Home » Six Triple Eight : दुसऱ्या महायुद्धात इतिहास रचणाऱ्या 6888 महिला बटालियन…

Six Triple Eight : दुसऱ्या महायुद्धात इतिहास रचणाऱ्या 6888 महिला बटालियन…

by Team Gajawaja
0 comment
Six Triple Eight
Share

बॉर्डर सिनेमामधलं संदेसे आते है, हे गाणं ऐकलं की, आजही बऱ्याच जणांच्या डोळ्यात अश्रु येतातच. याचं कारण म्हणजे त्या गाण्याचं संगीत आणि त्या गाण्याचा अर्थ! या गाण्यात जे संदेस म्हणजे सैनिकाला घरातून आलेलं पत्र हा खरा इमोश्नल पॉइंट आहे. मग यात फक्त भारतच नाही, कोणत्याही देशाचा सैनिक असेल. त्या प्रत्येकाचंच त्या त्या पत्राशी खूप खोल नातं असतं.

१९४४ साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याच्या वुमन्स आर्मी कॉर्प्स WAC अंतर्गत एक वेगळंच युनिट तयार झालं होतं, ते यूनिट म्हणजे ‘सिक्स ट्रिपल एट सेंट्रल पोस्टल डिरेक्टरी बटालियन’, ज्याला “सिक्स ट्रिपल एट” म्हणून ओळखलं जायचं. हे युनिट तसं खासच होतं, कारण हे एकमेव असं युनिट होतं, ज्यात फक्त कृष्णवर्णीय स्त्रिया होत्या आणि त्यांना या युद्धाच्या काळात युरोपात पाठवलं गेलं होतं. आता तेव्हा काय आणि आज काय? अमेरिकेत वर्णभेद आजही आहे. कृष्णवर्णीयांवर आजही अत्याचार होत असतातच. आता परत स्टोरी कडे येउयात. हे सिक्स ट्रिपल एट जवळपास ८५५ आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय स्त्रियांचं युनिट होतं. आता प्रश्न नक्कीच पडला असेल की, त्या लेटर्सचा आणि सिक्स ट्रिपल एट युनिटचा काय संबंध? ते आपण जाणून घेणारच आहोत पण त्यांच्या या कामामुळे तेव्हा सैनिकांचं मनोबल वाढलं आणि सिक्स ट्रिपल एट युनिटचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. (Six Triple Eight)

७ डिसेंबर १९४१ ला पर्ल हार्बरवर जपानने हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. तेव्हा स्त्रिया आर्मीत नव्हत्या. पण १५ मे १९४२ ला प्रेसिडेंट फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी वुमन्स आर्मी ऑक्झिलरी कॉर्प्स (WAAC) तयार केलं, ज्याला नंतर १ जुलै १९४३ ला वुमन्स आर्मी कॉर्प्स (WAC) असं नाव मिळालं. यामुळे कृष्णवर्णीय स्त्रियांना आर्मीत सामील होण्याची संधी मिळाली. तरीसुद्धा हे इतकं सोप्पं नव्हतं. सिव्हिल राइट्स अॅक्टिविस्ट मेरी मॅक्लॉड बेथ्यून आणि फर्स्ट लेडी एलिनॉर रुझवेल्ट यांनी खूप प्रयत्न केले आणि कृष्णवर्णीय स्त्रियांना युरोपात पाठवण्याचा निर्णय झाला. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये सिक्स ट्रीपल एट बटालियनची स्थापना झाली. यात ८२४ सैनिक आणि ३१ ऑफिसर्स होत्या आणि त्यांचं नेतृत्व केलं मेजर चॅरिटी ॲडम्स यांनी, ज्या WAC मध्ये कमिशन मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्रिया होत्या. चॅरिटी वयाच्या २३ व्या वर्षी, कोलंबियाच्या साउथ कॅरोलिनात ज्युनियर हायस्कूलमध्ये गणित आणि विज्ञान शिकवत होत्या, तेव्हा त्यांना एक इन्विटेशन मिळालं ते म्हणजे WAACमध्ये सामील व्हायचं. त्यांनी ही संधी सोडली नाही. (Top Stories)

सिक्स ट्रिपल एट च्या स्त्रिया जॉर्जियातल्या फोर्ट ओगलथॉर्प येथे ट्रेनिंगसाठी गेल्या. तिथे त्यांनी बेसिक कॉम्बॅट ट्रेनिंग, गॅस मास्क वापरण्याचं ट्रेनिंग आणि अडथळ्यांमधून मार्ग कसा काढायचा याचं ट्रेनिंग घेतलं आणि इथेच त्यांना recismचा वाईट अनुभव आला. ऑफिसर्स क्लबमध्ये प्रवेश नाकारणं, काही पुरुष ऑफिसर्सचे अपमानास्पद टोमणे, हे सगळं त्यांना सहन करावं लागलं. ज्या स्त्रिया याच्या विरोधात उभ्या राहायच्या त्यांना शिक्षा मिळायची. या सगळ्या अडचणींवर मात करत त्या आयल डी फ्रान्स या जहाजाने युरोपकडे रवाना झाल्या. (Six Triple Eight)

Six Triple Eight

प्रवासात जर्मन यू-बोट्सनी त्यांच्या जहाजाचा पाठलाग केला, पण जहाजाने मार्ग बदलला आणि ११ फेब्रुवारीला स्कॉटलंडला त्या सुरक्षित पोहोचल्या. मग तिथून ट्रेनने त्या बर्मिंगहॅम गेल्या. बर्मिंगहॅमला पोहोचताच सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांना एक भलतंच मोठं आव्हान समोर आलं. सहा वेअरहाउस भरपूर पत्रांनी आणि पार्सलांनी भरलेल्या होत्या, काही तर दोन-तीन वर्षांपासून तशाच होत्या. त्यामुळे भरपूर अंधार आणि तो उंदरांचा अड्डा झाला होता. खिडक्यांना काळा रंग फासलेला, कारण जर्मन हवाई हल्ल्यांचं टेन्शन होतं. त्यामुळे अंधारात काम करताना डोळ्यांना ताण यायचा आणि तिथे प्रचंड थंडी आणि त्यात हिटरचा पत्ताच नाही. या सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी स्की पॅंट्स, फील्ड जॅकेट्स चढवले आणि कामाला लागल्या! (Top Stories)

आता मोठा टास्क सुरु झाला. पत्र सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेली होती. काही पत्रांवर फक्त पहिलं नाव, काहींवर टोपणनाव, किंवा फक्त “ज्युनियर, यूएस आर्मी” असं लिहिलेलं आणि तब्बल ७५००० रॉबर्ट स्मिथ नावाचे सैनिकांची पत्र होती! आता सत्तर लाख सैनिक आणि कर्मचाऱ्यांना पत्रं पोहोचवायची, हे कामसाधं सोप्पं नव्हतं. पण सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांना हार कशी मानतात हे माहीतच नव्हतं! त्यांनी प्रत्येकाच्या सिरियल नंबरसह ७० लाख कार्ड्सचा इंडेक्स बनवला, ज्यामुळे एकाच नावाच्या माणसांना ओळखणं सोपं झालं! (Six Triple Eight)

तीन-तीन तासांच्या तीन शिफ्ट्स, आठवड्याचे सातही दिवस आणि प्रत्येक शिफ्टला ६५००० पत्रं हाताळायची! असं काम सुरु होतं. त्यांचाकडे या कामासाठी सहा महिन्यांचा वेळ होता, पण या स्त्रियांनी बर्मिंगहॅमचा बॅकलॉग फक्त तीन महिन्यांतच साफ केला! बर्मिंगहॅमच्या मंडळींनी त्यांना घरी जेवायला बोलवलं. पण इथेही त्यांना त्रास दिला जायचा, याचं कारण म्हणजे त्या कृष्णवर्णीय होत्या. अमेरिकन रेड क्रॉसने कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी इतरांपेक्षा वेगळी सुविधा उभारली, पण मेजर ॲडम्सनी त्याचं स्वतःचं फूड हॉल, हेअर सलून आणि रिफ्रेशमेंट बार उभारलं. म्हणजे जगायचं तर अभिमानाने जगायचं.

१९४५ मध्ये जर्मनीने शरणागती पत्करली आणि सिक्स ट्रिपल एट फ्रान्सच्या रूआँला पोहोचल्या. इथेही तीन वर्षांचा बॅकलॉग साफ करायचा होता. रूआँतल्या लोकांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं. या स्त्रियांनी जोन ऑफ आर्कच्या स्मरणार्थच्या परेडमध्येही भाग घेतला. पण इथेही अडचणी होत्या. युद्ध संपलं होतं, त्यामुळे सैनिक रूआँत फिरायला यायचे आणि काहींनी या स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात केली. WAC मिलिटरी पोलिसांना बंदुका द्यायला आर्मीने नकार दिला, मग काय? सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी जुजुत्सु शिकून स्वतःचं संरक्षण केलं. म्हणजे त्या फायटर्सही होत्या!

रूआँतला बॅकलॉग त्यांनी फक्त पाच महिन्यांत साफ केला आणि ऑक्टोबर १९४५ मध्ये त्या पॅरिसला गेल्या. पण युद्ध संपलं होतं, त्यामुळे युनिटची संख्या ८५० वरून ५५८ वर आली आणि डिसेंबर १९४४ मध्ये आणखी २०० बाया डिस्चार्ज झाल्या. तरीही, हॉलिडे मेलचा ढीग त्यांनी हाताळला. पण रूआँत असताना एकवाईट घटना घडली. ८ जुलै १९४५ ला एका जीप अपघातात सिक्स ट्रीपल एटच्या तीन स्त्रिया – PFC मेरी एच. बँकस्टन, PVT मेरी ज्युएल बार्लो आणि SGT डोलोरेस मर्सिडीज ब्राउन यांचा मृत्यू झाला. यावर आर्मीकडे त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी पैसे नव्हते, पण सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी मिळून पैसे गोळा केले आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले. (Six Triple Eight)

===============

हे देखील वाचा : First Plastic Surgery : एका मराठी माणसामुळे पार पडली जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी !

===============

फेब्रुवारी १९४६ मध्ये सिक्स ट्रिपल एट अमेरिकेत परतल्या. पण घरी परतल्यावर देखील त्यांच्या कामाची कोणीच दखल घेतली नाही. मग बऱ्याच वर्षांनी त्यांच्या कामाची दखल घेतली गेली ती म्हणजे २००९ मध्ये वुमन्स इन मिलिटरी सर्व्हिस फॉर अमेरिका मेमोरियल, ॲर्लिंग्टन येथे त्यांचा सत्कार झाला, जिथे ॲलिस डिक्सन, मेरी रॅगलँड आणि ग्लॅडिस शस्टर कार्टर उपस्थित होत्या. २०१६ मध्ये त्यांना यूएस आर्मी वुमन्स फाउंडेशन हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालं. २०१८ मध्ये फोर्ट लिव्हनवर्थ येथे स्मारक उभारलं गेलं आणि २०२२ मध्ये त्यांना अमेरिकेतला सर्वोच्च सिव्हिलियन सन्मान काँग्रेशनल गोल्ड मेडल मिळालं. पण तोवर फक्त सहाच स्त्रिया जिवंत होत्या. त्यांना युरोपियन आफ्रिकन मिडल ईस्टर्न कॅम्पेन मेडल, गुड कंडक्ट मेडल आणि वर्ल्ड वॉर टू व्हिक्ट्री मेडल मिळालं. २०१९ मध्ये आर्मीने त्यांना मेरिटोरियस युनिट कमेंडेशन दिलं. म्हणजे तब्बल ६० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला त्यांची दखल घ्यायला. (Six Triple Eight)

सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी फक्त १७५ लाख पत्रं आणि पार्सल वाटलंच नाही, तर वर्णभेद आणि लिंगभेदाची रेष पुसून टाकली. त्यांनी दाखवून दिलं की कृष्णवर्णीय स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत! त्यांच्या यशाने १९४८ मध्ये प्रेसिडेंट ट्रूमन यांच्या Executive Order 9981 ला चालना मिळाली, ज्याने सैन्यात वर्णभेद संपवायला मदत झाली. ही पत्रं फक्त कागद नव्हती, तर सैनिकांसाठीचे इमोशन होते. सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी फक्त पत्र नाही वाटली तर सात मिलियन सैनिकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्याचं काम केले, ज्यामुळे युद्धात त्यांचं मनोबल वाढलं.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.