उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मनसा देवीचे मंदिर गेल्या काही दिवसात चर्चेत आले, ते तिथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे. हरिद्वार मनसा देवी मंदिर हे देशातील 51 शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे. या देवीला सापांची माता म्हणूनही पुजले जाते. डोंगरावर असलेल्या या मनसा देवी मंदिरात जाण्यासाठी 800 पाय-या चढाव्या लागतात. याच पाय-यांच्या शेवटच्या टप्प्यात विद्युत रोषणाईसाठी सोडलेल्या वायरचा संपर्क येऊन भाविकांना विजेचा धक्का बसला आणि त्यामुळे या मार्गावर चेंगराचेंगरी झाली. मनसा देवीच्या दर्शनाला वर्षभर अशीच गर्दी असते. मात्र श्रावण महिन्यात ही गर्दी चारपट वाढते. विशेषतः नागपंचमी जवळ आली का मनसा मातेला नमस्कार करण्यासाठी लाखो भक्त तिच्या चरणी जातात. (Mansa Devi Temple)
कारण मनसा मातेला सापांची देवता म्हणून पुजण्यात येते, मनसा मातेचा आशीर्वाद घेतल्यावर सर्पदंशापासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळेच नागपंचमीच्या सणानिमित्त लाखो भाविक मातेच्या चरणी लीन होण्यासाठी हरिद्वारला येतात.
हरिद्वार पंचकुला येथे असलेले माता मनसा देवीचे मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. 1811 ते 1851 दरम्यान मणिमाज्राचे महाराजा गोपाल सिंह यांनी हे मंदिर बांधले. या मनसा मातेच्या मंदिरात भाविक कालसर्पाची पूजा करण्यासाठी देशभरातून येतात. राजा गोपाल सिंह हे मानसा देवीचे परम भक्त होते. त्यांनी रोज मनसा मातेचे दर्शन घेता यावे म्हणून, आपल्या राजवाड्यापासून थेट मंदिरापर्यंत एक गुप्तमार्गच तयार केला होता. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी मातेची आराधना केली. पुत्रप्राप्ती झाल्यावर त्यांनी पंचकुलामधील टेकडीवर मनसा मातेचे भव्य मंदिर बांधले. पंचकुला येथील हे मनसा देवी मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक असून येथे माता सतीच्या डोक्याचा पुढचा भाग पडला होता. (Social News)
हिंदू धर्मातील काही पौराणिक ग्रंथांमध्ये माता मानसा यांचा नागमाता असाही उल्लेख करण्यात आला आहे. मनसा देवी ही सापांचा राजा वासुकीची बहीण मानली जाते. त्यामुळे मनसा देवीचे नेहमीच 7 साप रक्षण करतात असे सांगितले जाते. मनसा माता आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली आहे. मातेच्या मांडीवर बसलेल्या मुलाचे नाव आस्तिक असून त्यानेच नाग राजवंशाचे रक्षण केल्याचे सांगितले जाते. नागांची देवता म्हणून मनसा देवीची पुजा करतांना भाविक सर्पदंशापासून मुक्ती देण्याची प्रार्थना करतात. (Mansa Devi Temple)
या मनसा माता मंदिरात 200 वर्षापासून मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. विशेषतः श्रावण महिन्यात येथे भाविकांचा मोठा मेळा भरतो. नागपंचमीच्या दिवशी येथे लाखो भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी भारतभरातून येतात. हे भाविक मातेला, गूळ आणि मखाना अर्पण करतात. याशिवाय मातेला पिवळ्या रंगाची फुले आणि फळेही अर्पण करणे शुभ मानले जाते. काही भाविक मातेला सापाच्या आकाराच्या मिठाई आणि गुळापासून तयार केलेल्या सापाच्या मूर्तीही अर्पण करतात. याच मनसा मातेच्या मंदिरात महाराजा पटियाला यांनीही पटियाला मातेचे मंदिर बांधले आहे. मनसा मातेच्याबाबत अनेक रहस्य आणि गुढकथा आहेत. पौराणिक मान्यतेनुसार, मनसा देवी ही भगवान शंकराची मानसिक कन्या असल्याचे सांगितले जाते. अन्य एका आख्यायिकेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष सोडण्यात आले होते. हे विष घेण्यासाठी देव आणि दानव टाळाटाळ करु लागले. (Social News)
===================
हे देखील वाचा : Shravan Somvar: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक पूर्वाभिमुख घृष्णेश्वर महादेव मंदिर
===================
मात्र विष तसेच राहिले असते, तर जगाचे मोठे नुकसान झाले असते. जगाचे रक्षण करण्यासाठी, भगवान शंकरांनी हे विष आपल्या गळ्यात धरले, ज्यामुळे त्यांची मान निळी झाली. मग भगवान शंकर यांनी त्यांच्या मनातून एका मुलीला जन्म दिला. याच मुलीनं भगवान भोलेनाथांच्या घशातून सर्व विष बाहेर काढले. या मुलीला मनसा देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रत्यक्ष भगवान शंकराच्या गळ्यातून विष काढले म्हणून या मुलीची देवी म्हणून पुजा होऊ लागली. आणि तिला सापांची माता अशी उपमा मिळाल्याचे सांगण्यात येते. महाभारतातही मनसा मातेचा उल्लेख आहे. त्यानुसार तिचे खरे नाव जरत्कारू असल्याचा उल्लेख आहे. मातेच्या पतीचे नावही महर्षी जरत्कारू असून मातेच्या मुलाचे नाव आस्तिक असल्याची माहिती आहे. याच मनसा मातेच्या चरणी लीन होण्यासाठी हरिद्वार आलेले भाविक कायम गर्दी करतात. विशेषतः श्रावण महिन्यात मनसा मातेचे दर्शन शुभ मानले जाते. (Mansa Devi Temple)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics