पाणीपुरी सारखी वागतात स्वप्न देखील कधी कधी
काही ढासळतात ओढांशी नेता नेता अनपेक्षितपणे हातातच
अन मग सलत रहातात परीटघडीच्या शर्टावरल्या डागांसारखी आयुष्यभर…
तर काही झणझणीत ठसका देतात…
प्राण कंठाशी येऊन डोळे डबडबून येईस्तो
ब्रह्मांड दाखवतात त्या तेवढ्या एका क्षणात…
लेखक, स्तंभलेखक, गितकार, छायाचित्रकार, व्यंगचित्रकार, अभिनय अशा सर्व क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारं व्यक्तीमत्व म्हणजे, गुरु ठाकूर.. या सर्वांत मास्टरी असणारे गुरु ठाकूर प्रत्यक्षात मात्र सर्वांत राहूनी, सर्वांपासून अलिप्त मी, असे असतात. लहानपणी अबोल असलेल्या गुरुंनी आता अनेकांच्या ओठी दर्जेदार गाणी दिली आहेत.
गुरु ठाकूर यांचं बालपण दादरमध्ये गेलं. गुरुनाथ ठाकूर हे त्यांचं नाव. पुढे गुरु म्हणून त्यांचा उल्लेख होऊ लागला. लहानपणी गुरु अतिशय अबोल होते. एवढे की, कोणाकडे आईबरोबर गेले की, त्यांना संशय यायचा हा मुलगा मुका आहे की काय. या अबोलपणामुळे फारसे मित्र नव्हते. चित्रकला आणि वाचन यांना मात्र त्यांनी मित्रांसारखं जपलं. त्यांच्या आईलाही भरपूर वाचनाची सवय होती. घरात पुस्तकंही भरपूर होती. त्यामुळे लहानपणापासून खूप वाचन झालंच. शिवाय चित्रकलेचाही तेवढाच सराव झाला. त्यांच्याघरी कोणी पाहुणे आले की गुरु त्यांची चित्र काढून ठेवत असत. आई घरी आली की, ही चित्र त्यांच्यासमोर ठेवत. या चित्रकलेसोबत आणखी व्यक्ती गुरुंच्या सोबत होती. ती म्हणजे आर. के, लक्ष्मण. आर. के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे त्यांना व्यसन लागले. अशी चित्र आपल्यालाही काढता यावीत म्हणून गुरु अनेकवेळा प्रयत्न करायचे. या सरावाचा त्यांना भविष्यात खूप फायदा झाला.
यासोबतच गुरु यांच्यावर कोकणाचेही संस्कार झाले. मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये ते आपल्या भावंडासोबत गावी, कोकणात जात. सगळी भावंड एकत्र असली की, गाण्यांच्या भेंड्या खेळल्या जायच्या. गुरुंची गाणी पाठ नसायची. पण त्यांची चाल त्यांना माहीत असायची. मग आपल्यावर भेंडी चढू नये म्हणून गुरु आपल्याला येत असलेल्या चालीमध्ये चपखल बसतील असे दुसरे शब्द बसवून ती गाणी सादर करायचे. ही गाणी एवढी बरोबर असायची की त्यांची ही हेराफेरी शक्यतो कोणाच्याही लक्षात यायची नाही. एकदा असंच गाणं बोलत असतांना त्यांच्या काकांनी त्यांना पकडलं. पण गुरु यांनी मुळ गाण्यात असं कडवं आहे, हे सांगून ती वेळ मारुन नेली होती. त्यांचे आजोबा ज्ञानेश्वरी वाचायचे. सुट्टीचे तीन महिने किमान अर्धा तास तरी गुरु आजोबां वाचत असलेली ज्ञानेश्वरी ऐकायचे. या सर्वांतून शब्दांचा मोठा साठा झाल्याचे गुरु सांगतात. त्यांची पहिली कविता ही सुद्धा कोकणात, आजोळी त्यांनी रचली. मे महिन्यात अचानक आलेल्या वळवाच्या पावसात त्यांना ही कविता सुचली…
ओले ती सांज कुंद धुंद गारवा…
सरसरती सर वेडी छेडी मारवा…
गुरु ठाकूर कॉलेजमध्ये असतांना त्यांचा अबोल स्वभाव थोडा बदलला. नाटकांत, स्पर्धांमध्ये ते सहभागी होऊ लागले. त्यांच्या व्यंगचित्र काढण्याच्या सवयीनं हा बदल घडवून आणला. एकदा वर्गात व्यंगचित्र काढतांना त्यांनी प्राध्यापकांनी पकडलं. या प्राध्यापकांनी त्यांना थेट प्राचार्यासमोर उभं केलं. प्राचार्य हे व्यंगचित्र पाहून खूष झाले. त्यांनी कॉलेजमधल्या सर्व प्राध्यापकांची अशी व्यंगचित्र काढायला गुरुंना सांगितले. या व्यंगचित्रांना कॉलेजच्या मासिकात प्रसिद्धी मिळाली. शिवाय गुरु यांनी लिहीलेले विडंबन काव्यही या मासिकात प्रसिद्ध झाले. ही घटना त्यांच्यासाठी खूप मोठी होती. यानंतर गुरु कॉलेजमधील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. मित्रांच्या घोळक्यात विडंबन गित सादर करु लागले. मॉडेलिंगमध्येही त्यांनी प्रवेश केला.
यातून त्यांची लिखाणाची आवडही वाढली. व्यंगचित्रांबरोबर त्यांची मार्मिक टिप्पणी एवढी चोख असायची की, त्यांना वृत्तपत्रांमध्ये कॉलम लिहिण्याचा आग्रह झाला. मार्मिक, तरुण भारत, पुढारी, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ या वर्तमानपत्रात त्यांनी व्यंगचित्रकार आणि स्तंभलेखक म्हणून काम केले आहे. यातूनच त्यांना हसा चकटफू. ही मालिका मिळाली. यातील गुरुंनी लिहिलेले खुसखुशीत संवाद लोकप्रिय ठरले. संवादलेखक आणि पटकथा लेखक म्हणून त्यांची ओळख झाली ती श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेनं.. अगदी सर्वमासान्यांच्या घरात असलेले संवाद बोलणारे हे टिपरे कुटंब अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले.
गुरु लिखाणाच्या क्षेत्रात चौफेर झेप घेत होते. त्यांनी तू तू मी मी, आता होऊनच जाऊद्या, म्हातारे जमीन पर ही नाटकं लिहीली. मच्छींद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनसाठी त्यांनी भैया हातपाय पसरी हे नाटक लिहीलं. कोकणातील सद्य परिस्थितीवर बोट ठेवणारं हे नाटक प्रचंड गाजलं. लहानपणापासून कोकणात घालवलेली सुट्टी…त्यात केलेले माणसांचे, त्यांच्या बोली भाषेचे निरीक्षण येथे कामी आले.
गुरु ठाकूर यांचे कोकणावर प्रचंड प्रेम. या सर्व लिखाणात कोकणावरील त्यांची एक कविता आली, आणि रसिकांच्या मनात बसली.
पाचूच्या रानात, झिंबाड पाऊस…उनाड, अल्लड वारा…
नारळी पोफळी शिरल्या आभाळी….वाळूत चांदणं चोरा…
यातूनच टिव्हीवरील मालिकांची शिर्षकगीतं गुरु ठाकूर यांच्या शब्दात येऊ लागली. जगावेगळी, असंभव,कुलवधू, प्राजक्ता या मालिकांची शिर्षकगीतं गुरुंनी केली. पुढे चित्रपटासाठी गाणं लिहायची जबाबदारी त्यांच्यावर येऊ लागली. केदार शिंदे यांच्या अग्गबाई अरेच्चा या चित्रपटांची गाणी गुरु यांनी लिहीली. चित्रपटांसाठी गित लिहितांना चालींचा आधी विचार करावा लागतो. गुरु यांच्यासाठी हे नविन तंत्र होतं. ते आत्मसात झाल्यावर गुरुंनी मागेवळून पाहिलं नाही. अग्गबाई अरेच्यामधील गाण्याला शंकर महादेवन यांचा आवाज मिळाला. तर अजय अतुल यांचं संगीत. यातील गाणी अद्यापही रसिकांना तेवढीच सुखावत आहेत.
नटरंग या चित्रपटानं गुर ठाकूर यांच्या शिरशेपात मानाचा तुरा रोवला. या चित्रपटातील संवाद त्यांनी लिहीले. चित्रपटात त्यांनी लहानशी भूमिका केली. शिवाय गाणी तर लिहिलीच. त्यांनी लिहिलेल्या गाण्याला अजय-अतुल यांनी संगितबद्ध केलं. आजही अवघा महाराष्ट्र नटरंगची गाणी लागली सर्व विसरुन त्यात एकरुप होतो. यासाठी गुरु ठाकूर यांनी लोककलाकारांचा अभ्यास केला. पठ्ठे बापूराव, शाहीर रामजोशी यांच्या काव्याचा अभ्यास केला. लावणी लिहीतांना ती मूळ ठाच्यात असेल असा प्रयत्न केला. त्यांच्या या लेखनशैलीचे ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप, संगीतकार श्रीनिवास खळे यांनीही कौतुक केले. गुरु हा सर्वात मोठी पावती मानतात.
नटरंगमध्ये लावणी लिहिणा-या गुरु यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, या चित्रपटात अप्रतिम पोवाडा लिहीला. अवघ्या दहा मिनीटात या पोवाड्याची त्यांनी रचना केली हे विशेष….नारबाची वाडी या चित्रपटात त्यांनी कोकणी बाजातील गाणी लिहीली.. तर रिंगा रिंगा या चित्रपटात गोव्यातील कार्निवल गीत लिहीलं…गोलमाल, मातीच्या चुली, घर दोघांचे, लेक लाडकी, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, सुंदर माझे घर, ऑक्सीजन, मर्मबंध, शिक्षणाच्या आईचा घो, झेंडा, क्षणभर विश्रांती, लालबाग परळ, सिटी ऑफ गोल्ड, अगडबम, जय महाराष्ट्र भटिंडी धाबा, बालकपालक, मंगलाष्कट्क वन्स मोअर, टाईमपास यासारख्या चित्रपटातून गुरु ठाकूर आपल्याला भेटले. आणि त्यातील गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य करु लागले.
गुरु ठाकूर यांच्या लिखाणात विविधता आहे. गुरु या सर्व शब्दांचा साठा आपल्या निरीक्षणातून करतात. कुठल्याही गावी गेल्यावर तिथल्या लोकांची देहबोली, बोलीभाषा याची ते मनात नोंद करतात. मग संवाद लिहीतांना, गाणी लिहीतांना त्याचा त्यांना फायदा होतो.
मराठीमध्ये एकापेक्षा एक गाणी लिहीणारे, पटकथा लिहिणारे गुरु ठाकूर त्यांच्या कवितांमधून आपल्याला जगण्याचा मंत्रच देतात…या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे त्रस्त झालेले नागरिक दिसत आहेत. कधी हे चित्र बदलेल का या विवंचनेत असतांना गुरु ठाकूर यांची एक कविता आपल्या सर्वांना निश्चितच मार्गदर्शक ठरते. माणसांनं जगावं कसं हे आपल्या असे जगावे या कवितेतून सांगतांना गुरु म्हणतात…
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची….भीती आंधळी ता-यांची
आयुष्याला भिडतांनाही चैन करावी स्वप्नांची…
असे दांडगी इच्छा ज्याची…मार्ग तयाला मिळती सत्तर…
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…
शब्दांची श्रीमंती उधळणा-या गुरु ठाकूर यांना कलाकृती मिडीयातर्फे लाखो शुभेच्छा…
-सई बने…