी मंदिराचे रहस्य !

by Team Gajawaja
0 comment
Harsiddhi Mata
Share

शारदीय नवरात्रौत्सवात सर्वच देवीच्या मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येनं जात असले तरी भारतातील अशीही काही मंदिरे आहेत, जिथे देवीचे दर्शन घेण्यासाठी अहोरात्र भाविकांची गर्दी असते. नऊ दिवसांच्या मातेच्या या उत्सवात मातेच्या या मंदिरांमध्ये देशविदेशातील मातेचे भक्त आवर्जून येतात. अशाच मंदिरामध्ये महाकाल नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या उज्जैनच्या हरसिद्धी मंदिराचा समावेश होतो. सम्राट विक्रमादित्यांची देवता म्हणून हरसिद्धी माता ओळखली जाते. याच हरसिद्धी मातेच्या मंदिरासमोर असलेल्या दिपमाळांमध्ये 1100 दिवे लावण्यात येतात. नवरात्रौत्सवामध्ये या 1100 दिव्यांचा चमत्कार बघण्यासाठी या हरसिद्धी मातेच्या मंदिरात हजारो भाविक येतात. (Harsiddhi Mata)

या मंदिराच्या मध्यभागी अधिष्ठात्री देवता, देवी हरसिद्धी विराजमान आहे. याशिवाय देवी अन्नपूर्णा, देवी महालक्ष्मी आणि देवी महासरस्वती यांच्या मूर्तींही येथे आहेत. हे मंदिर श्री यंत्र, शक्तीचे एक शक्तिशाली प्रतीक, जे शक्ती आणि दैवी उर्जेचे प्रतिनिधित्व करते. उज्जैनच्या प्रसिद्ध हरसिद्धी माता मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त मोठी सजावट करण्यात आली आहे. हे मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले आहे, असे असले तरी मातेचे दर्शन घेण्यासाठी येथे भाविकांच्या लांबच रांगा लागलेल्या आहेत. हरसिद्धी माता मंदिर हे एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. माता सतीचा उजवा कोपर उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर पडला, तिथेच आता माता हरसिद्धीचे भव्य मंदिर आहे. सम्राट विक्रमादित्याची माता हरसिद्धीवर मोठी श्रद्धा होती. (Social News)

घराण्याची कुलदेवता म्हणून सम्राट विक्रमादित्य नित्यनियमानं देवीची आराधना करत असत. राजा विक्रमादित्य यांनी दैवी स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी या मंदिराला भव्य स्वरुप दिले. असे मानले जाते की, सम्राट विक्रमादित्याने याच मंदिरात देवीची साधना केली आणि श्री यंत्राची सिद्धी प्राप्त केली. त्यानंतर, राजा विक्रमादित्य एक न्यायी राजा म्हणून ओळखले जाऊ लागले आणि संपूर्ण देशावर त्यांनी राज्य केले. देवी हरसिद्धी ही परमार वंशाच्या राजांची कुलदेवता मानली जाते. राजा विक्रमादित्य दर 12 वर्षांनी या मंदिरात आपले डोके अर्पण करत असे. 11 वेळा आपले डोके अर्पण केल्यानंतर, त्याचे डोके परत आले. जेव्हा 12 व्या वेळी डोके परत आले नाही, तेव्हा राजा विक्रमादित्य यांचे राज्य पूर्ण झाले मानले जाते. हे मंदिर तांत्रिक विधी आणि सिद्धी साधनेचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. (Harsiddhi Mata)

हिंदू धार्मिक ग्रथांमध्येही या मंदिराचा उल्लेख आहे. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की, देवीने प्रचंड राक्षस नावाच्या राक्षसाचा वध केला, त्यानंतर देवीला हरसिद्धी असे नाव मिळाले. या मंदिराच्या आवारात असलेला 51 फूट उंच भव्य दीपस्तंभ मातेच्या भाविकांसाठी वंदनीय आहे. या स्तंभावर एकाच वेळी सुमारे 1100 दिवे प्रज्वलित केले जातात. यासाठी अंदाजे 60 लिटर तेल आणि 4 किलो कापसाची आवश्यकता असते. भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे दिव्यांची माळ लावतात. या अनोख्या परंपरेनुसार दिवे लावण्यासाठी येथे काही महिन्यांची प्रतीक्षा यादीही आहे. हे दीपस्तंभ राजा विक्रमादित्य यांनी स्थापित केले होते. या दिव्यांच्या खांबांचा इतिहास 2000 वर्षांहून अधिक जुना आहे. शक्तीपीठ असल्याने, या मंदिराला तांत्रिक महत्त्व देखील आहे. असे मानले जाते की, जेव्हा या मंदिरात संध्याकाळी दिवे लावले जातात तेव्हा देवीसमोर व्यक्त केलेल्या इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Social News)

आता नवरात्रीच्या दिवसात हा दीपप्रज्वलनाचा सोहळा आणखी खास होतो. दीव्यांची माळ प्रज्वलीत होतांना उपस्थित असलेले भाविक हससिद्धी मातेच्या नावाचा जयघोष करतात. नवरात्रीच्या या उत्सवात मातेला जो नैवेद्य अर्पण केला जातो, तोही खास असतो. या उत्सवात मातेला डाळिंबाचे दाणे, मध आणि आले यांचा विशेष नैवेद्य दाखवला जातो. असे मानले जाते की, या दिवसांत देवी झोपत नाही, म्हणून या काळात देवीची शेज आरती केली जात नाही. त्यामुळे या मंदिरात अहोरात्र भाविकांची गर्दी असते, आणि सर्वत्र मातेच्या नावाचा जयजयकार चालू असतो. या नवरातौत्सवात देवीच्या मंदिराभोवतीही शेकडो मातीचे दिवे लावले जातात. (Harsiddhi Mata)

========

हे देखील वाचा : 

Navratri : नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या कुंकुमार्जनाचे महत्व

=========

सोबतच भाविक धूपही लावतात. त्यामुळे या मंदिरात मोठे अनोखे वातावरण असते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना असलेले चार प्रवेशद्वार आहेत. हरसिद्धी माता मंदिर आध्यात्मिक साधनेचे महत्त्वाचे केंद्र मानण्यात आले आहे. भारतावर अनेकवेळा आक्रमणे झाली. इस्लामिक आक्रमकांनी या मंदिरावरही आक्रमण करुन मंदिराला हानी पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र माता हरसिद्धीच्या या मंदिराचे हे आक्रमक कुठलेही नुकसान करु शकले नाहीत. याशिवाय शिप्रा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराचा आणि उज्जैन येथे भरत असलेल्या कुंभमेळ्याचाही जवळचा संबंध आहे. उज्जैनमध्ये जेव्हा कुंभमेळा भरतो, तेव्हा या हरसिद्धी माता मंदिरात अनेक तांत्रिक साधक मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. (Social News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.