Home » पूर्णत्वाचा अनुभव देणारे शबरीमलय मंदिर (Sabarimala Temple)

पूर्णत्वाचा अनुभव देणारे शबरीमलय मंदिर (Sabarimala Temple)

by Correspondent
0 comment
Share

गेल्या आठवड्यात सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ होता, अजय देवगणचा. बॉलिवूडचा हा फाईटमास्टर भगवान अय्यप्पन मंदिरात, म्हणजेच शबरीमलय (Sabarimala Temple) मंदिरात दिसला.  

शबरीमलय मंदिर (Sabarimala Temple) देशातच नाही, तर विदेशातही विख्यात आहे. वर्षातील काही मोजक्या दिवशी या मंदिरात भगवान अय्यप्पांच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. त्यासाठी मंदिरापर्यंतचा प्रवास हा भक्तांच्या भक्तीची कस पहाणारा असतो. अजय देवगणनं हा प्रवास केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्या चाहत्यांनी कौतुक केलच…पण अय्यप्पन भक्तांनीही अजयला शुभेच्छा दिल्या आहेत.  

ajay devgan in sabarimala temple
ajay devgan in sabarimala temple

केरळच्या पतनमतिट्टा जिल्ह्याच्या पेरियार टायगर अभयारण्यात वसलेलं शबरीमलय मंदिर (Sabarimala Temple) हे जगविख्यात मंदिर आहे. वर्षातून तीनवेळाच या मंदिरात जाता येते. विषु, म्हणजे एप्रिल महिन्याच्या मध्यावर, मार्गशीष महिन्यात होणाऱ्या मण्डलपूजेला आणि मलरविलक्कु, म्हणजेच मकर संक्रांतीला येथे जाता येते. त्यातही मकर संक्रांतीची यात्रा अधिक पावन मानली जाते. 

दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान भारतातील भाविकांसह विदेशातील भाविक मंडळीही या मंदिराला भेट देतात.  या मंदिरात येणाऱ्या  भाविकांची संख्या पाच कोटीच्या आसपास असते.  या भाविकांची सर्व व्यवस्था त्रावणकोर देवासवम बोर्डातर्फे करण्यात येते. भगवान अय्यप्पन यांना समर्पित असलेल्या या मंदिरात येण्यासाठी भक्तांना ४१ दिवसांच्या कठोर व्रताचे पालन करावे लागते. याला मण्डलम् म्हणतात.  

पम्बा नदिच्या काठावर असलेला या मंदिराचा परिसर नितांत सुंदर आहे. इथे गेल्यावर अत्यंत कठिण प्रवास केलेल्या अय्यप्पन भक्तांचा या परिसरात आल्यावर सगळा थकवा दूर होतो आणि त्यांना स्वर्गीय सुखाचा अनुभव होतो. मल्याळम मध्ये शबरीमलाचा अर्थ पर्वत असा होतो. पंपा येथून शबरीमलयपर्यंत पायी यात्रा करावी लागते.  हे पाच किलोमिटरचे अंतर घनदाट झाडांनी व्यापलेले आहे. 

Ayyappa Temple, Sabarimala
Sabarimala Ayyappa temple

समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीवर असलेले शबरीमलय मंदिर (Sabarimala Temple) पौराणिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मंदिरातील शांत वातावरण भक्तांना सुखावते. मंदिराच्या भोवती १८ डोंगर आहेत. मंदिराच्या प्रांगणात पोहचण्यासाठी १८ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरात अय्यप्पन यांच्याशिवाय मालिकापुरत्त अम्मा, गणपती, नागराज यांच्याही मुर्ती आहेत.  

उत्सव काळात अय्यप्पन यांच्यावर मंत्रांच्या घोषात तूपाचा अभिषेक करण्यात येतो. यावेळी मंदिर परिसरात हत्तीदेखील असतात. पूजा झाल्यावर भाविकांना तांदूळ, गुळ आणि तूपापासून बनवलेला प्रसाद म्हणजेच ‘अरावणा’ वाटला जातो.  

मकर संक्रातीशिवाय नोव्हेंबर महिन्याच्या १७ तारखेलाही इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. मल्याळम महिन्याच्या पहिल्या पाच दिवसातही मंदिराचे दरवाजे अर्थात ‘कपाट’ उघडले जातात. याव्यतिरिक्त मात्र वर्षभर सर्वसामान्य भाविकांसाठी शबरीमलय मंदिर (Sabarimala Temple) बंद असतं.  

=====

हे ही वाचा: भारतातील ‘या’ ५ मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही (Men are not allowed)

=====

श्री अयप्पन ब्रह्मचारी असल्यामुळे या मंदिर परिसरात महिलांना प्रवेश नाही. मात्र लहान मुली आणि वयोवृद्ध महिलांना प्रवेश दिला जातो. काही वर्षापूर्वी याबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र मंदिराचे व्यवस्थापन आपल्या परंपरा पाळण्याच्या निश्चयावर ठाम राहिले. 

शबरीमलयला जाणारे भाविक सहज ओळखता येतात कारण त्यांचा पोशाख हा खास असतो. काळी वस्त्र आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा धारण करुन या मंदिरात गेल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धारणा  आहे. माळा धारण केलेल्या भक्तांना स्वामी म्हणून संबोधण्यात येते. यातून ईश्वर आणि भक्त एकरुप झाल्याचे मानण्यात येते. 

 Sabarimala Temple
Sabarimala Temple

शबरीमलम मंदिरपर्यंत पोहचणारा रस्ता हा वनराईंनी व्यापलेला असला तरी येथे पोहचण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. पंपा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. इथपर्यंत रेल्वे, विमान, गाडी या कुठल्याही उपलब्ध साधनांनी पोहचता येते. पंपापासून पाच किमीचा प्रवास हा डोंगरातून पायवाटेवरून करावा लागतो.  हा रास्ता कठीण वाटत असला तरी निसर्गाचे वरदान लाभलेला हा सर्व परिसर अत्यंत सुंदर आहे. 

=====

हे ही वाचा: हिंदुराष्ट्र: जगातील ‘या’ १० देशात आहेत सर्वाधिक हिंदू; पाच नंबरचा देश तर हिंदूंचं करतोय धर्मांतर

=====

या मंदिसाच्या आसपास भक्त निवास आणि रहाण्यासाठी अन्य व्यवस्थाही असल्यामुळे भाविकांची गैरसोय होत नाही. पेरियार टायगर अभयारण्य हे जैवविविधतेनं नटलेलं जंगल आहे. शबरीमलय यात्रा म्हणजे मनुष्याच्या सहनशक्तीची परीक्षा पहाणारी यात्रा आहे, असेही म्हटले जाते. मात्र ही यात्रा पूर्ण केल्यावर मिळणारा आनंद हा स्वर्गीय असतो.  त्यामुळेच करोडो भाविक दरवर्षी भगवान अय्यप्पन यांच्या चरणी लीन होतात. 

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.