नेपाळमधील Gen-Z च्या आंदोलनाची धग आता शांत होऊ लागली आहे. केपी ओली सरकार बरखास्त करुन देशात पुढच्या सहा महिन्यात निवडणुका घेण्यासाठी आता या आंदोलकांचा आग्रह आहे. या सर्वात तरुणांनी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश असलेल्या सुशीला कार्की यांना आपला नेता म्हणून निवडले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर कार्की या नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. भारताचा मित्र देश म्हणून कायम नेपाळचे नाव घेतले जाते. (Nepal)
सुशीला कार्की यांचे शिक्षण बनारस येथील हिंदू विद्यापीठामध्ये झाले आहे. भारताबद्दल आस्था असलेल्या सुशीला कार्की या नेपाळच्या पंतप्रधान झाल्यास भारत आणि नेपाळ संबंधांमध्येही पुन्हा सलोखा येण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये दोन दिवसांच्या प्रचंड हिंसाचारानंतर आता लष्करानं सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक तरुणांनी सैन्यासोबत शांतता चर्चेसाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून शीला कार्की यांची निवड केली आहे. सुशीला कार्की यांचे नाव पुढे आल्यामुळे भविष्यात नेपाळमध्ये कायद्याचे राज्य येईल, अशी चर्चा आहे. (International News)
कारण अतिशय शिस्तप्रिय आणि कायद्याचा आदर करणा-या न्यायाधिश म्हणून शीला कार्की या नेपाळमध्ये ओळखल्या जातात. त्यांचे नाव पुढे आल्यानं आता शीला कार्कीच नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हमी नेपाळचे संस्थापक सुदान गुरुंग आणि काठमांडूचे महापौर बालेंद्र यांची नावं पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मागे पडली आहेत. राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांच्याशी झालेल्या चर्चेत जनरल-जी आंदोलकांनी सुशीला कार्की यांना देशाचे अंतरिम पंतप्रधान बनवण्याचा प्रस्ताव मांडला असून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या सचिवांनीही याला दुजोरा दिला आहे. यानंतर आता सुशीला कार्की भविष्यातील सर्व चर्चेत तरुण आंदोलकांकडून प्रतिनिधित्व करतील. सुशीला कार्की या भारतप्रेमी म्हणूनही ओळखल्या जातात. (Nepal)
कार्की एक प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 7 जून 1952 रोजी नेपाळच्या मोरांग जिल्ह्यातील बिराटनगर येथे झाला. सात भावंडांपैकी सर्वात मोठी बहिण म्हणून त्यांनी कुटुंबातही जबाबदारी निभावली आहे. कठोर परिश्रम, निष्पक्षता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर वृत्ती यामुळे सुशीला कार्की यांनी यशाची एक-एक पायरी चढली आहे. सुशीला कार्की यांनी नेपाळमधील बिराटनगर येथील महेंद्र मोरांग कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यानंतर, त्यांनी भारतामधील बनारस हिंदू विद्यापीठ मधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर काठमांडूच्या त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. शिक्षणानंतर सुशीला कार्की यांनी 1979 मध्ये वकिली सुरू केली. 2007 मध्ये त्या वरिष्ठ वकील झाल्या. 22 जानेवारी 2009 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 18 नोव्हेंबर 2010 रोजी त्या सर्वोच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीश झाल्या. (International News)
2016 मध्ये, तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखालील संवैधानिक परिषदेने सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली. त्यानंतर 13 एप्रिल 2016 रोजी सुशीला कार्की नेपाळच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश झाल्या. त्यानंतर 11 जुलै 2016 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सुशीला कार्की या 7 जून 2017 पर्यंत या पदावर होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून, सुशीला कार्की यांचा कार्यकाळ भ्रष्टाचाराविरुद्धच्या कठोर निर्णयासाठी ओळखला जातो. त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये निष्पक्ष आणि धाडसी निर्णय दिले. यामध्ये नेपाळ ट्रस्टविरुद्ध प्रेरणा राज्यलक्ष्मी राणा खटला, काठमांडू जिल्हा न्यायालयात पॉलिमर बँक नोटांशी संबंधित भ्रष्टाचार खटला आणि काठमांडू-निजगढ एक्सप्रेसवे यांचा समावेश आहे. न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचाराला शून्य सहनशीलता असावी, ही सुशीला कार्की यांची भूमिका आहे. (Nepal)
त्यामुळेच त्यांना कायम सामान्य जनतेकडून मोठा पाठिंबा मिळाला. अर्थात या धोरणामुळे सुशीला कार्की यांना अनेक वादांना तोंडही द्यावे लागले. 30 एप्रिल 2017 रोजी माओइस्ट सेंटर आणि नेपाळी काँग्रेसने संसदेत त्यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव सादर केला. मात्र यावर प्रचंड गदारोळ उठला. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. यावेळी सुशीला कार्की यांना मोठा जनपाठिंबा मिळाला. सर्वसामान्य नेपाळी नागरिक त्यांच्या पाठिशी उभे राहिले. सुशीला कार्की यांच्यासाठी जे आंदोलन उभे राहिले, त्यातून त्यांच्यावरील महाभियोग मागे घेण्यात आला. सुशीला कार्की यांचा विवाह नेपाळी काँग्रेसचे नेते दुर्गा प्रसाद सुबेदी यांच्याशी झाला आहे. बनारसमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची भेट झाली. आता याच सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार आहेत. यासाठी झालेल्या बैठकीत सर्वानुमते सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्का मारण्यात आला. (International News)
==========
हे देखील वाचा :
Nepal : जर नेहरु यांनी मान्य केले असते तर नेपाळ भारताचे राज्य असते…काय होता प्लॅन?
==========
आंदोलनक तरुणांनीही अनेक मागण्या केल्या आहेत. यात पंतप्रधान ओली आणि गृहमंत्र्यांना तातडीने अटक करावी आणि हत्याकांडाचे आदेश दिल्याबद्दल शिक्षा करावी, संघीय संसदेच्या निवडणुका 6 महिन्यांत जाहीर कराव्यात, न्यायालयीन चौकशी करावी आणि भ्रष्ट आणि घोटाळेबाजांना शिक्षा करावी, दोन महिन्यात नवीन संविधान जारी करावे, अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत. या सर्वात सुशीला कार्की यांची भूमिका महत्त्वाची रहाणार आहे, याची आंदोलकांना कल्पना होती. त्यामुळेच जनरल-झेड आंदोलकांनी सुशीला कार्की यांना आधीच काळजीवाहू पंतप्रधान बनण्याची ऑफर दिली होती. वास्तविक नेपाळच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये अन्यही चार नावे असली तरी आंदोलकांची पहिली पसंती सुशीला कार्की यांच्याच नावाला असल्यानं कार्की यांच्या हाती नेपाळची लवकरच सर्व सूत्र येतील अशी शक्यता आहे. (Nepal)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics