सध्या इंग्लडमध्ये एका भारतीय नावाची जोरदार चर्चा आहे, ते नाव म्हणजे ऋषी सुनक (Rishi Sunak)! एकेचाळीस वर्षीय ऋषी सुनक सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. अत्यंत हुशार असणाऱ्या ऋषी सुनक यांची भारतीयांसाठी अजून एक महत्वाची ओळख म्हणजे, ते इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांचे जावई आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची जागा ऋषी सुनक घेऊ शकतात, अशी चर्चा सध्या ब्रिटनच्या माध्यमांमध्ये आहे. कोरोना काळात झालेल्या पार्टीमुळे पंतप्रधान जॉन्सन यांच्यावर टीकेचा भडीमार होत असून, ऋषी सुनकच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याची चर्चा ब्रिटनच्या वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.
सन २०२० मध्ये ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध लागू होते. अशावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ‘बोरिस जॉन्सन’ यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केली. सुरुवातीला ही माहिती समोर आल्यावर बोरिस जॉन्सन यांनी या सर्वांला नकार दिला. मात्र सोशल मिडीयावर त्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आल्यावर त्यांनी माफी मागितली. परंतु, जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठीचा दबाव वाढतच चालला आहे. या सर्वात भारतीय वंशाच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि प्रीति पटेल यांची नावं जास्त चर्चेत आहेत.
ब्रिटनचे ५७ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही विरोध होत आहे. या दबावामुळे जॉन्सन राजीनामा देऊ शकतात, असे मत ब्रिटनच्या मुख्य वर्तमानपत्रात व्यक्त करण्यात आलं आहे. जॉन्सन यांच्यानंतर ऋषी सुनक, परराष्ट्र मंत्री लिज ट्रूस, कॅबिनेट मंत्री मायकल गोव, माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ओलीवर डॉउडेन यांची नावेही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत. या सर्वात ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे नाव सर्वाधिक पसंतीचे आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले होते. अशावेळी देशाचा पंतप्रधान पार्टीमध्ये मग्न होते, ही गोष्ट ब्रिटनच्या नागरिकांना पटली नाही. मुख्य म्हणजे, ज्या दिवशी नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले, त्याच दिवशी ही पार्टी झाली.
या सर्व नाराजीचं आणखी एक कारण म्हणजे जॉन्सन यांनी ही पार्टी केली तेव्हा ड्यूक ऑफ एडिनबर्ग ‘प्रिंस फिलिप’ यांचे निधन झाले होते. ब्रिटनच्या शाही घराण्याच्या दुःखात अवघा देश सामील झाला होता. या शाही घराण्यानेही लॉकडाऊनचे नियम पाळत ‘प्रिंस फिलिप’ यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी पार्टी करावी हे ब्रिटीश जनतेला पटलं नाही.
या सर्वांवर टीका झाल्यावर जॉन्सन यांनी आपला यात सहभाग नसल्याचे सांगितले. यावर या पार्टीच्या आमंत्रण पत्रिकेचा ईमेलच प्रसिद्ध करण्यात आले. पंतप्रधानांचे खासगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांनी हे ईमेल पाठवले होते. सन २०२० मध्ये पंतप्रधानांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालय आणि सरकारी निवासस्थानी सोशली डिस्टन्स ड्रिंक्स नावाखाली होणाऱ्या पार्टीचं आमंत्रण या ईमेलमध्ये होतं. ईमेल प्रसिद्ध झाल्यावर जॉन्सन यांनी माफी मागितली. पण त्यानंतरही या पार्टीचे भूत जॉन्सन यांच्या मागे राहिले आहे.
या पार्टीनंतर जॉन्सन यांच्या कन्झर्व्हेटीव्ह सरकारवर आरोपांची रांग लागली. विरोधकांना निर्बधांची भीती दाखवून सत्ताधारी पक्षांनी मात्र कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. यामुळे कन्झर्व्हेटीव्ह सरकारची लोकप्रियता कमी होऊन ३६ टक्क्यांवर आली आहे.
यावर उपाय म्हणून पंतप्रधन बोरीस जॉन्सन यांच्या जागी ऋषी सुनक यांना पंतप्रधान करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. सुनक यांना आत्ताच पंतप्रधानपदाची धुरा दिल्यास २०२४ मध्ये होणाऱ्या ब्रिटनमधील निवडणुकीत कन्झर्व्हेटीव्ह पक्षाला जास्त जागा मिळतील, असेही सांगण्यात येत आहे.
या सर्वात चर्चेत आलेले ऋषी सुनक प्रसिद्ध बॅंकर असून, सध्या ते ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. सन १९८० मध्ये युकेस्थित पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉक्टर असून, आई फार्माईस्ट आहे. हे सुनक कुटुंब १९६० च्या सुमारास इंग्लडमध्ये स्थायिक झालं.
ऋषी सुनक यांचे शिक्षण विंचेस्टर कॉलेज मध्ये झाले असून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी तर, स्नैनफोर्ड युनिव्हसिटीमधून एमबीएची पदवी घेतली. बॅंकर म्हणून नावाजलेले ऋषी सुनक २०१५ मध्ये राजकारणात आले. थेरेसा मे यांच्या सरकारमध्ये संसदीय सचिव म्हणून ऋषी सुनक यांनी काम सांभाळलं. त्यांच्या पत्नीचें नाव ‘अक्षता मुर्ती’ असून, या दाम्पत्यांला ‘कृष्णा’ आणि ‘अनुष्का’ या दोन मुली आहेत.
ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्याबरोबरच भारतीय वंशाच्या प्रीती पटेलही पंतप्रंधान पदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जातात. त्या सध्या ब्रिटनच्या गृहमंत्री आहेत. २०१९ मध्ये प्रीती या गृहसचिव म्हणून कामकाज पाहू लागल्या. कन्झर्व्हेटीव्ह पक्षाच्या सदस्या असलेल्या प्रीती पटेलही सध्या ब्रिटनच्या जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूनेही अनेकांनी आपली मतं नोंदवली आहेत.
हे ही वाचा: बर्फवृष्टीमुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये जेव्हा अध्यक्ष ‘जो बायडन (Joe Biden)’ अडकून पडतात तेव्हा…
डोकं चक्रावून टाकणारे जगातील ५ विरोधाभास! बघा तुम्हाला काही सुचतंय का?
भारतीय वंशाच्या दोन व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदार आहेत, हीच खूप आनंदाची गोष्ट आहे. ऋषी सुनक वा प्रीती पटेल यापैकी कोणीही ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली, तर ती सर्व भारतीयांसाठी गौरवाची गोष्ट असेल.
– सई बने