अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टेरिफ कार्डाच्या मुद्द्यावरुन धमकी दिली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असून यातून मिळालेल्या निधीचा वापर रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धात करत आहे, असा आरोप ट्रम्प करीत आहेत. आता ट्रम्प यांच्या पाठोपाठ युक्रेननेही भारताविरोधात आघाडी उभारली आहे. रशियन सैन्य युद्धात वापरत असलेल्या इराणी-डिझाइन ड्रोनमध्ये भारतीय बनावटीचे इलेक्ट्रॉनिक घटक वापरले जात आहेत. यामुळे भारतावर प्रतिबंध आणावेत अशी थेट मागणी युक्रेनने युरोपियन युनियनकडे केली आहे. यासर्वामागे अमेरिका आणि युक्रेनची मिलीभगतच असल्याचे स्पष्ट होत आहे. रशियावर असलेला राग व्यक्त करण्यासाठी अमेरिका भारतावर अधिक कर लादत आहे. सोबतच अमेरिकेच्या मदतीसाठी युक्रेनही पुढे आला असून रशिया-युक्रेन युद्धात भारताला विनाकारण खेचण्याचा हा प्रयत्न होत आहे. (Russia And Ukraine)
गेल्या काही दिवसापासून भारत-अमेरिका संबंधाचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अमेरिका हा एक व्यापारी देश आहे. आपला मित्रदेश, असा भारताचा उल्लेख जरी अमेरिका करत असला तरी, स्वतःच्या देशाच्या स्वार्थापुढे अमेरिका कधीही विचार करत नाही. अर्थात राष्ट्राध्यक्ष कोणीही असले तरी हिच अमेरिकन मानसिकता आहे. आता हाच प्रकार भारताला सच्चा मित्र म्हणवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारत, रशियाकडून तेल खरेदी करत आहे, हा मुद्दा पुढे करत त्यांनी भारताला त्यांच्या टेरीफ कार्डाच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. (International News)
भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाही, तर खुल्या बाजारात खरेदी केलेले बहुतेक तेल मोठ्या नफ्यात विकत आहे. भारताला रशियन युद्धयंत्र युक्रेनमध्ये किती लोकांना मारत आहे याची पर्वा नाही. या कारणास्तव, भारतावर पुन्हा अधिक कर लादण्याचा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याची त्यांनी नव्यानं धमकी दिली आहे. एकीकडे युक्रेनची बाजू मांडून भारतावर अधिक कर लादण्याची तयारी ट्रम्प करीत असतांना त्यांच्या बाजुने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीही पुढे आले आहेत. त्यांनी युक्रेनवर जे ड्रोन हल्ले होत आहेत, त्यात भारतीय बनवाटीचे पार्ट असल्याचा आरोप केला आहे. युक्रेनने यासंदर्भात युरोपियन युनियन आणि भारत सरकारकडे तक्रार केली आहे. रशियन सैन्य युक्रेनविरोधात जे ड्रोन वापरत आहे, त्या ड्रोनमध्ये भारतीय कंपन्यांनी बनवलेले इलेक्ट्रॉनिक घटक आहेत. याबाबत युक्रेननं युरोपियन युनियनकडे भारत, युद्धाला मदत करत असल्याची तक्रार नोंदवली आहे. (Russia And Ukraine)
भारताच्या विशी इंटरटेक्नॉलॉजी आणि ऑरा सेमीकंडक्टरची इलेक्ट्रॉनिक साधने, रशियाच्या शाहिद 136 ड्रोनच्या निर्मितीत वापरली गेली आहेत. यासंदर्भात युक्रेनकडून युरोपियन युनियनला काही कागदपत्रेही देण्यात आली आहेत. मात्र यासंदर्भात भारतानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत सरकारचा असा दावा आहे की, दुहेरी वापराच्या वस्तूंची निर्यात ही अणुप्रसारबंदीवरील आंतरराष्ट्रीय दायित्वांशी सुसंगत आहे आणि ती त्यांच्या मजबूत देशांतर्गत कायदेशीर आणि नियामक चौकटीवर आधारित आहे. वास्तविक 2022 च्या अखेरीपासून रशियाकडून युक्रेनला लक्ष्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शाहिद ड्रोनचा वापर केला जात आहे. इराणने सुरुवातीला रशियाला 2000 पूर्णपणे एकत्रित ड्रोन पुरवले होते. नंतर इराणच्या तयार भागांचा वापर करुन रशियानं स्वतःची असेंब्ली सिस्टम स्थापित केली. रशियाने जुलैमध्ये असे 16129 शाहिद ड्रोन लाँच केले आहेत. शाहिद 136 हा एक स्वस्त आणि प्राणघातक ड्रोन म्हणून ओळखला जातो. (International News)
===================
हे देखील वाचा : The Lost Bomb : त्या बेटाजवळ अणूबॉम्ब हरवला जो कधीही…
===================
या ड्रोनचा वापर करुन रशियानं युक्रेनला बेजार केले आहे. या ड्रोनमध्ये बसवलेला व्होल्टेज रेग्युलेटर भारतात बनवला आहे असा दावा करण्यात आला आहे. शिवाय या ड्रोनमधील सिग्नल जनरेटर चिप बंगळुरू येथील एका कंपनीने बनवली आहे. ड्रोनच्या उपग्रह नेव्हिगेशन सिस्टमला जाम होण्यापासून वाचवण्यासाठी याचा वापर केला जातो. या सर्वातून फक्त भारताला लक्ष करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवणार अशी घोषणा करुन अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेले ट्रम्प अपयशी ठरले आहेत. शिवाय रशियाचे अध्यक्ष व्लादेमिर पुतिन त्यांना फारसा भाव देत नाहीत. त्यातच 25 टक्के कर लादल्यावरही भारताची थंडी प्रतिक्रिया त्यांना त्रस्त करत आहे. त्यामुळेच रशिया-युक्रेन युद्धात आता त्यांनी भारताला खेचण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांच्या या धोरणाचा रशियानंही तीव्र शब्दात विरोध केला आहे. तसेच आपल्या मित्र देशाच्या पाठी भक्कमपणे उभं असल्याचेही सांगितले आहे. (Russia And Ukraine)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics