पुणे तिथे काय उणे… ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. पण सध्या या म्हणीचा अर्थ बदलत चालला आहे आणि तो ‘पुणे तिथे सर्वाधिक गुन्हे’ असा होत चालला आहे. नुकतच एका घटनेने पुणे शहर हादरलं, ते म्हणजे एका महिलेवर बसमध्ये झालेला अत्याचार…ठिकाण होतं स्वारगेट… लोकांची अफाट गर्दी असलेल्या स्वारगेटमध्ये असा प्रकार घडला, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र चिंतेत आहे. पण ही घटना कधी आणि कशी घडली? याचे कसे पडसाद उमटले आणि पुढे काय होणार ? जाणून घेऊ. (Swargate)
ज्या २६ वर्षीय पिडीतेवर अत्याचार झाला, ती पुण्यातच नोकरी करते. २६ फेब्रुवारीला फलटणला गावी जाण्यासाठी ती पहाटेच स्वारगेट बस stand वर आली होती. त्यावेळी आरोपी दत्ता गाडे तिच्याजवळ आला. तिच्यासोबत बोलू लागला. असच बोलत त्याने तिला विश्वासात घेतलं. यावेळी ती फलटणला जात असल्याचं तिने त्याला सांगितलं. यानंतर दत्ता गाडे तिला म्हणाला की, फलटणची बस इथे लागत नाही, तर दुसऱ्या ठिकाणी लागते. बस दाखवण्याचा बहाणा करत त्याने तिला एका बंद असलेल्या शिवशाही बसजवळ नेलं. (News Update)
तीसुद्धा बसमध्ये अंधार आहे, हे बघून संभ्रमात पडली. तिने त्याला विचारलं की बसमध्ये इतका अंधार का आहे ? यावर तो म्हणाला की बस उशिरा आली आहे त्यामुळे सर्व प्रवासी झोपले आहेत. हवं तर तू स्वतः बघ… यानंतर ती बसमध्ये चढली. पण बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. त्यात बस पूर्णपणे बंदच होती. एवढ्यात तो भरभर बसमध्ये चढला. त्याने दरवाजा बंद केला. तिच्यावर अत्याचार केला आणि तिथून पसार झाला. यानंतर पिडीतेने झालेला संपूर्ण प्रकार आपल्या मित्राला फोन करून सांगितला. त्याने पोलिसांमध्ये तक्रार कर असं सुचवलं. आणि यानंतर सगळ उघडकीस आलं. (Swargate)
यानंतर स्वारगेट बस स्थानकामध्ये राजकीय पक्षांनी तोडफोडही केली. आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर पोलिसांनीही आरोपीची ओळख पटवून घेतली. त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याच्यावर १ लाखांचं बक्षीससुद्धा जाहीर केलं होत. त्यानंतर घटनेच्या दोन दिवसांनी दत्ता गाडेला शिरूरमधून अटक करण्यात आली आहे. यावेळी अजून एक गोष्ट समोर आली आहे की, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण होते. पण आता पुढे त्याच्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, हे कोर्टच ठरवेल. (Swargate)
===========
हे देखील वाचा : Instagram Feed : इंस्टाग्रामवर अश्लील आणि हिंसक कंटेंटच का दिसतोय?
===========
त्याच्याबाबत अजून एक गोष्ट बाहेर पडली आहे, ते म्हणजे त्याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल केलेले होते.२०१९ मध्ये एका गुन्ह्यात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती आणि आता या प्रकरणी त्याला अटक झाली आहे. या एकंदरीत घटनेवरून पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वारगेट पुण्यातलं सर्वात गजबजलेलं बस स्टेशन आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून स्वारगेट बस स्टेशनवर मोठ्या संख्येने महिला प्रवासी येतात. परंतु स्वारगेट बस स्टेशनमध्ये महिलांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. रात्रीही या ठिकाणी प्रचंड अंधार असतो. त्यात अनेक दारुडे किंवा माथेफिरू लोकं याठिकाणी बसलेली असतात. त्यामुळे इथल्या मुलभूत सुविधा बदलल्या पाहिजेत, अन्यथा अशा घटना सतत घडतच राहतील.