लहानपणापासून आपण खूपदा ऐकतो की अमुक अमुक वाईट गोष्ट केली तर आपल्याला पापं लागतं आणि नरकात जावं लागतं! आणि तिथे खूप भयानक वेगवगेळ्या शिक्षा असतात, गरम तेलात टाकतात, कधी जाळतात, तर कधी आणखी काही. आपण कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. पण मग मनात प्रश्न येतो हा नरक खरंच असतो कुठे ? पृथ्वीखाली खोलवर असं काही खरंच असेल का ? कुणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल का ? हीच उत्सुकता २००२ साली एका अमेरिकन रेडिओ शोमध्ये शिगेला पोहोचली. “कॉस्ट टू कॉस्ट” नावाच्या रेडिओ शोवर एका श्रोत्याने एक ऑडिओ क्लिप पाठवली. त्या क्लिपमध्ये किंचाळणाऱ्या माणसांचे आवाज ऐकू येत होते. त्या श्रोत्याने सांगितलं हे रेकॉर्डिंग रशियातल्या सायबेरियातील एका विहिरीतून मिळालय. अशी विहीर जी थेट नरकात जाते! रशियाच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी सायबेरियात ही विहीर खोदली होती आणि जेव्हा त्यांनी मायक्रोफोन आत सोडले तेव्हा नरकात शिक्षा भोगणाऱ्या आत्म्यांचे आवाज ऐकू आले!” आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये खरंच माणसांच्या किंचाळण्याचे आवाज होते. त्यानंतर ही “नरकाची विहीर” जगभर चर्चेत आली. पण खरंच अशी कुठली विहीर होती का? ती आजही आहे का? आणि नसेल तर तीच नेमकं काय झाल? जाणून घेऊ. (Russian Mystery)
तर असं म्हटलं जातं की सायबेरियात, कायम बर्फाच्छादित असलेल्या एका ठिकाणी, रशियाच्या शास्त्रज्ञांनी सुमारे ८.९ मैल खोलवर एक विहीर खोदली. खोदकाम चालू असताना ड्रिल अचानक तरंगायला लागलं. तेव्हा जिओलॉजीस्टना लक्षात आलं की खाली एक पोकळ अवकाश आहे. त्यांनी लगेच तापमान मोजलं आणि त्यांना धक्का बसला कारण ते तापमान तब्बल २००० डिग्री फॅरेनहाईट होतं! यानंतर त्यांनी खास मायक्रोफोन्स आत सोडले. काही सेकंदातच मायक्रोफोन वितळले, पण त्याआधी त्यांनी एक विचित्र आवाज रेकॉर्ड केला. हा आवाज म्हणजे लोकांच्या किंचाळ्या होत्या! जणू कोणी भयंकर यातना सहन करतंय. ही घटना बाहेर येताच लोकांना खात्री पटली की नरक अस्तित्वात आहे. काहीजण तर म्हणाले की त्या विहिरीतून धुराचा लोळ बाहेर आला होता आणि त्याने आकाशात “I have conquered” असं लिहिलं होतं! काहींचा दावा होता की तो धूर वटवाघळाच्या आकारात बदलला. अशा कथा पसरताच लोकांमध्ये भीती आणि अफवा आणखी वाढत गेल्या.
पण खरंच रशियाने अशी नरकात जाणारी विहीर खोदली होती का? तर शीतयुद्धादरम्यान अमेरिका आणि रशिया यांच्यात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू होती. दोघांपैकी सगळ्यात आधी कोण अवकाशात झेप घेतो इथपासून ते सर्वांत आधी पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत कोण पोहचत, यात अटीतटीची लढत सुरू होती. यावेळी पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल संशोधन करण एवढाच या मोहिमांचा हेतू नव्हता तर पृथ्वीच्या पोटात असणाऱ्या सगळ्या खनिज साठ्यावर कब्जा मिळवण्यासाठी दोन्ही महासत्तांचा हा आटापिटा सुरू होता. त्यावेळी रशियात या मोहिमेची धुरा ज्या शास्त्रज्ञाने सांभाळली होती त्यानेच पुढे या रहस्यमय विहिरीबद्दलसुद्धा माहिती दिली असं म्हटलं जात.(Russian Mystery)
पण १९९० मध्ये “क्रिश्चन टुडे” या न्यूज पेपरने या अफवांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं रशियात सायबेरियात अशी कोणतीही नरकात जाणारी विहीर नाही. आणि २००० डिग्री फॅरेनहाईट एवढ्या उष्णतेत तग धरू शकेल असं साधन आजवर कुणी बनवलंच नाही. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे ज्या ऑडिओ क्लिपमुळे ही अफवा पसरली, त्यातले आवाज खरे नव्हतेच! ते १९७२ सालच्या “बेऱन ब्लड” नावाच्या हॉलीवुड मूव्ही मधून घेतलेले होते. म्हणजेच ही सगळी स्टोरी खोटी होती आणि लोकांनी यावर विश्वास ठेवला होता. (Russian Mystery)
==================
हे देखील वाचा : KP Sharma Oli : नेपाळ सरकारला हादरा देणारे सुदान गुरुंग
==================
पण मग ही स्टोरी नेमकी आली कुठून? तर १९७० साली रशियाने “कोला सुपर्डीप बोरहोल” नावाचा प्रकल्प सुरू केला होता. ही विहीर सायबेरियात नसून रशियाच्या कोला पेनिन्सुला भागात होती. तिचा उद्देश होता पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल अधिक जाणून घेण. १९७८ ते १९९२ पर्यंत हे खोदकाम चाललं. २००५ पर्यंत ते तब्बल १६,६११ मीटर खोदण्यात यशस्वी झाले. ही आजवरची मानवाने केलेली सर्वात खोल खोदकामाची नोंद आहे असं म्हटलं जातं. या मोहिमेत शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या पोटातील अनेक रहस्यांचा शोध लावला. मात्र, त्यात नरकाचा काहीही संबंध नव्हता. मग हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न उरतो नरक खरंच आहे का? असेल तर कुठे आहे? पृथ्वीच्या खाली, की आपल्या कल्पनांमध्ये? आता याच उत्तर काहीही असो. पण फेमस लेखक नील गेमन याचं एक वाक्य आहे “I think hell is something you carry around with you, not somewhere you go!” थोडक्यात म्हणजे नरक हे एखाद ठिकाण नाही, तर आपणच आपल्या मनात बाळगलेली भीती आहे. म्हणूनच नरकाची विहीर ही गोष्ट खरी नसली तरी तिने लोकांच्या कल्पनाशक्तीला जोरदार खाद्य पुरवलं एवढं मात्र नक्की !
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics