मुंबईच्या विकासात मोठा हातभार असलेल्या उपनगरीय लोकल सेवेत मध्य रेल्वेवर विजेवर धावणाऱ्या लोकलला (ईएमयू) आज तब्बल ९७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सीएसटी (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) ते कुर्ला स्टेशनपर्यंत विजेवर धावणारी पहिली लोकल ३ फेब्रुवारी १९२५ रोजी धावली आणि मुंबईच्या विकासाने वेग घेतला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात विजेवर ईएमयू सेवा धावण्यास सुरुवात झाली.
ब्रिटीशांनी भारतीय रेल्वेची तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेची सुरूवात भारतात आणि आशिया खंडात १८५३ साली केली. १८ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर म्हणजेच २१ मैल धावली. ती पहिली लोकल स्टीम इंजिन धावल्यानंतर या लोकलचा विकास होण्यास अनेक वर्ष लागली. पण त्यानंतर पहिली ईएमयु (वीजेवर चालणारी) लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले.
३ फेब्रुवारी १९२५ रोजी ४ डबे असलेली पहिली (ईएमयु) सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते कुर्ला अशी हार्बरमार्गे सुरू करण्यात आली होती, ही भारतीय रेल्वेची पहिली ईएमयु सेवा होती. त्या ईएमयु लोकला तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांनी हिरवा कंदील दाखविला होता.

लोकलला प्रवाशांकडून तेव्हा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यामळे प्रवाशांचा विचार करता लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आणि १९२५ साली दररोज १५० फेऱ्या सुरू केल्या. या १५० फेऱ्यामध्ये रोज २ लाख २० हजार प्रवासी प्रवास करू लागले. प्रवशांचा वाढता प्रतिसाद पाहता त्यानंतर पुन्हा लोकलच्या फेऱ्या टप्प्याटप्याने वाढविल्या. परंतु लोकलच्या नसुत्या फेऱ्याच वाढवल्या नाहीत, तर त्याच्या डब्यात देखील वाढ करण्यात आली.
१९२५ मध्ये सुरूवातीला या लोकलचे चार डबे होते, परंतु १९२७ मध्ये या डब्याची संख्या आठ करण्यात आली. त्यानंतर १९६३ मध्ये नऊ डबे करण्यात आले आणि त्यानंतर १९६३ मध्ये मुख्य मार्गावर १२ डब्यांची लोकल सुरू झाली. तसेच २०१२ मध्ये मेन लाईनवर १५ डब्यांची लोकल सुरू झाली. २०१६ मध्ये बारा डब्यांची लोकल हार्बर मार्गावर धावू लागली.
मध्यरेल्वे आजच्या घडीला चार मार्गांवर सेवा पुरवत आहे ते मार्ग म्हणजे मुख्य मध्य लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि कॉरिडॉर लाईन (नेरूळ/बेलापूर-खारकोपर) या मार्गांवर रेल्वेसेवा सुरू केली (Mumbai Local train).
मध्य रेल्वेचा आतापर्यंतचा इतिहास
१९२५ – हार्बर मार्गावर ४ डब्यांची लोकल
१९२७ – मुख्य आणि हार्बर मार्गावर ८ डब्यांची लोकल
१९६३ – मुख्य आणि हार्बर मार्गावर ९ डब्यांची लोकल
१९८६ – मुख्य मार्गावर १२ डब्यांची लोकल
१९८७ – कर्जतच्या दिशेने १२ डब्यांची लोकल
२००८ – कसारा दिशेने १२ डब्यांची लोकल
२०१० – ट्रान्सहार्बर लाईनवर १२ डब्यांची लोकल
२०११ – सर्व मेन सेवा १२ डब्यांची लोकल
२०१२ – मेन लाईनवर १५ डब्यांची लोकल
२०१६ – हार्बर मार्गावर सर्व १२ डब्यांची लोकल
२०२० – मुख्य मार्गावर एसी लोकल
२०२१ – हार्बर मार्गावर एसी लोकल
आता मध्य रेल्वेच्या दररोजच्या किती फेऱ्या होतात, हे देखील जाणून घेऊ.
१९२५ – दररोज १५० लोकल फेऱ्या
१९३५ – दररोज ३३० लोकल फेऱ्या
१९४५ – दररोज ४८५ लोकल फेऱ्या
१९५१ – दररोज ५१९ लोकल फेऱ्या
१९६१ – दररोज ५५३ लोकल फेऱ्या
१९७१ – दररोज ५८६ लोकल फेऱ्या
१९८१ – दररोज ७०३ लोकल फेऱ्या
१९९१ – दररोज १०१५ लोकल फेऱ्या
२००१ – दररोज १०८६ लोकल फेऱ्या
२०११ – दररोज १५५३ लोकल फेऱ्या
२०१८ – दररोज १७३२ लोकल फेऱ्या
२०२० – दररोज १७७४ लोकल फेऱ्या
यामुळेच मुंबईची लोकल (Mumbai Local train) ही आज मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते.