Home » Canada : प्रोजेक्ट पेलिकनमुळे खलिस्तानवाद्यांना हादरा !

Canada : प्रोजेक्ट पेलिकनमुळे खलिस्तानवाद्यांना हादरा !

by Team Gajawaja
0 comment
Canada
Share

कॅनडामध्ये 15 जून पासून सुरु होत असलेल्या जी-7 शिखर परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण मिळाल्यापासून तेथील खलिस्तानवाद्यांनी आंदोलन सुरु केले होते. शिवाय पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला करण्याची धमकीही दिली होती. या सर्वांमुळे पतंप्रधान मोदी यांच्या कॅनडा दौ-यातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतांना कॅनडामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. कॅनडाच्या पील रीजनल पोलिसांनी “प्रोजेक्ट पेलिकन” नावानं एक मोहीम चालू केली आहे. यातून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला आहे. (Canada)

या नेटवर्कचे खलिस्तान समर्थक, मेक्सिकन ड्रग कार्टेल आणि आयएसआयशी संबंध आहेत. ड्रग्जपासून मिळवलेले पैसे भारतविरोधी कारवायांमध्ये वापरले जात असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या कॅनडा दौऱ्यापूर्वी झालेली ही सर्वात मोठी कारवाई असून यातून खलिस्तान समर्थक ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. कॅनडामध्ये रहात असलेल्या भारतीय नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्वातून खलिस्तान समर्थक हे पाकिस्तानच्या आयएसआय सोबत भारताविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचेही आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला जाणार आहेत. यापूर्वी, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदी यांना कॅनडात येण्याचे आमंत्रण दिले म्हणून खलिस्तान समर्थकांनी थेट मोदी यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. तसेच कॅनडामध्ये निदर्शनेही केली. यामुळे सतर्क झालेल्या कॅनडा सरकारनं भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तान्यांना पकडण्यासाठी ‘प्रोजेक्ट पेलिकन’ नावाची मोहीम सुरू केली आहे. (International News)

या अंतर्गत कॅनडाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करुन खलिस्तान समर्थक ड्रग्ज आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. जी-7 शिखर परिषद, 15 ते 17 जून दरम्यान कॅनडातील अल्बर्टा येथील कनानास्किस येथे होणार आहे. यात पंतप्रधान मोदी कधी जाणार या तारखेचा अद्याप खुलासा झाला नसला तरी, खलिस्तानवाद्यांनी त्यांना दिलेल्या धमकीमुळे चिंता व्यक्त कऱण्यात येत होती. त्यातच कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कायम खलिस्तानवाद्यांना खतपाणी घातले होते. त्यामुळे नवीन पंतप्रधान मार्क कार्नी खलिस्तान समर्थकांबाबत काय भूमिका घेणार याबाबत प्रश्नचिन्ह होते. पण प्रोजेक्ट पेलिकन मोहीमेमुळे कॅनडातील खलिस्तान समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. (Canada)

प्रोजेक्ट पेलिकन अंतर्गत आतापर्यंतची ड्रग्ज विरोधार सर्वात मोठी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी 479 किलो कोकेन जप्त केले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 47.9 दशलक्ष डॉलर्स आहे. यासोबतच पोलिसांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या सात लोकांसह एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या सर्वांवर 35 आरोप दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्र कायद्याचे उल्लंघन यांचाही समावेश आहे. ही कारवाई पंतप्रधान मोदी यांच्या कॅनडा दौ-याच्या आधी झाल्यानं त्याला महत्त्व आलं आहे. यामुळे कॅनडाचे भारतासोबतचे संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी पुढाकार घेत असल्याचे संकेतही मानण्यात येत आहे. (Canada)

कॅनडा पोलिसांनी ड्रग्ज व्यवसायातील मोठी टोळी गजाआड झाली आहे. या टोळीतील सदस्यांनी कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये ड्रग्जचे मोठे जाळे विणले होते. अमेरिका आणि कॅनडा दरम्यान व्यावसायिक ट्रकद्वारे ड्रग्जची वाहतूक करण्यात येत असे. या टोळीचे मेक्सिकन ड्रग कार्टेल आणि ड्रग वितरकांशी संबंध होते. ड्रग्ज विकून मिळालेला पैसा निदर्शने, जनमत चाचणी, शस्त्रे खरेदीसह भारतविरोधी कारवायांमध्ये वापरण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. गंभीर गोष्ट म्हणजे, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे या ड्रग्ज नेटवर्कला सहकार्य मिळत होते. (International News)

===========

हे देखील वाचा : Iran-Israel War : इराण – इस्रायल संघर्षाचा भारतावर काय परिणाम ?

शिवाय खलिस्तान समर्थक मेक्सिकन कोकेन आणि अफगाण हेरॉइनची तस्करीही करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. कॅनडामध्ये ट्रक वाहतूक आणि स्टोरेजच्या साधनांवर खलिस्तान समर्थकांचे वर्चस्व आहे. याच माध्यमाचा वापर ते ड्रग्ज आणि अन्य नशेच्या पदार्थांची तस्करी, वाहतूक करण्यासाठी करतात. गेल्या वर्षापासून कॅनडाच्या पोलीस यंत्रणेने यावर लक्ष ठेवले होते. यासाठी कॅनडातील सुरक्षा एजन्सीही सोबत होत्या. या तपासादरम्यान कॅनडा आणि अमेरिकेतील अनेक एजन्सींनी ट्रक, स्टोरेज युनिट्स संशयास्पद असल्याचे आढळून आले. कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सी आणि यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन यांच्या मदतीनं मग मोठी कारवाई करण्यात आली. आता या सर्वात पाकिस्तानच्या आयएसआयचे नावही पुढे आल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Canada)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.