OTT Wedding : सध्याच्या डिजिटल युगात लग्नसमारंभाच्या संकल्पनाही झपाट्याने बदलत आहेत. पारंपरिक विवाह पद्धतींपासून दूर जात अनेकजण आता ‘ओटीटी वेडिंग’कडे वळताना दिसतात. ‘ओटीटी वेडिंग’ हा एक आधुनिक विवाह ट्रेंड असून, तो ओटीटी (Over The Top) प्लॅटफॉर्मप्रमाणे “सर्वसामान्यतेच्या पलीकडे” जाणारा, थोडक्यात अगदी हटके आणि आकर्षक पद्धतीने साजरा होणारा विवाह समारंभ आहे. अशा प्रकारच्या लग्नांमध्ये सर्जनशीलतेला, थाटमाटाला आणि सोशल मीडियावर झळकण्यासाठी खास क्षणांना प्राधान्य दिलं जातं. पारंपरिक विवाहाच्या सर्वसामान्य रचनेऐवजी यात प्रत्येक क्षणाला खास बनवण्यासाठी भव्य सजावट, फॅन्सी आउटफिट्स, थीम बेस्ड सेरेमनीज, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
ओटीटी वेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे “थीम”. या प्रकारातील विवाह हे विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतात, जसे की, बॉलिवूड स्टाईल, रोयल महाल थीम, डेस्टिनेशन वेडिंग, किंवा एखाद्या विशिष्ट चित्रपटातील शैली. नवविवाहित जोडपे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे लग्न म्हणजे एक ‘फॅशन शो’ किंवा ‘फिल्म सेट’सारखे असते. प्रत्येक सोहळा मेहंदी, हळद, संगीत, लग्न, रिसेप्शन हे एकमेकांपेक्षा वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने साजरे केले जातात. केवळ वर-वधूच नव्हे, तर पाहुणेही खास ड्रेस कोडप्रमाणे सजतात.

OTT Wedding
ओटीटी वेडिंगमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी यालाही तितकच महत्त्व असते. सिनेमा प्रमाणे ट्रेलर तयार केला जातो, प्रेमकहाणीचे डॉक्युमेंटेशन होते आणि सोशल मीडियासाठी विशेष क्लिप्स बनवल्या जातात. यासाठी विशेषत: ड्रोन कॅमेरा, ४के फिल्मिंग, सिनेमॅटिक एडिटिंग अशा गोष्टींचा वापर केला जातो. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी प्रत्येक क्षण खास व्हावा यासाठी योजनाबद्ध काम केले जाते.
संगीतसोहळ्यांमध्ये बॉलिवूड कोरिओग्राफर, लाईव्ह म्युझिक बँड, प्रसिद्ध गायन मंडळी यांना बोलावले जाते. काही ठिकाणी तर सेलिब्रिटी देखील परफॉर्म करतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर बजेट राखले जाते. ओटीटी वेडिंग हा केवळ विवाह सोहळा नसतो, तो एक प्रेझेंटेशन आणि एक्सपीरियन्स असतो.(OTT Wedding)
============
हे ही वाचा :
Tirupati : तिरुपतीमधील भगवान वेंकटेश्वराचे डोळे पांढऱ्या कापडाने का बंद केले जातात?
Major Somnath Sharma : तुटलेल्या हाताने लढला,पण काश्मीर वाचवलं !
============
या ट्रेंडमुळे वेडिंग प्लॅनर, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि क्रिएटिव्ह कलाकारांना मोठ्या प्रमाणात काम मिळू लागले आहे. ही एक नवीन उद्योगसंधी ठरत आहे. या विवाहप्रकारासाठी लाखो ते कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो. त्यामुळे सर्वसामान्यांपेक्षा उच्चभ्रू वर्ग आणि सेलिब्रिटी या ट्रेंडकडे अधिक झुकत आहेत. मात्र सोशल मीडियावरुन इतर लोकही अशा पद्धतीचे वेडिंग करण्याची स्वप्नं पाहू लागले आहेत.
एकंदरीत, ओटीटी वेडिंग म्हणजे केवळ लग्न नसून एक भव्य आयोजन, अनुभव आणि सोशल मीडियावर लक्ष वेधणारा सोहळा. या ट्रेंडने विवाहसंस्कारांचा चेहरामोहरा बदलला असून, सर्जनशीलतेची नवी वाट मोकळी केली आहे. पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन वेगळेपणाची झलक दाखवणाऱ्या या ट्रेंडला आजच्या तरुण पिढीने आपलंसं केलं आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics