Home » Golconda Blue Diamond : गोलकोंडा ब्लू डायमंडचा होतोय लिलाव !

Golconda Blue Diamond : गोलकोंडा ब्लू डायमंडचा होतोय लिलाव !

by Team Gajawaja
0 comment
Golconda Blue Diamond
Share

भारताच्या इतिहासाशी संबंधित असलेला गोलकोंडा ब्लू डायमंड प्रमथच जगासमोर येणार आहे. भारतातील या प्रसिद्ध शाही हिऱ्याचा जिनेव्हामध्ये पहिल्यांदाच लिलाव होणार आहे. या गोलकोंडा ब्लू डायमंडची अंदाजे किंमत 430 कोटीच्या घरात आहे. भारतातील राजघराण्यातील प्रतिष्ठित असलेला हा हिरा 14 मे रोजी जिनिव्हा येथील क्रिस्टीज मॅग्निफिसेंट ज्वेल्स सेलमध्ये पहिल्यांदाच लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. हा लिलाव जिनिव्हा येथील फोर सीझन्स हॉटेल डेस बर्गेस येथे होणार आहे. पॅरिसमधील प्रसिद्ध डिझायनर JAR ने या 23.24 कॅरेटच्या चमकदार ऐतिहासिक निळ्या हिऱ्याला एका आकर्षक आधुनिक अंगठीत बसवले आहे. भारतातील आंध्र प्रदेशातील गोदावरी-कृष्ण त्रिभुज प्रदेशातील गोलकोंड्याच्या खाणीतून या हि-याचा शोध लागला होता. हा हिरा एकेकाळी इंदूर आणि बडोद्याच्या राजघराण्यांकडे होता. आता अनेक वर्षानंतर हा गोलकोंडा ब्लू डायमंड जगासमोर येणार आहे. या हि-याची एक झलक बघणेही हिरे शौकीनांसाठी उत्सुकतेचे आहे. (Golconda Blue Diamond)

भारताच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या गोलकोंडा ब्लू डायमंडचा लिलाव होणार आहे. या हि-याचे वजन 23.24 कॅरेट असून सध्या त्याची किंमत 430 कोटीच्या घरात आहे. लिलावामध्ये ही किंमत अधिक वाढण्याची शक्यता आहे. सध्या हा प्रसिद्ध हिरा पॅरिसमधील JAR या ज्वेलरी डिझायनरकडे आहे. त्यांनी या हि-याला आधुनिक आणि आकर्षक अंगठीमध्ये बसवले आहे. ही गोलकोंडा ब्लू डायमंड असलेली अंगढी कुठला धनाढ्य घेणार याची उत्सुकता आहे. हि-यांच्या दुनियेमध्ये गोलकोंडा ब्लू डायमंड हा एकमेवाद्वितीय हिरा म्हणून ओळखला जातो. आता हा हिरा जवळपास 259 वर्षांनी सर्वांसमोर येणार आहे. (International News)

1920 आणि 1930 च्या दशकात हा हिरा इंदूरचे महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांच्या मालकीचा होता. महाराजा यशवंतराव होळकर त्यांच्या आधुनिक जीवशैलीसाठी ओळखले जात होते. 1923 मध्ये, त्यांच्या वडिलांनी प्रसिद्ध फ्रेंच ज्वेलर चौमेटकडून एक ब्रेसलेट बनवून घेतले. त्यामध्ये गोलकोंडा ब्लू डायमंड जडवला गेला होता. याशिवाय ‘इंदूर पेअर्स’ नावाचे आणखी दोन गोलकोंडा हिरेही या ब्रेसलेटमध्ये जडवण्यात आले होते. महाराजा यशवंतराव यांनी आधुनिक ज्वेलरी डिझाईनसाठी फ्रेंच ज्वेलर्स मौबौसिन यांना त्यांचे शाही ज्वेलर्स म्हणून नियुक्त केले. मौबौसिन यांनी इंदूरच्या शाही घराण्यातील ज्वेलरीला फ्रेंच टच दिला. (Golconda Blue Diamond)

त्यात मौबौसिन यांनी गोलकोंडा ब्लू डायमंड आणि ‘इंदूर पिअर्स’ हिरे एकत्र करून एक आकर्षक नेकलेस तयार केला. हा हार खूप प्रसिद्ध झाला. प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार बर्नार्ड बुटेट डी मोनवेल यांनी राणीचे चित्र काढले होते. त्यातही हाच गोलकोंडा ब्लू डायमंड असलेला रत्नहार काढला होता. नंतर हा हार आणि त्यातील गोलकोंडा ब्लू डायमंड भारताबाहेर गेला. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी, हा हिरा न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध ज्वेलर्स हॅरी विन्स्टन यांनी खरेदी केला. त्यांनी या हि-याला पुन्हा वेगळे रुप दिले. रत्नहारामधून गोलकोंडा ब्लू डायमंड बाहेर काढण्यात आला आणि एका मौल्यवान पांढ-या हि-यासोबत त्याला ब्रोचमध्ये जडवण्यात आले. यानंतर हा ब्रोच पुन्हा भारतात आला, तो बडोद्याच्या महाराजांकडे. त्यानंतर हा गोलकोंडा ब्लू डायमंड अनेक वर्ष बडोद्याच्या राजघराण्याची शान म्हणून ओळखला गेला. आता हा अमूल्य आणि ऐतिहासिक हिरा पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे. या अनमोल हि-याचा लिलाव होत आहे. जिनिव्हा येथील ‘फोर सीझन्स हॉटेल डेस बर्गेस’ येथे होणा-या या लिलावासाठी जगातील धनाढ्य व्यावसायिक आणि राजघराण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत. (International News)

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

भारतातील गोलकोंडा हिरे त्यांच्या आकार आणि चकाकीसाठी ओळखले जातात. आता या गोलकोंडा प्रदेशातील खाणी रिकाम्या असल्या तरी एकेकाकई येथून निघालेल्या हि-यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. याच गोलकोंडा खाणीतून बाहेर आलेला दर्या-ए-नूर हा हिरा तेहरानमधील इराणच्या सेंट्रल बँकेच्या इराणी क्राउन ज्वेल्स संग्रहाचा भाग आहे. द ग्रेट मोगल डायमंड आणि ऑर्लोव्ह डायमंड हे मॉस्कोमधील क्रेमलिन शस्त्रागाराच्या डायमंड फंड संग्रहालयात आहेत. जगप्रसिद्ध कोहिनूर ही याच खाणीमधून आलेला आहे. ब्रिटनच्या राजघराण्याची आता त्याच्यावर मालकी असून टॉवर ऑफ लंडन येथील ज्वेल हाऊसमध्ये हा हिरा ठेवण्यात आला आहे. (Golconda Blue Diamond)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.