सॅन निकोलस बेट, जे कॅलिफोर्निया किनाऱ्यापासून जवळपास १०० किमी अंतरावर आहे. साल १८५३, एक सी हंटर कॅप्टन जॉर्ज नाइट आणि त्याचे साथीदार सॅन निकोलस बेटावर पोहोचले. त्याला असं सांगण्यात आलं होतं की, सॅन निकोलस बेट पूर्णपणे सुनसान आहे. मग तो आणि त्याचे साथीदार त्या बेटावर वाट मिळेल तसे भटकायला लागले. थोडा वेळ असाच गेला आणि जॉर्जला अचानक विचित्र आणि वेगळ्याच वाईब यायला लागल्या. चालता चालता अचानक त्याचं लक्ष एका झोपडीकडे गेलं. त्याला प्रश्न पडला, जर इथे कोणीच नाही असं सांगितलं होतं, तर ही झोपडी इकडे आली कशी? ती झोपडी चांगल्या अवस्थेत होती, म्हणजे नक्कीच कोणीतरी इकडे राहतंय, असा संशय त्याला आला, कारण झोपडीच्या आत आणि बाहेर काही गोष्टी नीट मांडून ठेवलेल्या होत्या. आता त्या गोष्टी म्हणजे हाडांपासून बनवलेल्या सुई आणि दगडांची काही हत्यारं त्याला झोपडीच्या बाहेर नीट ठेवलेली दिसली. (Owana Maria)
त्याने ठरवलं झोपडीत जाऊन बघू कोणी आहे का ? आणि त्याने हिम्मत करून पहिलं पाऊल टाकलं, इतक्यात झुडपांमागे काहीतरी हालचाल झाली. घाबरून सगळ्यांनी त्या झुडपाच्या दिशेने पाहिलं. आता त्या झुडपात हालचाल आणखी वाढली आणि काही क्षणातच… एक ४० वर्षांची बाई झुडपांमधून बाहेर आली. तिच्या हातात काही जंगली फळं होती. असं वाटत होतं होतं, ती त्या सगळ्यांचं पाहुण्यांसारखं स्वागत करत होती. तिने त्या लोकांना फळं ऑफर केली. जॉर्जने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला.
पण ती जे बोलत होती, ते कोणालाच समजत नव्हतं. तीची भाषा खूपच वेगळी होती. काही दिवसांनी एक सत्य समोर आलं, ते म्हणजे १८ वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे ती १८ वर्ष या निर्जन बेटावर अडकली होती, तरी जिवंत होती. पण ती नक्की होती कोण? तिथे अडकली कशी? आणि १८ वर्ष ती जर तिथे अडकली होती, तर तिला १८ वर्ष वाचवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत ? हे सगळं जाणून घेऊ. (Owana Maria)
१८०० च्या सुरुवातीच्या काळात काही रशियन हंटर सॅन निकोलस बेटावर आले आणि त्यांनी तिथे आपला तळ ठोकला. तिथल्या निकोलिनो जमातीच्या याला विरोध केला आणि आपल्या पारंपारिक शस्त्रांंनी म्हणजे काठ्या, भाल्यांनी हल्ला चढवला. पण त्या शिकाऱ्यांकडे बंदूका होत्या, त्या मॉडर्न बंदुकांसमोर ती पारंपारिक हत्यारं टिकू शकली नाहीत आणि पुढच्या काही तासात मोठा नरसंहार घडला. ते दिसेल त्यांना शूट करत होते, माणसं, प्राणी, जो दिसेल त्यांना मारत होते. थोड्याच वेळात दूर पर्यंत रक्ताच्या थारोळ्यात भरपूर असे त्या निकोलिन लोकांचे मृतदेह पडलेले होते. अगदी थोडे फारच यात वाचले असतील. ते हंटर तिथून निघून गेले, पण जाताना त्या बेटाचा संपूर्ण बॅलेन्स बिघडला. अन्नाची प्रचंड टंचाई झाली, कारण ज्या प्राण्यांचा लोक शिकार करत, ते जवळपास संपले होते.
काही वर्षांनी म्हणजे १८३५ मध्ये काही ख्रिश्चन मिशनरी सॅन निकोलस बेटावर पोहोचले. त्यांनी पाहिलं आणि त्यांना दिसलं की, त्या घटनेनंतर काही लोकं अजूनही वाचली आहेत आणि काही भुकेने मेली होती. त्यांनी जे जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी जहाजातून अमेरिकेत नेण्याचा निर्णय घेतला. या वेळेस तिथे ओवाना मारियाने यायला नकार दिला. आता ही ओवाना मारिया कोण? तर ही तीच, मघाशी जिच्याबद्दल आपण बोललो, जी १८ वर्ष त्या बेटावर होती. ही त्याच निकोलिनो जमातीमधली होती आणि आपल्या लोकांसोबत सॅन निकोलस बेटावर राहायची. पण आता असा प्रश्न आहेच की, तिने त्यांच्यासोबत यायला नकार का दिला?
याचं कारण म्हणजे तिचा मुलगा कुठेतरी हरवला होता. ती त्याला सोडून जायला तयारच नव्हती. मारियाचा मुलगा कुठे आणि कसा हरवला हे कोणालाच माहित नव्हतं. पण तिला आशा होती की, तो तिला सापडेल. मिशनरी पाद्री आणि इतर लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी आईचं मन ते, ती आपल्या हट्टावर ठाम राहिली. सगळे तिला समजावून थकले आणि शेवटी बाकी सगळे तिला एकटीला सोडून अमेरिकेच्या दिशेने निघून गेले. आता मारिया त्या निर्जन बेटावर एकटीच राहिली होती. तिला जराही जाणीव नव्हती की, आपल्या मुलाची वाट बघणं कधीच संपणार नाही. (Owana Maria)
एकतर रशियन शिकाऱ्यांनी येऊन अख्ख्या बेटाची वाट लावली होती, त्यामुळे बेटावर खायला काहीच नव्हतं. आपल्याला वाटेल तिच्यासमोर फक्त दोनच प्रश्न होते, ते म्हणजे आपला मुलगा परत कधी भेटणार आणि स्वतःचा सर्वायवल कसा करेल? पण तिच्यासाठी सर्वायवलचा प्रश्नच नव्हता, तिला आपल्या मुलाचीच आस लागली होती. ती आपल्या मुलाचा शोध घेत बरीच वर्ष निघून गेली. त्यात तिने स्वतःला राहण्यासाठी सुकून गेलेल्या शरीरांची हाडं, फांद्या आणि पानांपासून झोपडी बांधली.
ज्यामुळे थंडीत तिला आधार मिळाला. सी बर्डस्चे पंख आणि सीलच्या कातड्यापासून स्वतःसाठी उबदार कपडे तयार केले. दगड आणि हाडांपासून मजबूत अशी शस्त्रं बनवली आणि शिकार करायला शिकली. अजूनही तिच्या मनात एकच ध्येय होतं की, आपला मुलगा शोधायचा. या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिकतेवर व्हायला लागला. ती स्वतःशीच बोलायची, गाणी गुणगुणत बसायची. तब्बल १८ वर्षांनी ती निर्जन बेटावर एकटी सापडली. असं म्हणतात, १८ वर्ष कोणत्याही माणसाशी न बोलल्यामुळे ती स्वतःची भाषा विसरली होती. १९१३ मध्ये फर्नांडो लिब्राडो या चुमाश माणसाने हे गाणं रेकॉर्ड केलं. असं म्हणतात, ती जेव्हा भाषा विसरत चालली होती तेव्हा हे गाणं ती एकटी असताना गायची. (Owana Maria)
===============
हे देखील वाचा : Aron Ralston : ३६० किलोच्या दगडाखाली हात १२७ तास तो तसा अडकला आणि…
===============
एक रात्र बेटावर घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जॉर्ज आणि त्यांचे साथीदार परत निघायची तयारी करायला लागले. त्यांनी मारियाला सोबत घेऊन जायचा निर्णय घेतला. ती त्यांच्यासोबत जायला तयार नव्हती, मग कसं बसं तिला कनविंस केल्यानंतर ती जहाजावर चढली. तिला सुखरूप जॉर्जने आपल्या घरी आणलं. तिची काळजी घेतली. ती तिथेसुद्धा एकटी राहायची, कोणाशी बोलायची नाही. जॉर्जने काही भाषातज्ञांना बोलावलं, त्यांनासुद्धा तिची भाषा डिकोड करता येत नव्हती. यानंतर मारियाबद्दलची बातमी सगळीकडे पसरली. बरीच लोकं येऊन तिला भेट द्यायला यायचे. जसं एक्सिबीशन ठेवल्यासारखं लोकं तिला कुतुहलाने बघायचे. त्यात असंही झालं तिला ते वातावरण सूट होत नव्हतं आणि त्यात ही लोकांची गर्दी, मारिया फक्त दीड महिने जगू शकली. नंतर इतिहासात ती The Lone Woman of San Nicolas Island या नावाने ओळखली गेली. (Owana Maria)
१९६० मध्ये लेखक स्कॉट ओडेल यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक आयलंड ऑफ द ब्लू डॉल्फिन्समध्ये मारियाच्या स्टोरीचं विस्तृत वर्णन केलं. या स्टोरीत लोकांचा एकच आश्चर्याची गोष्ट वाटायची की, एक बाई एका निर्जन बेटावर १८ वर्षं जिवंत राहिली, ती माणसांमध्ये आल्यावर दोन महिनेही जगू शकली नाही. मारियाचं आईचं मन इतका स्ट्रॉंग होतं, ज्यामुळे १८ वर्ष आपल्या मुलाची वाट बघायच्या आशेत ती जिवंत राहिली आणि शेवटपर्यंत तिला आपला मुलगा सापडला नाही.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics