Home » Royal Wedding : शतकातील सर्वात महागडा लग्नसमारंभ !

Royal Wedding : शतकातील सर्वात महागडा लग्नसमारंभ !

by Team Gajawaja
0 comment
Royal Wedding
Share

जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि पत्रकार लॉरेन सांचेझ यांचे लग्न इटलीतील व्हेनिस शहरामध्ये 28 जून रोजी होत आहे. या लग्नाला ‘शतकातील शाही लग्न’ म्हटले जात आहे. तीन दिवसांच्या या लग्न सोहळ्यासाठी जगभरातील हाय प्रोफाइल पाहुणे व्हेनिस शहरात दाखल झाले आहेत. शनिवारी सॅन जॉर्जिओ मॅगीओ बेटावर ही लग्नाची गाठ बांधली जाईल. त्यानंतर आर्सेनल येथे एक भव्य रिसेप्शन पार्टी होणार आहे. यात प्रसिद्ध गायिका आंद्रिया बोसेली यांचा मुलगा मॅटेओ बोसेली यांचा कार्यक्रम होणार आहे. या शाही समारंभासाठी ओप्रा विन्फ्रे, लिओनार्डो डिकॅप्रियो, ऑरलँडो ब्लूम, किम कार्दशियन आणि टॉम ब्रॅडी, बिल गेट्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासह 200 सेलेब्रिटींचा समावेश आहे. या लग्नासाठी 40 ते 48 दशलक्ष युरो म्हणजेच 55.69 दशलक्ष डॉलर्स खर्च होणार आहे. या सर्व लग्नसोहळ्याची सुरुवातच ज्या सुपरयॉट फोम पार्टीपासून झाली, त्यावर 500 दशलक्ष डॉलर्सचा खर्च झाला आहे. त्यामुळेच शतकातील सर्वात महागडे लग्न म्हणून या लग्नाचा उल्लेख होत आहे. (Royal Wedding)

जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या भव्य लग्न सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. यासाठी या जोडप्यानं अवघं व्हेनिस शहर ताब्यात घेतले आहे. या सोहळ्यासाठी जेफ आणि लॉरेन हे दोघंही एका खास हेलिकॉप्टरनं व्हेनिसमध्ये दाखल झाले. जेफ आणि लॉरेन यांचा मुक्काम ग्रँड कॅनॉलच्या काठावर असलेल्या आलिशान ‘अमन’ हॉटेलमध्ये आहे. येथील एका खोलीचे भाडे सुमारे 4000 युरो आहे म्हणजेच प्रति रात्र अंदाजे 4.68 लाख रुपये. याशिवाय व्हेनिसमध्ये प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईला 92 खाजगी जेट आणि 30 वॉटर टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांच्या राहण्यासाठी व्हेनिसमधील सेंट रेजिस, हॉटेल डॅनिएली, बेलमंड सिप्रियानी, ग्रिटी पॅलेस यासारखी सुपर लक्झरी हॉटेल्स आठवडाभर बुक आहेत. या लग्नात वरवधुंना भेटवस्तू देण्यास पाहुण्यांना मनाई करण्यात आली आहे. (International News)

त्याऐवजी व्हेनिस शहराच्या विकासासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेफ बेझोस यांनी व्हेनिसच्या पर्यावरण संशोधन संस्था आणि व्हेनिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला 3 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 27 कोटी रुपये दान केले आहेत. शिवाय या लग्नासाठी लागणा-या 80 टक्के वस्तू स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी केल्या आहेत. अर्थात असे असले तरी व्हेनिसमधील पर्यावरण कार्यकर्त्यांनी या लग्नावर होत असलेल्या खर्चावर टीका केली आहे. लोक ‘नो स्पेस फॉर बेझोस’ असे पोस्टरही व्हेनिसच्या रस्त्यावर लावण्यात आले. तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे खाजगीकरण या लग्नासाठी केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे ही नाराजी व्यक्त होत असतांना जेफ आणि लॉरेन यांच्या लग्नानिमित्त व्हेनिसमध्ये अनेक शाही कार्यक्रम होत आहेत. त्यात व्हेनिसच्या ऐतिहासिक मॅडोना डेल’ऑर्टो चर्चमध्ये खास कार्यक्रम झाला. त्यानंतर जेफ आणि लॉरेन यांनी व्हेनिसमध्ये वॉटर टॅक्सी राईडचा आनंद घेतला. (Royal Wedding)

लग्नासाठी झालेल्या विशेष मेजवानीमध्ये अभिनेता ऑरलँडो ब्लूम, फुटबॉल स्टार टॉम ब्रॅडी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प, किम आणि को कार्दशियन आणि केंडल आणि काइली जेनर यांनी भाग घेतला. या लग्नातील वधू लॉरेन सांचेझ हिच्या कतृत्वाची चर्चाही खूप रंगली आहे. 55 वर्षाची लॉरेन सांचेझ ही पत्रकार, वैमानिक आणि अंतराळ प्रवासी म्हणून ओळखली जाते. लॉरेन सांचेझचा जन्म 1969 मध्ये न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क येथे झाला. लॉरेनला तिच्या शाळेच्या काळात डिस्लेक्सियाचा त्रास होता. मात्र लॉरेनने एल कॅमिनो कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर तिला प्राध्यापक लोरी मेडिगोविच यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापकांच्या पाठिंब्याने, लॉरेनला सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर तिची पत्रकारितेत यशस्वी कारकिर्द सुरू झाली. लॉरेनने लॉस एंजेलिसमधील केसीओपी-टीव्हीमध्ये डेस्क असिस्टंट म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. (International News)

=============

हे ही वाचा : Chanakya : चाणक्य नीतीनुसार ‘हे’ गुण असलेली स्त्री ठरते उत्तम जोडीदार

‘कॅम्लिन’ ब्रँड परदेशातील नव्हे चक्क भारतातील, वाचा Success Story

============

त्यानंतर फॉक्स स्पोर्ट्स नेटमध्ये तिने गोइन डीप या शोसाठी सूत्रसंचालन आणि रिपोर्टिंग केले. 2000 मध्ये, लॉरेन एका देशव्यापी होस्टिंग स्पर्धेत उपविजेती ठरली. लॉरेनला वयाच्या 40 व्या वर्षी हेलिकॉप्टर पायलटचा परवाना मिळाला. 2016 मध्ये तिने ब्लॅक ऑप्स एव्हिएशनची स्थापना केली. ही पहिली महिलांच्या मालकीची हवाई चित्रपट निर्मिती कंपनी आहे. आता या कंपनीच्या माध्यमातून ब्लू ओरिजिन रॉकेट प्रक्षेपणांचे चित्रीकरण केले जाते. 2025 मध्ये, अंतराळ उड्डाणान मोहीमेत भाग घेतला. याशिवाय “द फ्लाय हू फ्ल्यू टू स्पेस” नावाचे एक पुस्तक तिनं लहान मुलांसाठी लिहिले आहे. जेफ आणि लॉरेन यांची भेट एका चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या माध्यमातून झाली. आता हे जोडपे एका शाही समारंभात लग्नगाठ बांधत आहे. (Royal Wedding)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.