भारतीय राज्यघटना म्हणजे भारताचा सर्वात मोठा कायदेशीर दस्तावेज आहे. राज्यघटनेच्या स्थापनेचा प्रवास खूपच रंजक आहे. आपल्या राज्यघटनेविषयी काही मनोरंजक गोष्टी अनेकांना माहिती नसतील. या लेखात अशा ९ रंजक गोष्टींची माहिती घेऊया.
१. सर्वात मोठी राज्यघटनाः
भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. यामध्ये प्रस्तावना (Preamble) आणि 228 भाग आहेत, ज्यामध्ये ४४८ आर्टिकल्स, १२ शेड्यूल्स, ५ परिशिष्ट आणि ११५ दुरुस्ती (amendments) आहेत.
२. हस्तलिखित दस्तावेज:
अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण मूळ राज्यघटना हा एक हस्तलिखित दस्तावेज आहे. मूळ प्रत भारतीय लेखक श्री प्रेम बेहारी नारायण रायजादा यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेली आहे. संपूर्ण हस्तलिखित २५१ पृष्ठांचं होतं आणि वजन होतं ३.७५ किलो. इंग्रजी आवृत्तीमध्ये एकूण १,१७,३६९ शब्द होते. वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी घटनेचा हिंदी भाषेत अनुवाद केला.

३. मूळ प्रत:
भारतीय राज्यघटनेच्या मूळ हिंदी आणि इंग्रजी प्रती भारतीय संसदेच्या ग्रंथालयात हेलियमने भरलेल्या काचेच्या पेटिमध्ये ठेवल्या आहेत.
४. अशोकचक्र
२६ जानेवारी १९५० रोजी अशोकचक्र आपल्या देशाचं राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारण्यात आलं. यात शक्ती, धैर्य, अभिमान आणि आत्मविश्वास दर्शविणारे ४ सिंह एकमेकांकडे पाठ करून उभे आहेत.
५. शांतिनिकेतनमधील कलाकारांचा सहभाग:
राज्यघटनेचे मूळ हस्तलिखित आकर्षक करण्यासाठी बेओर राममनोहर सिन्हा आणि नंदालाल बोस यांनी शांतीनिकेतनमधील इतर कलाकारांच्या मदतीने त्यामध्ये अनेक चित्रांचा समावेश केला.

६. विवाद:
राज्यपालांना देण्यात आलेल्या जास्तीच्या अधिकारांबद्दल चर्चा करताना झालेल्या विवादामध्ये डॉ. आंबेडकर यांनी घटनेत दुरुस्ती करण्याच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. त्यावेळेस संतापलेल्या आंबेडकरांनी घटना जाळून टाकण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्यावेळी ते म्हणाले होते –
“I am quite prepared to say that I shall be the first person to burn it out. I do not want it,” were his words!
७. उचलेगिरीचा आरोप
भारतीय राज्यघटनेबद्दल बोलताना अनेक वेळा ‘इकडून तिकडून उचलून लिहिलेली घटना’ असे म्हटले जाते कारण मसुदा तयार करताना समितीने इतर देशांच्या राज्यघटनेमधील काही तरुतुदींचा त्यामध्ये समावेश केला.
उदा. फ्रेंच राज्यघटनेतून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व; सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स युनियनच्या घटनेमधून पंचवार्षिक योजनांची संकल्पना आणि जर्मनीच्या वेमर घटनेमधून आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या निलंबनाची संकल्पना घेतली आहे, तर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेतुन प्रेरित आहे.
परंतु, खरंतर भारतीय राज्यघटना ही फ्रेंच आणि / किंवा इतर देशांच्या राज्यघटनांपेक्षा संपूर्ण वेगळी आहे. दुसऱ्याकडून चांगल्या गोष्टी घेण्यात काहीही आक्षेपार्ह किंवा अनैतिक नाही आणि यामुळे संपूर्ण राज्यघटना चुकीचीही ठरत नाही किंवा याला उचलेगिरीही म्हणता येणार नाही.
८. दुरुस्ती (Amendments):
जेव्हा पहिला मसुदा तयार करून चर्चेसाठी सर्वांसमोर ठेवण्यात आला तेव्हा त्यामध्ये २००० हून अधिक वेळा दुरुस्ती करण्यात आली. घटना अस्तित्वात आल्यापासून जानेवारी २०२० पर्यंत त्यामध्ये एकूण १०४ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.
=====
हे देखील वाचा: …आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले
=====
९. घटना दिनः
भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आला. सन २०१५ पासून हा दिवस ‘भारतीय राज्यघटना दिन’ म्हणून साजरा केला जातो. याला ‘भारतीय संविधान दिन’ असेही म्हटले जाते.
तर, ही होती भारतीय राज्यघटनेसंबंधित काही रंजक तथ्ये.