रोहीत आर. आर. पाटील (Rohit R. R. Patil) या अवघ्या २३ वर्षाच्या तरुण तडफदार नेत्याकडे बघून, सामान्य माणसांना “एकाच या जन्मी जणू, फिरूनी नवी जन्मेन मी…” या ओळींचा प्रत्यय येत आहे.
एखाद्या जवळच्या माणसाच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते, ती खरं तर त्याच्या स्वकीयांनाच अधिक जाणवत असते. पण आयुष्यभर त्या माणसानं दिलेली विचारांची शिदोरी घेवून काम केले, तर वेळोवेळी एक हात डोक्यावर असल्याचा आभास निर्माण होतो आणि तेव्हा लढण्याची एक वेगळीच उर्मी मिळते. मग लोक त्या व्यक्तीचा वारसा चालवणाऱ्यांमध्ये त्या गेलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब बघतात.
लोकप्रिय नेते स्व. आर. आर. आबा आज आपल्यात नाहीत, पण लोक त्यांच्या मुलामध्ये त्यांची छबी बघू लागले आहेत. कवठेमहंकाळ नगरपंचायतीचा निकाल लागला आणि ज्युनिअर आर. आर. राजकीय पटलावर आला. गेल्या सात वर्षापासून आर. आर. यांची पोकळी राज्याला जाणवत होती. कदाचित निमित्त कवठेमहंकाळ ठरेल, पण महाराष्ट्रासाठी पुन्हा आर. आर. येत आहेत, याचीच चाहूल जणू निर्माण होऊ लागली आहे.
‘ग्रामीण भागाचे राजकारण हे काय पोरा ठोरांचं काम न्हाय’, असं म्हणतात. पण रोहीत आर. आर. पाटील (Rohit R. R. Patil) या २३ वर्षाच्या मुलाने याला छेद दिला आहे. मोठया बापाचा मुलगा ही बिरूदावली केवळ लौकीक अर्थाने रोहीतच्या मागे लागलेली.
आबा हयात असतानाही रोहीतला त्यांचा सहवास लाभला नाही आणि तसा लाभ, चैन, ऐशोआरामही मिळवता आला नाही. आबा असताना अपेक्षीत सुख तर नाहीच, पण आबा नसतानाही रोहीतला अभिमन्यूसारखं लढावं लागतंय. तरीही तो उभा राहिला.. लढला आणि जिंकलाही…!
राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिली, ती कवठेमहंकाळ नगरपंचायतीची निवडणूक. आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झालेली, आबांच्या पश्चात रोहितची ही पहिलीच निवडणूक, त्यात कमी म्हणून की काय, राष्ट्रवादीचा एक गट, भाजपा, शिवसेना आणि उरले सुरले बाकीचे सारेच जण रोहीतच्या विरोधात उभे ठाकले. आरोप प्रत्यारोप झाले.
रोहीत आर. आर. पाटील आबांची नक्कल करतो अशी टिका झाली. त्याला जमणार नाही, असे सांगत काहींनी त्याचे खच्चीकरणही करण्याचा प्रयत्नही केला. पहिल्याच निवडणूकीत समोर दिग्गज प्रतिस्पर्धी, दहशत अशी परिस्थिती असताना थोडं गांगरून जाणं स्वाभाविक होतं. नेता खंबीर नसला की, मग कार्यकर्तेही डळमळीत होतात.
सुरवातीला रोहीतच्या पॅनेलला अनेक राजकीय पंडीतांनी किरकोळीतच काढलं होतं. पण रोहीत पाटीलने स्वतः निर्धार केला. प्रत्येक माणूस टिपला. प्रत्येक घर पालथे घातले. त्याला बघायला माणसं गोळा होऊ लागली. यामुळे हळूहळू कार्यकर्त्यांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला. बघता बघता माहौल झाला. भाषणावर भाषणे झोडपली, विकासाचे व्हिजन पुढे आणले. झालेल्या टिकांना अफलातून उत्तरे दिली.
निवडणूक कवठेमहंकाळची होती आणि ज्युनिअर आर. आर. राज्याचं आकर्षण केव्हा झाला, हे कळलंच नाही.
तो एकाकी पडला, असे काहीसे चित्र निर्माण केले गेले. त्यातच बापाचा उल्लेख झाला आणि… ‘माझा बाप निकालानंतर सर्वांना आठवेल’, किंवा ‘आता २३ वर्षांचा आहे, २५ पर्यंत काही शिल्लकच ठेवत नाही’ अशी रोहितची वक्तव्ये राज्यभर गाजली. पण या बोलण्यामागे कसलाही उन्मत्तपणा नाही, तर ती क्रियेची प्रतिक्रीया आहे, हे पटवून देण्यात ‘टीम रोहीत’ यशस्वी झाली. लोकांनी त्याचे बोलणे स्विकारले आणि रोहीतची मोहिम फत्ते झाली.
=====
हे देखील वाचा: जनतेच्या मनातलं आर. आर. आबांचं स्थान अढळ – उपमुख्यमंत्री अजित पवार
=====
आज कवठेमहंकाळ नगरपंचायतीत रोहीत आर. आर. पाटील ( (Rohit R. R. Patil) यांची एकहाती सत्ता आली आहे. संयमीतपणे त्यानं विजय पचवला, कदाचित त्याच्या पुढील राजकारणाची ही यशस्वी चाहूल असावी.
“१९ तारखेला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”, असे रोहित भाषण करताना कदाचित बोलून गेला असेल, पण आज जेव्हा १९ तारखेची सकाळ उजाडली तेव्हा कोणी स्वतःच्या मनातलं खरं सांगेल अथवा न सांगेल, पण आज राज्याच्या कानाकोपर्यातल्या प्रत्येकालाच आठवले असतील ते, ‘रोहीतचे आबा!
“आवाज जनतेचा दाही दिशांतून घुमला… आर. आर. आले पुन्हा…”
– संतोष दादा