शारदीय नवरात्र सुरू आहे. या नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरामध्ये मोठी सजावट करण्यात आली आहे. देवीच्या मूर्तीला फुलांनी आणि दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. पण देवीचे असे एक मंदिर आहे, जिथे देवीच्या मूर्तीची नाही तर पाळण्याची पूजा केली जाते. देवीचे हे अनोखे रुप संगमनगरी म्हणून ओळख असलेल्या प्रयागराज येथे आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये संगम काठावर 52 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अलोपी शंकरी देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिरांमध्ये भाविक देवीचे पहिले रूप असलेल्या शैलपुत्रीची पूजा करतात. पण येथे मूर्तीची नाही तर पाळण्याची पूजा केली जाते. येथे माता सतीच्या उजव्या हाताचा पंजा पडल्याची आख्यायिका सांगण्यात येते. त्यामुळेच या मंदिराला आलोपी शंकरी असे नाव मिळाले असून या मंदिराचा उल्लेख पुराणातही आहे. (Uttar Pradesh)
संगमनगरी प्रयागराज येथील अलोपी माता मंदिराची नवरात्रौत्सवानिमित्त मोठी सजावट करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीनं हे मंदिर फुलून गेले आहे. देवी दुर्गेची अनेक रूपे आहेत आणि मातेची ही अनेक रुपे पाहण्यासाठी आणि मातेची पूजा करण्यासाठी भाविक शक्तिपीठांवर गर्दी करतात. पण अलोपी माता शक्तिपीठ हे अनोखे आहे. या ठिकाणी मातेची कुठलिही मूर्ती नाही. तसेच तिच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या मूर्त स्वरूपाची पूजा होत नाही. आलोपीशंकरी देवी म्हणून ओळखल्या जाणा-या या मंदिरात लाल चुनरीमध्ये गुंडाळलेल्या पाळण्याची पूजा करण्यात येते. देवीचे रुप मानून या पाळण्याची पूजा येथे केली जाते. हे अत्यंत जागृत स्थान असून मातेच्या पाळण्याचे दर्शन घेतल्यानं कुटुंबाची प्रगती होते, अशी भाविकांची धारणा आहे. आलोपीशंकरी मंदिर प्रयागराजमधील दारागंज ते रामबाग या रस्त्यावर आहे. (Social News)
आलोपीबाग परिसराचे नाव देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मंदिराची देखरेख करणा-या महंतांच्या माहितीनुसार या मंदिराचा उल्लेख हिंदू धार्मिक ग्रंथांमध्येही आहे. यात सांगितलेल्या आख्यायिकांनुसार देवी सतीच्या उजव्या हाताचा पंजा येथे पडला होता. अलोपी म्हणजे ‘हरवलेले’ किंवा ‘गायब’ झालेले’. देवीचा पंजा या तलावत गायब झाला, त्यामुळे स्थानिक लोक या मंदिराचा आलोपीदेवी मंदिर असाही उल्लेख करतात. हे मंदिर सर्वार्थानं वेगळं आहे. बहुतांशी मंदिरांमध्ये गर्भगृहामध्ये देव किंवा देवीची मूर्ती असते. भाविक या मूर्तीच्या चरणाशी नतमस्तक होतात. देवीला फळ, फुले अर्पित करतात. पण आलोपीशंकरी मंदिर वेगळे आहे. या मंदिराच्या गर्भगृहात एक मध्यवर्ती व्यासपीठ आहे. यातत एक तलाव आहे. या तलावाच्या मध्ये लाल कापड्याने झाकलेला चौकोनी लाकडी पाळणा किंवा झुला आहे. मंदिरात येणारे भाविक कोणत्याही मूर्तीची नाही तर या पाळण्याची पूजा करतात. (Uttar Pradesh)
भाविक माता सतीचा आशीर्वाद घेण्यासाठी तलावातील पाणी पाळण्यावर ओततात आणि व्यासपीठाला प्रदक्षिणा घालतात. माता सतीच्या उजव्या मनगटाचा पंजा याच तलावात पडल्याची धारणा असल्यामुळे या तलावातील पाणी चमत्कारिक मानले जाते. म्हणून, मंदिरात येणारे भाविक आस्थेने तलावातील पवित्र पाणी तिर्थ म्हणून पितात. येथे फक्त नारळ आणि फुले अर्पण केली जातात. या मंदिरात भाविक नवसही करतात. पण देवीनं नवस पूर्ण केल्यावर देवीला चक्क तवा अर्पण केला जातो. यामागची कथा कोणालाही माहिती नाही. मात्र देवीला तवा आणि हलवा पुरी अर्पण केली जाते. शिवाय हिच हलवा पुरी प्रसाद म्हणूनही वाटली जाते. आलोपीशंकरी मंदिरात पाळण्याची पूजा केल्यावर त्या भक्ताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले जाते. यातून मातेचा आशीर्वाद सदैव सोबत असल्याची श्रद्धा आहे. या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. (Social News)
========
हे देखील वाचा :
Navratri : नजवरात्रींमध्ये देवीला ‘ही’ फुलं अर्पण केल्याने होतात अनेक लाभ
Navratri : नवरात्रीत गरबा किंवा दांडिया का खेळतात?
=========
त्यानुसार काही वर्षांपूर्वी या भागात घनदाट जंगल होते. या जंगलात अनेक डाकू रहात होते. एकदा एका डाकूच्या डोळीनं या जंगलातून जाणारी लग्नाचे व-हाड अडवले. पुरुषांना मारल्यावर डाकूंनी नववधूची डोली उघडून पाहिली. तेव्हा ही डोली रिकामी होती. यामधील नववधू गायब झाली होती. या चमत्कारामुळे डाकूही घाबरुन तिथून पळून गेले. त्यानंतर स्थानिकांनी ही घटना घडलेल्या ठिकाणी एक मंदिर बांधले. तिलाच आलोपीदेवी असे नाव दिले. याच अलोपीशंकरी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्सहात साजरा होतो. या उत्सवासाठी येथे मोठा मेळाही भरतो. नवरात्रात या मंदिरात देवीच्या सर्व रुपांची पूजा केली जाते. देवीचा हा उत्सव पाहण्यासाठी मंदिरात अहोरात्र भाविकांची गर्दी असते. (Uttar Pradesh)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics