सध्या महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी भाषेचा वाद पेटला आहे, ज्यामुळे भावनिक आणि राजकीय तणाव वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? ब्रिटिशांच्या काळात एका मराठी माणसाने सरकारी कामकाज हिंदीत करण्याची मागणी केली होती. त्याचं मराठी माणसाने उत्तर भारताच्या राजकारणात इतकी मोठी मजल मारली की तो थेट उत्तर प्रदेशचा पहिला मुख्यमंत्री बनला! एवढंच नाही, तर त्याने जमीनदारीसारख्या प्रथा मोडून काढत हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या. हा माणूस म्हणजे भारतरत्न गोविंद वल्लभ पंत! एक मराठी माणूस यूपीचा पाहिला मुख्यमंत्री कसा बनला? चला, जाणून घेऊ. (Govind Ballabh Pant)
तर गोविंद वल्लभ पंत! यांचे वडील मनोरथ पंत,मूळचे महाराष्ट्रातले होते! ते रेव्हेन्यू कलेक्टर होते. त्यांच्या नोकरीच्या बदल्या होत राहायच्या, म्हणूनच गोविंद यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ ला उत्तराखंडमध्ये झाला. त्यामुळे गोविंदच यांचं बालपण त्यांच्या आजोळी गेलं. लहानपणापासूनच हा पोरगा हुशार. शाळेत नेहमी अव्वल. पुढे बी.ए., एल.एल.बी. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि १९०९ साली तर कायद्याची पदवी घेताना सुवर्णपदक पटकावलं! पण त्यांचं मन फक्त अभ्यासात नव्हतं, त्यांना समाजासाठी काहीतरी करायचे होते. म्हणून त्यांनी समाजकारण आणि राजकारणात उडी घेतली. गोविंद यांनी आपली कारकीर्द हमाल आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा देऊन सुरू केली. हमाल-मजुरांकडून मोफत काम करवून घेणाऱ्या कायद्याला त्यांनी कोर्टात चॅलेंज केलं. कोर्टातल्या जजला मराठी माणसाच्या स्टाईलने झणझणीत शब्दांत कायद्याची समज दिली!
त्यांचं बोलणं इतकं प्रभावी होतं की, ऐकणारे थक्क व्हायचे त्यांच्या समोर ब्रिटिश अधिकारीसुद्धा गप्प बसायचे. १९१४ साली गोविंद यांनी प्रेम सभेची स्थापना केली. १९१६ साली काशीपुरच्या नोटीफाईड एरिया कमिटीवर त्यांची निवड झाली. पण खरी गंमत सुरू झाली ती १९२१ साली. महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत गोविंद सहभागी झाले. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या या बंडखोर वृत्तीमुळे ब्रिटिशांना त्यांची भीती वाटायची. एवढी की काशीपुरला ब्रिटिश “गोविंदगड” म्हणायचे! (Govind Ballabh Pant)
१९३०चा मिठाचा सत्याग्रह, १९३२ चं सविनय कायदेभंग, १९४०चा वैयक्तिक सत्याग्रह आणि १९४२ चं भारत छोडो आंदोलन – प्रत्येक चळवळीत गोविंद सक्रिय होते. या आंदोलनांमुळे त्यांना सात वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला. एकदा लखनऊच्या मोर्चात नेहरूंना वाचवण्यासाठी ते स्वतः जखमी झाले. पण त्यांची जिद्द कधी कमी झाली नाही. आता मूळच्या महाराष्ट्रच्या असलेल्या या माणसाचं स्वप्न हिंदीला देशाची भाषा बनवायचं होतं. ४ मार्च १९२५ रोजी त्यांनीब्रिटिश प्रशासनाला सरकारी कामकाज हिंदीत करण्याची मागणी केली. हिंदीला राजकीय भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. पण पंत फक्त हिंदीपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्धही लढा दिला. जमीनदारीसारख्या प्रथा मोडून काढण्यात मोठी भूमिका बजावली. यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने कसलेल्या जमिनी मिळाल्या.(Top Stories)
गोविंद वल्लभ पंत 1937 ते 1939 या काळात संयुक्त प्रांताचे म्हणजे आताच्या उत्तर प्रदेश प्रीमियर होते, म्हणजे मुख्यमंत्री. त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता आणि ब्रिटिश राजवट होती. 1935 च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्टनुसार, प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या आणि काँग्रेस पक्षाने संयुक्त प्रांतात सत्ता मिळवली. यामुळे पंत यांना प्रीमियर म्हणून नियुक्त केले गेलं. नंतर स्वतंत्र भारतात १९४६ ते १९५४ या काळात गोविंद वल्लभ पंत हेचं यूपीचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीत यूपीत कधीही जातीय किंवा धार्मिक दंगल झाली नाही. प्रशासनाने उत्तम काम केलं. त्यांनी बनवलेलं मॉडेल नंतर अखिल भारतीय स्तरावर लागू झालं. (Govind Ballabh Pant)
पुढे १९५५ ते १९६१ या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्री म्हणून काम केलं. आता सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असं वतावरण तापलं आहे. त्यामुळे गोविंद यांचं हिंदी प्रेम पाहून जरा खटकलं असेल, पण भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात या माणसानेच अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
================
हे देखील वाचा : Maya Emperor : माया सम्राटाची कबर आणि दडलेला खजिना !
================
इतका प्रभाव आणि ताकद असून सुद्धा गोविंद हे खूप साधेपणाने आपलं आयुष्य जगायचे. एकदा मंत्रालयात ते चहा आणि नाश्ता घ्यायचे. पण चहा वगळता नाश्त्याचं बिल ते स्वतःच्या खिशातून भरायचे. त्यांचं म्हणणं होतं, सरकारी पैसा फक्त जनतेच्या हितासाठी वापरला पाहिजे. त्यांचा अजून एक किस्सा असा की, सायमन कमिशनविरुद्ध आंदोलनात ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता, तोच गोविंद मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या ऑफिसात काम करत होता. गोविंद यांनी त्याला बोलावलं आणि आस्थेने त्याची चौकशी केली. असा हा माणूस, जो शत्रूंनाही आपलंसं करायचा! त्यांच्या कार्यासाठी त्यांना १९५७ साली भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं. (Govind Ballabh Pant)
पुढे ७ मार्च १९६१ रोजी गोविंद वल्लभ पंत (Govind Ballabh Pant) यांचं निधन झालं. पण त्यांचं नाव इतिहासात अमर आहे. एक मराठी माणूस, ज्याने उत्तर भारताच्या आधुनिकीकरणाचा पाया रचला. समाजात समता आणण्यासाठी जो आयुष्यभर झटला. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics