इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये दोन्हीही देशांमध्ये जबरदस्त नुकसान झाले आहे. या देशांमधील युद्धतळांवर हल्ले होतच असतांना सर्वसामान्य नागरिकही आता या युद्धांच्या ज्वाळांमध्ये होरपळले गेले आहेत. पण एकमेकांचे कट्टर शत्रू झालेले हे दोन देश एककाळी घट्ट मित्र होते, हे सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटले. मात्र ही खरी गोष्ट आहे. काही वर्षापूर्वी इस्रायल आणि इराण हे जवळचे मित्र होते. फारकाय इराणमधील तांत्रिक प्रगतीही इस्रायलच्या सहकार्यांनेच झाली आहे. इस्रायलनं अनेक प्रकल्प उभारणीसाठी इराणला मैत्रीपूर्व मदत केली होती. या दोन देशांमधील मैत्री एवढी पक्की होती की, जगभर या मैत्रीचे दाखले दिले जात असत. मात्र 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे इराणमधील राज्य संपुष्टात आले. इराणमध्ये अयातुल्ला खमेनी यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक सरकार स्थापन झाले. इथूनच या दोन देशांमधील मैत्रीचे नाते संपुष्टात आले. खमेनी यांनी इस्रायलला शत्रू देश म्हणून घोषित केले. आता 46 वर्षानंतर या दोन देशांमध्ये एवढी दरी वाढली आहे की, दोघंही एकमेकांचा विनाश करण्यासाठी आपली सर्व शक्ती खर्ची घालत आहेत. (Israel And Iran)
मध्यपूर्वेत चालू असलेले युद्ध आता परमाणु युद्धाकडे सरकत असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची धग अवघ्या जगावर पसरली आहे. इस्रायलनं इराणच्या नतांझ, तब्रिझ, केरमानशाह, अरक, तेहरान आणि इस्फहान या लष्करी तळांवर हल्ले केले. यात इराणचे लष्करप्रमुख, संरक्षण प्रमुखांसह सहा अणुशास्त्रज्ञही मारले गेले. इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी हा हल्ला केल्याचे इस्रायले पंतप्रधान नेतान्याहू यांनी सांगितले. इराणवर हे हल्ले झाल्याच्या काही तासानंच इराणनंही इस्रायलमध्ये मोठे हल्ले केले. त्यानंतर या दोन देशामध्ये अत्यंत विनाशक असे युद्ध सुरु झाले आहे. सुरुवातीला लष्करी तळांवर होणारे हल्ले आता मानवी वसाहतींवरही होऊ लागल्यानं दोन्ही देशांमधील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. (International News)
या सर्वात इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू वारंवार इराणच्या नागरिकांना राजवट बदला, असे आवाहन करीत आहेत. मुख्य म्हणजे, नेतान्याहू इराणच्या मुळे भाषेत, पर्शियन भाषेत हे आवाहन करीत आहेत. या सर्वांमागे कधीकाळी या दोन देशांमध्ये असणारी मैत्री आहे. 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली. चारबाजुंनी मुस्लिम देशांनी वेढलेल्या या देशाला सर्वच मुस्लिम देशांनी मान्यता दिली नाही. मात्र इराणचा शाह मोहम्मद रझा पहलवी यानं या देशाबरोबर मैत्रीचे संबंध जोडले. तेव्हा इराण हा जगाचा तेल निर्यातदार देश होता. इस्रायलची स्थापना झाली तेव्हा तिथे अत्यंत वेगानं विकास कामे सुरु होती. यात तेलाची असलेली आवश्यकता इराणनं पूर्ण केली. या बदल्यात इस्रायलने इराणला शस्त्रास्त्रे दिली. या दोन देशांमधील गुप्तहेर संघटनाही एकत्र काम करत होत्या. सात देशांनी जेव्हा संयुक्तपणे इस्रायलवर हल्ला केला तेव्हा इराण त्याच्या मदतीसाठी पुढे आला. (Israel And Iran)
1975 मध्ये जेव्हा इस्रायली सैन्य पुन्हा इजिप्तच्या सिनाईमध्ये घुसले तेव्हा इराणने इस्रायला आवश्यक तेलाचा पुरवठा केला. इस्रायलने इराणला शेती आणि पूल आणि रस्ते बांधणीत खूप मदत केली. इस्रायलनं शेतीमध्ये मोठी प्रगती केली होती, हे प्रगत शेती तंत्रज्ञानही इस्रायलनं इराणला दिलं. या दोन देशांमधील मैत्रीमध्ये अयातुल्ला खमेनी यांनी दरी आणली. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती आली. त्यानंतर या देशाची सर्व संस्कृतीच बदलली. जिथे महिलांना सर्व क्षेत्रात प्राधान्य होतं, तिथे महिलांना पडद्यागे झाकण्यात आलं. अनेक नियम लावण्यात आले. इराणमधील शाह मोहम्मद रझा पहलवी यांची सत्ता पार उलथवून टाकण्यात आली. अयातुल्ला खमेनी यांनी धार्मिक सरकारची स्थापना केली. खमेनी सत्तेवर आल्यावर त्यांनी पहिल्यांदा जे काम केले, ते म्हणजे, इस्रायलसोबत सर्व संबंध तोडून टाकले. इस्रायली दूतावास बंद केला. इराणमध्ये खुलेआम हिजबुल्लाह, हमाससारख्या इस्रायलचा विरोध करणा-या दहशतवादी संघटनांचे गट फिरु लागले. (International News)
इराणच्या या वाढत्या शत्रूत्वाच्या भावनेनं इस्रायलनं स्वतःच्या संरक्षणासाठी मोठी यंत्रणा उभारली. तर इराणणं 1990 पासून अणुकार्यक्रम हाती घेतला. याचा सर्वात धोका इस्रायलला असल्याची जाणीव झाल्यावर इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर संघटना कामास लागली. इस्रायलनं युएई, बहरीन या अरब देशांसोबत व्यापार वाढवला. इराणनं हमास, हिजब्बुल्ला सारख्या संघटनांना तेल्याच्या व्यापारातून मिळालेला प्रचंड पैसा देत भक्कम केलं. मग यामार्फतच इस्रायलवर छुपे हल्ले सुरु झाले. गेल्यावर्षी हमासनं जो इस्रायलवर हल्ला केला त्यामागची सर्व यंत्रणा इराणची होती. तेव्हापासून या दोन देशांमध्ये शत्रूत्व अधिक तीव्र झालं. गाझा युद्धदरम्यान इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली होती. या सर्वात इराण करत असलेल्या अणुप्रकल्पाची पूर्ण माहिती इस्रायलच्या मोसादकडे होती. इराणच्या अणुलॅबमध्ये 15 अणुबॉम्ब तयार होऊ शकतात, याची माहिती मिळाल्यावर इस्रायलनं या अणुकेंद्रांनाच लक्ष करण्यात आले. (Israel And Iran)
===========
हे देखील वाचा : Israel : इस्रायलचा पॅटर्न आणि मोसादचे प्लॅनिंग !
या युद्धाचा अंत कधी हे अद्यापही स्पष्ट होत नाही. इराणच्या मदतीसाठी चीन आणि रशियासारखे देश पुढे आले आहेत. तर इस्रायलच्या पाठिशी अमेरिका भक्कमपणे उभा राहिला आहे. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इऱाणमधील जनतेला आवाहन करीत आहेत. शहाच्या कार्यकाळात इराणनं जी प्रगती केली होती, त्या प्रगतीला खमेनी यांच्या धार्मिक कट्टरतेनं खिळ घातली आहे. यापासून मुक्त होण्यासाठी आता इऱाणच्या स्थानिक जनतेनं आंदोलन करावं, असे आवाहन वारंवार नेतन्याहू करीत आहेत. यातून इराणमध्ये सत्ताबदल होईल, आणि नव्या इराणच्या विकासासाठी इस्रायल साथ देईल, असे आश्वासनही ते देत आहेत. अर्थात या दोन देशांमधील युद्ध लवकरच शांततेच्या मार्गावर जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसं झालं तर ठिक, नाहीतर पुढच्या काही दिवसात दोन्ही देशांमधील युद्धामध्ये अन्य देशही सहभागी होण्याची शक्यता अधिक आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics