अमेरिका-पाकिस्तान तेल कराराला पहिल्याच दिवशी धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानात तेल साठे विकसित करण्यासाठी सहकार्याची घोषणा केली. फारकाय भविष्यात भारत, पाकिस्तानकडून तेल खरेदी करेल असे नेहमीप्रमाणे बेताल वक्तव्यही केलं. पण अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षाला बलुच आर्मीनं कडक शब्दात इशारा दिला आहे. बलुच मानवाधिकार कार्यकर्ते मीर यार बलोच यांनी ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून तेलाचे साठे हे पाकिस्तानचे नाहीत, तर बलुचिस्तानचे आहेत, आणि बलुचिस्तान विकाऊ नाही, अशा कडक शब्दात ट्रम्प यांना ताकीद दिली आहे. (Balochistan)
तसेच ट्रम्प यांची घोषणा म्हणजे, जागतिक सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीचा हात दिल्यावर खुललेल्या पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये पुन्हा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच बलुच आर्मीनं चीनच्या ग्वादर पोर्टचे केलेले जबरदस्त नुकसान पाकिस्तानला भारी पडले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेलाही बलुच आर्मीने विरोध केला तर पाकिस्तानची सर्व स्वप्न उद्ध्वस्त होणार आहेत. या सगळ्यात पाकिस्तानलगतच्या समुद्रात खरंच तेलाचे साठे आहेत का? हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. कारण असे तेलाचे साठे असते तर अमेरिकेपेक्षा चीनची त्याच्यावर अधिक नजर गेली असती. त्यामुळे अमेरिकेसोबत फक्त मैत्री वाढवण्यासाठी पाकिस्ताननं या तेलाच्या साठ्यांचा बहाणा केल्याचेही सांगितले जात आहे. (International News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत एक नवीन व्यापार करार जाहीर केला आहे. पाकिस्तानच्या प्रचंड तेल साठ्यांचा वापर करण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही घोषणा होताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे हात जणू आभाळाला लागले. त्यांनी लगेच इस्लामाबाद आणि वॉशिंग्टनमधील या ऐतिहासिक व्यापार करारामुळे दोन्ही देशात मैत्रीचे नवे नाते निर्माण झाल्याची घोषणा केली. मात्र शरीफ यांची ही घोषणा झाल्याबरोबर बलुच मानवाधिकार कार्यकर्ते मीर यार बलोच यांनी ट्रम्प यांनाच एक पत्र लहिले आहे. त्यात त्यांनी बलुच आर्मीला हलक्यात घेऊ नका, अशी थेट धमकी दिली आहे. (Balochistan)
मीर यार यांनी या पत्रात इस्लामाबादच्या लष्करी नेतृत्वाने अमेरिकेची दिशाभूल केल्याचे सांगितले. तेलाचे साठे हे पंजाबमध्ये नाही तर बलुचिस्तानात आहेत. बलुचिस्तान हा स्वतंत्र प्रदेश आहे. हे बलुचिस्तान ऐतिहासिकदृष्ट्या स्वतंत्र राष्ट्र आहे आणि सध्या पाकिस्तानच्या बेकायदेशीर कब्जाखाली आहे. पाकिस्तानचे सरकार केवळ राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी बलुचिस्तानची संपत्ती हडप करत आहे. याबाबत आमचे सैन्य सदैव पाकिस्तानबरोबर लढा देत आहे. बलुचिस्तान हा प्रदेश आम्ही विक्रीसाठी काढलेला नाही, असा स्पष्ट संदेश मीर यार यांनी या पत्राद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. याशिवाय बलुचिस्तानमधील अब्जावधी डॉलर्स किमतीच्या दुर्मिळ खनिज संसाधनांपर्यंत पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयला प्रवेश देणे ही मोठी चूक सिद्ध होणार आहे. यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. (International News)
याच दहशतवाद्यांनी 9-11 सारखे हल्ले अमेरिकेवर केले आहेत, याची आठवणही मीर बलोच यांनी या पत्राद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांना करुन दिली आहे. बलुच लोकांच्या स्पष्ट संमतीशिवाय पाकिस्तान, चीन किंवा इतर कोणत्याही परदेशी शक्तीला आमच्या जमिनीमध्ये प्रवेश मिळणार नाही, त्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाच्या संघर्षाला तयार असल्याचा इशाराही मीर यांनी ट्रम्पना दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल कराराच्या माध्यमातून पाकिस्तानला मोठा आर्थिक पाठिंबा दिला आहे. पण खरोखरच कराचीजवळील समुद्रात तेलाचे साठे आहेत का, याचीही चर्चा सुरु झाली आहे. या करारामुळे अमेरिकन कंपन्यांना पाकिस्तानी सागरी क्षेत्रात तेल शोधून त्याचे उत्पादन करण्याची परवानगी मिळणार आहे. 2024 मध्ये पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तेल आणि वायूचा मोठा साठा सापडल्याचा दावा करण्यात आला होता. हा खनिज साठा जगातील चौथ्या क्रमांकाचा वायू आणि तेलाचा साठा असल्याचेही सांगण्यात आले. पण त्याबाबत पुढे संशोधन झाले नाही. (Balochistan)
===================
हे देखील वाचा : Area-51 : अखेर तो दिवस येणार एलियनसोबत युद्ध होणार…
===================
आता याच खनिज साठ्यांच्या संशोधनासाठी 42 हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. पण असे असले तरी हे तेलसाठे बाहेर काढण्यासाठी 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळेच या तेल साठ्यांबाबत शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. तेल क्षेत्रातील तज्ञांच्या मते, पाकिस्तानमध्ये आढळणारे तेलाचे साठे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण पाकिस्तानच्या या गॅस-तेलाच्या साठ्याकडे चीनचे आत्तापर्यंत लक्ष कसे गेले नाही, हा प्रश्नही आहे. ग्वादार पोर्टच्या निमित्तानं चीन पाकिस्तानमध्ये अनेक हस्तक्षेप करत आहे. असे असतांना आपल्या या मित्राला पाकिस्ताननं तेलांच्या साठ्यांची कल्पनाही का दिली नाही, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांची साथ मिळवण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेवर खनिज साठ्यांचे जाळे टाकल्याची चर्चा सुरु झाली आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics