Home » Nepal : राजकारण्यांच्या मुलांच्या अतीलाडानं पडलं ओली सरकार !

Nepal : राजकारण्यांच्या मुलांच्या अतीलाडानं पडलं ओली सरकार !

by Team Gajawaja
0 comment
Nepal
Share

जनरेशन झेडने नेपाळमध्ये सरकार उलथवून टाकले आहे. तरुणांच्या या रागात नेपाळमधील सरकारी संपत्तीला मोठी झळ बसली आहे. राजकीय नेत्यांची खाजगी घरे आणि सरकारी निवासस्थानेही जाळण्यात आली आहेत. जनरल झेडचा सत्ताधारी वर्गाविरुद्धचा हा राग फक्त सोशल मीडियावर बंदी आणली होती, म्हणून होता का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र या रागामागे गेल्या अनेक वर्षापासूनचे राजकीय नेत्यांच्या घराणेशाहीचा एक भागही समाविष्ट आहे. जिथे नेपाळमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वात जास्त आहे, तिथे राजकीय नेत्यांची मुले परदेशात शिक्षण आणि अलिशान गाड्यांमधून नेपाळच्या रस्त्यावर फिरत असत. नेत्यांच्या मुलांचे आणि नातेवाईकांचे विलासी जीवन, घराणेशाही आणि भ्रष्टाचार यामुळे नेपाळमधील तरुणांच्या रागात भर पडत होती. त्यात कुणाची मेहुणी नेता बनली, कुणाची नातेवाईक राजदूत बनली या बातम्या ऐकून हे तरुण आपल्या देशात आपले भवितव्य काय, हा प्रश्न विचारत होते. रशिया-युक्रेन युद्धात नेपाळच्या तरुणांना पाठवले गेले, मात्र त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर त्यांचे मृतदेहही परत आणण्यात ओली सरकारला अपयश आले. त्यातूनच तरुणांमध्ये राग वाढत गेला. (Nepal)

त्याला निमित्त ठरले ते सोशल मीडियावर घातलेल्या बंदीचे. वर्षानुवर्षे बेरोजगारीमध्ये पिचलेल्या या तरुणांनी नेत्यांच्या मुलांविरुद्ध याच सोशल मडियाच्या माध्यमातून #PoliticiansNepoBabyNepal हे हॅशटॅग चालवले होते. या माध्यमातून काठमांडूच्या रस्त्यावर एका रात्रीत हजारो तरुण उतरले आणि अवघ्या दोन दिवसाच्या आंदोलन ओली सरकार स्वाहा झाले. नेपाळमध्ये तरुणांचे आंदोलन झाले आणि हजारो तरुण रस्त्यावर उतरले. सुरुवातीला हा राग सरकारच्या सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे असल्याचे वाटत होते. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे, राजकीय नेत्यांची घराणेशाही. भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांच्या कुटुंबांची वाढती मक्तेदारी यामुळे नेपाळी जनता कंटाळली होती. त्याविरुद्ध अलिकडेच नेपाळमध्ये #NepoKid हा ट्रेंड व्हायरल झाला होता. (Latest International News)

यात अनेकांनी नेत्यांच्या मुलांच्या विलासी जीवनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, परदेशी शिक्षण आणि सुट्ट्यांसाठी परदेशातील महागड्या हॉटेलमध्ये रहाणा-या नेत्यांच्या मुलाचे फोटो यातून शेअर कऱण्यात आले होते. सोबतच या सर्वाची तुलना सर्वसामान्य नेपाळी तरुणांबरोबर करण्यात येत होती. नेपाळमध्ये सर्वाधिक बेरोबजगारी आहे. असे असतांना मंत्र्यांची मुले 12 ते 15 लाखांचे शूज घालून फोटो सेशन करीत होती. या सर्वांमुळे सामान्य नागरिक संतप्त झाले. त्यामुळेच आंदोलनात संसद ताब्यात घेतल्यावर तरुणांनी आमचा कर, देशाची संपत्ती अशा आशयाच्या घोषणा दिल्या. आता जळलेल्या या सरकारी इमारतींवरही आंदोलकांनी अशाच आशयाचे संदेश लिहून ठेवले आहेत. त्यावरुन नेपाळी तरुणांच्या मनात किती खोलवर या भ्रष्टाचारची चिड होती, हे स्पष्ट होत आहे. (Nepal)

नेपाळच्या राजकारणातील कुटुंबभाव राजधानीपासून गावागावांपर्यंत पसरलेला आहे. देउबा कुटुंबातील अनेक सदस्य नेपाळी काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. केपी ओली यांच्या मेहुणी डॉ. अंजन शाक्य यांना राष्ट्रीय सभेचे सदस्य बनवण्याची शिफारस करण्यात आली तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांना संविधानाच्या विशेष नियमात नियुक्त केले. यापूर्वी, डॉ. शाक्य यांना इस्रायलचे राजदूत बनवण्यात आले. मात्र त्यांच्या नियुक्तीवर कायम प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ऑस्ट्रेलिया, कतार, बांगलादेश आणि स्पेनमधील नेपाळच्या राजदूतांची निवडही पात्रता बघून नाही तर ते कुठल्या नेत्याचे नातेवाईक आहेत, याच निकषावर झाली. या महत्त्वाच्या निवडीमध्ये पात्र लोकांना दुर्लक्षित करण्यात आले. महेश दहल यांना ऑस्ट्रेलियाचे राजदूत बनवण्यात आले. ते माओवादी नेते पुष्प कमल दहल प्रचंज यांचे जवळचे नातेवाईक आहेत. पण त्यांचा राजनैतिकतेचा अनुभव अल्प होता. नारद भारद्वाज यांना कतारला पाठवण्यात आले. ते केपी शर्मा ओली यांचे विश्वासू होते. दावा फुटी शेर्पा यांना स्पेनचे राजदूत बनवण्यात आले, त्या पर्यटन व्यवसायाशी संबंधित पार्श्वभूमीतून आल्या आहेत. परंतु त्यांच्याकडे राजनैतिक पात्रता नाही. पूर्वी आरोग्य राज्यमंत्री असलेले बंसीधर मिश्रा यांना बांगलादेशला पाठवण्यात आले. त्यामुळेच फक्त राजकीय नेत्यांचे नातेवाईकच अशा नियुक्तीसाठी पात्र आहेत का, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. (Latest International News)

यामुळे सोशल मीडियावर #NepoKid, #NepoBaby आणि #PoliticiansNepoBabyNepal हे हॅशटॅग ट्रेंड व्हायरल झाले. यातून राजकीय नेत्यांची मुले जे अलिशान जीवन जगत आहेत, त्यात सामान्य नागरिकांच्या कराचा पैसा असल्याचे सांगण्यात येऊ लागले. त्यातही नेपाळच्या तरुणांना रशिया आणि युक्रेन युद्धात वापरण्यात आले. नेपाळी तरुणांना रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडण्यात आले. पण जे तरुण रशियन सैन्यात गेले, ते मारले गेले. पण या नेपाळी तरुणांचे मृतदेह युक्रेनमधून परत आणता आले नाहीत. ओली सरकार त्यांचे मृतदेह आणण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सोशल मिडियावर अधिक संपात व्यक्त होऊ लागला. कारण अशाच वेळी राजकीय नेत्यांची मुले नेपाळच्या रस्त्यावर अलिशान गाडीमधून फिरत होती. (Nepal)

=========

Nepal : भारतावर ताबा मिळवणाऱ्या मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?

Nepal : त्रिकोणी राष्ट्रध्वज असणारा एकमेव देश

=========

परदेशात शिक्षण घेणारी ही मुले फिरण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करीत होती. मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या मुलांची ऐश आपल्या पैशावर होत आहे, मात्र आपल्याला आपल्या कराच्या पैशाचा काहीही उपयोग होत नाही, अशा आशयाचे मेसेज ट्रेंड होऊ लागले. हा उद्रेक वाढत असतांना सरकारनं सोशल मिडियावर बंदी घातली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बेराजगारीनं पिचलेल्या नेपाळी युवकांनी अवघ्या दोन दिवसात या राजकीय नेत्यांची मस्ती उतरवली. आता हेच मंत्री देशाबाहेर पळाले आहेत, आणि जे देशात आहेत, ते सैन्याच्या संरक्षणगृहामध्ये आहेत. बहुतेकांच्या खाजगी मालमत्ता नष्ट कऱण्यात आल्या आहेत. सर्वच देशातील राजकीय नेत्यांनी नेपाळच्या या तरुणवर्गाच्या आंदोलनामागील नेपोकिडची वास्तविकता जाणून घ्य़ायला हवी. (Latest International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.