Home » London : लंडनमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा पेटणार !

London : लंडनमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा पेटणार !

by Team Gajawaja
0 comment
London
Share

नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनाला काही दिवस होत असतानाच लंडनच्या रस्त्यावरही हजारो नागरिक एकत्र झाले. टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली लंडनमध्ये ‘युनाईट द किंगडम’ नावानं एक भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत 1 लाखाहून अधिक ब्रिटीश नागरिक सहभागी झाले. ब्रिटनमध्ये वाढत असलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध सरकारने कारवाई करावा यासाठी ही रॅली काढण्यात आली. हातात झेंडे आणि फलक घेतलेले हे लाखो नागरिक जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यातील अनेकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेच्या टोप्याही देखील घातल्या होत्या. (London)

रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर मात्र जबर टीका करत ते स्थलांतरीतांना संरक्षण देत असल्याचा आरोपही केला. मुख्य म्हणजे या रॅलीमध्ये टेस्लाचे एलॉन मस्क यांनी लढा किंवा मरा असा थेट संदेश दिला आहे. ही रॅली ज्या टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वात काढली ते गेली अनेक वर्ष स्थलांतरितांविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे भविष्यात ब्रिटनमध्ये स्थलांतरीत आणि स्थानिक नागरिक हा लढा तीव्र होण्याची शक्यता आहे. (International News)

लंडनच्या रस्त्यावर उतरलेल्या एक लाखांहून अधिक ब्रिटीश नागरिकांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हे सर्व नागरिक ब्रिटनमध्ये येणा-या स्थलांतरितांविरोधात आंदोलन करत होते. गेल्या काही वर्षात ब्रिटनमध्ये स्थलांतरितांकडून होणा-या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. यातील काही स्थलांतरितांनी ब्रिटीश मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील अनेक मुली या वयानं लहान होत्या. शाळेतील मुलींना ब्लॅकमेलिंग करुन त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करणारी स्थलांतरितांची गँग ब्रिटनमध्ये काम करत असल्याचे उघड झाल्यानं त्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु झाली. ब्रिटीश संसदेतही याविरोधात आवाज उठवण्यात आला. (London)

मात्र या सर्वात स्टारमर सरकार कडक धोरण स्विकारत नसल्याचाही आरोप आहे. त्यातूनच आता ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात आंदोलन होऊ लागले आहे. या सर्वात टॉमी रॉबिन्सन यांचे नाव पुढे आले आहे. टॉमी रॉबिन्सन यांना युकेचे चार्ली कर्क म्हटले जाते. टॉमी रॉबिन्सन यांनी युनायटेड द किंगडम या नावाने आयोजित केलेली ही रॅली अलिकडच्या काळात उजव्या विचारसरणीच्या सर्वात मोठ्या रॅलींपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. रॅलीदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला, त्यात काही पोलीस अधिकारीही जखमी झाले. रॅलीत सहभागींनी युनियन जॅक आणि इंग्लंडचा ध्वज तसेच अमेरिका आणि इस्रायलचे ध्वज हाती धरले होते. (International News)

या निदर्शकांपैकी अनेकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ टोप्या देखील घातल्या होत्या. पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर मात्र या सर्वांनी टीका करत ते स्थलांतरितांना समर्थन करुन ब्रिटनच्या मुळ नागरिकांना अल्पसंख्यांक करत असल्याच्या घोषणा देण्यात आल्या. ही रॅली ज्यांनी काढली त्या, टॉमी रॉबिन्सन यांचे खरे नाव स्टीफन याक्सले-लेनन आहे. टॉमी यांनी राष्ट्रवादी आणि इस्लामविरोधी इंग्लिश डिफेन्स लीगची स्थापना केली आहे. त्यांना ब्रिटनमधील सर्वात प्रभावशाली उजव्या विचारसरणीच्या नेत्यांपैकी एक मानले जाते. स्थलांतरीतांच्या मुद्द्यासाठी 41 वर्षीय टॉमी अनेक माध्यमातून गेली काही वर्ष लढा देत आहेत. 2009 मध्ये त्यांनी इंग्लिश डिफेन्स लीगची स्थापना केली. रॉबिन्सनवर हल्ला, गहाणखत फसवणूक आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. 2018 मध्ये, त्यांना एका खटल्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला आहे. (London)

2024 मध्ये, त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 18 महिन्यांची शिक्षा झाली आहे. त्यांना आता एलॉन मस्क यांचा पाठिंबा आहे. मात्र 2018 मध्ये टॉमी यांना ट्विटरवरून (आता X) बंदी घालण्यात आली होती. पण एलॉन मस्कने यांची मालकी आल्यावर त्यांना पुन्हा एक्स प्लॅटफॉर्मवर घेण्यात आले. आता टॉमी यांचे X वर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या रॅलीमध्ये टॉमी यांच्यापाठोपाठ एलॉन मस्क यांनीही लक्ष वेधून घेतले आहे. रॅलीमध्ये एलॉन मस्क यांनी व्हिडिओ लिंकद्वारे भाषण दिले. ब्रिटनमधील अनियंत्रित स्थलांतरामुळे देशाची ओळख धोक्यात आली असून आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे सांगून त्यांनी उपस्थितांना लढा किंवा मरा असा थेट संदेश दिला आहे. (International News)

============

हे देखील वाचा :

Mars : मंगळावर जीवनाचे पुरावे !

==============

रॅलीदरम्यान मस्क यांनी कंझर्व्हेटिव्ह कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या हत्येचाही उल्लेख केला. ‘डाव्या विचारसरणीची हिंसक मानसिकता’ असे संबोधुन त्यांनी ब्रिटीश नागरिकांवर अशी वेळ येऊ नये असे वाटत असेल तर जागे व्हा, अशाही संदेश मस्क यांनी दिला आहे. मस्क आणि टॉमी रॉबिन्सन यांच्या भाषणामुळे भविष्यातही ब्रिटनमध्ये आता स्थलांतरितांना विरोध वाढणार आहे, हे स्पष्ट आहे. स्थलांतराचा मुद्दा सध्या ब्रिटनमध्ये सर्वात मोठा वादाचा ठरला आहे. या वर्षी आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोक लहान बोटींमधून इंग्लिश चॅनेल ओलांडून ब्रिटनमध्ये पोहोचले आहेत. त्यात दर महिन्याला वाढ होत आहे. या सर्वांचा भार ब्रिटिश नागरिकांवर येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे याबाबत आता स्टारमर सरकारचे धोरण काय राहिल, याकडे लक्ष लागले आहे. (London)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.