‘शंभू राजेंचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे.’ अशी पोस्ट राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केली आणि मनुस्मृतीवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. नुकताच आलेला छावा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाचा शेवट पाहून भावनिक होणाऱ्यांच्या अनेक व्हिडिओ आपण पाहिल्याच असतील. रोहित पवार यांनीही छावा पाहिला आणि यानंतर त्यांनी एक सोशल मिडीयावर एक पोस्ट केली, त्यात मनुस्मृतीचा उल्लेख केला, ज्यामुळे बराच वाद उफाळून आला. पण खरच शंभू राजेंची हत्या ही मनुस्मृतीनुसार झाली होती का ? याबाबत समकालीन कागदपत्रांमधील इतिहास काय सांगतो, जाणून घेऊ. (Manusmriti)
आधी शंभू राजे कैद झाल्याचा घटनाक्रम पाहुया. शंभू राजेंची कैद ही मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुखद आणि दुर्दैवी घटना ! संगमेश्वरी शंभू राजेंसोबत मराठा सरदारांनी मुकर्रब खानाचा प्रतिकार केला, पण त्यांचं सैन्य मराठ्यांच्या ५-६ पट होतं. या लढाईत सरनोबत म्हळोजी घोरपडे यांना वीरमरण आलं. संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ वाट मिळेल तिथून निसटले. मात्र शंभू राजे आणि कवी कलश खानाच्या तावडीत सापडले. त्यांच्यासोबत इतर २५ जणांनाही अटक करण्यात आली होती. यावेळी औरंगजेब आपली छावणी दौंडजवळच्या बहादूरगड इथे लावायला निघाला होता. त्यामुळे जखमी राजबंद्यांना घेऊन खान बहादूरगडाकडे निघाला.(History)
१५ फेब्रुवारी १६८९ रोजी शंभू राजे आणि कवी कलश यांच्या छावणीच्या बाजारातून धिंड काढून विटंबना करण्यात आली. यांचं वर्णन मुघलांचे अखबारी साकी मुस्तैदखान, खाफीखान, ईश्वरदास नागर, इटालियन प्रवासी निकोलाओ मनुची यांनी सविस्तर वर्णन केलं आहे. यावेळी औरंगजेबाने आदेश दिला की, शंभू raje आणि कलश यांच्या अंगावर तख्ता कुलाह म्हणजेच गुन्हेगाराचे कपडे आणि विदुषकाची टोपी चढवावी. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पीडा देऊन त्यांची विटंबना करावी. ढोल बडवित त्यांना दरबारात आणावे. हे पाहून इस्लामियांना आनंद होईल आणि काफरांचा प्राण कंठाशी येईल. यावेळी त्यांची ११ मैलापर्यंत धिंड काढण्यात आली. हे सर्व साकी मुस्तैदखान याने मासीर ए आलमगिरी या ग्रंथात नमूद केलं आहे. छावणीतल्या मुसलमानांसाठी तो ईदचाच सण होता, असंही मुस्तैदखान म्हणतो.(Manusmriti)
शंभू राजे आणि कवी कलश यांना साखळदंडात जखडण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी बादशाह आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. यावेळी शीघ्र कवी असलेल्या कलश यांनी एक छंद म्हटला,
यावन रावन की सभा, संभू बंध्यो बजरंग…
लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग…
ज्यो रवि छवी लखत ही, खद्योत होत बदरंग…
त्यो तूब तेज निहारी के तखत तज्यो अवरंग…
याचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे शंभू राजेंचा तेज पाहून औरंग्यानेही आपलं सिंहासन त्याग दिलं आहे. यावेळी दरबारात इखलासखान आणि हमुदिद्दिन खान मुघल सरदारांनी शंभू राजेंना औरंगजेबास ताजीम म्हणजेच सलामी देण्यात वारंवार सुचवलं, पण शंभू राजेंनी हे करायला सपशेल नकार दिला. यानंतर त्यांना पुन्हा एकदा कैदेत ठेवण्यात आलं. औरंगजेबाने रुहुल्लाखान याला शंभू राजेंकडे पाठवलं होतं. त्याने शंभू राजेंना विचारलं की, ‘मराठ्यांचा खजिना, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे ? आणि तुम्हाला मुघलांच्या सैन्यातलं कोण कोण सामील आहे ? शंभू राजेंनी याची उत्तर तर दिली नाहीच, पण बादशाहची घाणेरड्या शब्दात निंदा नालस्ती केली, असं ईश्वरदास नागर नमूद करतो.
हे औरंगजेबाला कळल्यावर त्याने शंभू राजेंच्या डोळ्यात गरम सळई खुपसण्याचे आदेश दिले. आणि त्याच दिवशी त्यांची जीभ छाटण्यात आली. यावेळी औरंगजेबाने शंभू राजेंकडे धर्मांतराचा प्रस्तावदेखील पाठवला होता, जो त्यांनी धुडकावून लावला. अंगभर जखमा, त्यावर मिठाच्या पाण्याचा जाळ, त्यात डोळे काढले, जीभ छाटली, मात्र तरीही स्वाभिमानाने शंभू राजेंनी धर्मांतराचा प्रस्ताव धुडकावला. जी अवस्था शंभू राजेंची होती, तिच कवी कलशांचीही होती. जवळपास महिनाभर शंभू राजेंवर अनन्वित अत्याचार सुरूच होते. त्यांची कातडीदेखील सोलण्यात आली होती. यानंतर औरंगजेबाने दोघांनाही मृत्युदंड देण्याचा हुकुम केला.(Manusmriti)
यानंतर औरंगजेबाच्या छावणीने बहादूरगड सोडून पुण्याच्या दिशेने कूच केलं. औरंगजेबाच्या मते त्याने जे युद्ध सुरु केलं होतं, ते धर्मयुद्ध म्हणजेच जिहाद होतं. त्यामुळे मुस्लीम धर्मगुरूंच्या आदेशाने आणि मुस्लिमांच्या शरिया कायद्यानुसार काफिर असलेल्या शंभू राजेंना मृत्यूदंड देण्यात यावा, अशी औरंगजेबाची इच्छा होती. इथे ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, शंभू राजेंना मनुस्मृतीनुसार नाही तर शरिया कायद्यानुसारच मारलं गेलं होतं. आणि याचे पुरावे आपल्याला मासीर-ए-आलमगिरी, फुतुहात-ए-आलमगिरी या औरंगजेबाच्या अखबारींनीच लिहिलेल्या समकालीन आणि विश्वासार्ह ग्रंथांमध्ये मिळतो. विशेष म्हणजे मराठ्यांच्याही एकाही साधनात मनुस्मृतीचा उल्लेख कुठेच आढळत नाही.(History)
याचा सढळ पुरावा म्हणजे हा मासीर-ए-आलमगिरीमधला फारशी उल्लेख…
व चूं इफ्नाए आन मुश्रीक-ई-बदकिश-ई जहन्नम नसीब दर बराबर-ई वबाल व नकाले की अज़ क़त्ल व इसर-ई मुस्लमानान व नहब व ग़ारत-ई-बिलाद-ई-इस्लाम बर इबकाए ऊ रुझान दाश्त। व ब-फ़तवाए अज़ बाब-ई शर व मिल्ल्त व सवाबदीद-ई असहाब-ई दीन व दौलत सफ़्क-ई दम-ई आन हर्बीए कती-ओततरीघ लाज़िम आमद बाद-ई वसूल-ई-मौकीब-ई जफरंजोल बिस्त व यकम-ई जमादिलावल सना सी व दो ब-कोरागाँव मुसम्मा ब-फ़तहबाद बिस्त व नहम शहर-ई मजकूर ब-वसातत-ई तेग़-ई-काफिरकोश बा कब कलस की ता हमा जा हमराहश बुद ब-दरक-ई असफ़ल फ़रो रफ़्त
काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त इस्लामी शहरे लुटून व मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून जे पाप या घाणेरड्या धर्माच्या आणि नरकात जाणेच ज्याच्या नशिबात आहे अशा या काफिराने म्हणजे शंभू राजेंनी केले होते ते बघता, त्याला जिवंत ठेवण्याच्या कारणांवर विचार विमर्श झाला. शरीयावर आधारित फतव्याप्रमाणे, राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या युद्धखोर चोराला नरकात धाडणेच योग्य होईल असे ठरवले. त्यामुळे २१ जमाद-उल-अव्वल जुलूस ३२ ला बादशाहा कोरेगावला ज्याला फतहबाद सुद्धा म्हटलं गेलं आहे, इथे आल्यावर, त्याला कवी कलश याच्या समवेत, काफिरांना ठार मारणाऱ्या तलवारीच्या साह्याने सर्वात खोल अशा नरकात धाडलं. याच्या खाली फारशीत एक ओळ आहे, ती म्हणजे ‘काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त’ म्हणजेच काफिराचा मुलगा नरकात गेला…
मुस्लीम धर्मगुरूंनी राजबंद्यांच्या मृत्यूदंडाचा फतवा औरंगजेबाकडे दिला आणि मृत्यूचा अमल सुरु झाला. अखेर औरंगजेबाच्या आदेशाने ११ मार्च १६८९ रोजी म्हणजेच फाल्गुन वाद्य अमावास्येच्या दिवशी शंभू राजे आणि कवी कलश यांची वढू गावच्या रानात तलवारीने हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. ईश्वरदास नगर यांच्यानुसार शंभू राजांचे डोके हे औरंगाबाद म्हणजेच आजच्या संभाजीनगरपासून ते बुर्हाणपूरपर्यंत ढोल बडवत मिरवण्यात आलं होतं. यानंतर ते दिल्लीला नेऊन शहराच्या द्वारावर लटकावण्यात आलं.(Manusmriti)
==================
हे देखील वाचा : Indrajeet Sawant : मार्टिनची डायरी आणि कोरटकर-सावंत वाद का घडला ?
==================
आता पुन्हा एकदा रोहित पवार यांच्या वक्तव्यावर येउया. त्यांच्या मते मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे. आता मनुस्मृती किंवा त्याद्वारे हत्या करण्याची माहिती औरंगजेबापर्यंत आली. याचा एकही समकालीन पुरावा आपल्याला सापडत आहीत. औरंगजेबाला फितूर बरीच लोकं झाली होती, हा इतिहास आहे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार शंभू राजेंना मृत्यूदंड देण्यात आला, याचा एकही उल्लेख नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केलं, याचाही पुरावा आपल्याला मिळत नाही. याच कारणाने ते सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोलदेखील होत आहेत आणि त्यांच्या टीकेचा भडीमार सुरु आहे.
औरंगजेबाने शंभू राजेंची क्रूर हत्या केली. यावेळी त्याला वाटलं असेल आता आपण दक्खन काबीज करू आणि मराठ्यांना चिरडून टाकू. पण त्याला हे माहित नव्हतं की प्रत्येक मराठा सरदार हा शंभू राजेंसारखा स्वाभिमानी होता. शंभू राजेंच्या नंतर राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज आणि ज्ञात-अज्ञात मराठा वीरांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीशी मुकाबला केला आणि मराठा शक्तीला दिल्लीपर्यंत नेलं.