२१ फेब्रुवारीला कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील कंडक्टरला मराठी न बोलल्याबद्दल काही लोकांनी मारहाण केली. ही घटना बेळगावमध्ये घडली. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकावर कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग येथे हल्ला झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर काळं फासलं गेलं. याचे पडसाद महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात उमटले. हा वाद इतका वाढला की, दोन्ही राज्यांंनी बस सेवा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. हा वाद फक्त भाषेचा आहे का ? कर्नाटक महाराष्ट्र हा वाद नक्की काय आहे ? आणि आता घडलेल्या घटनांनी तो पुन्हा का उफाळून आला आहे हे जाणून घेऊ. (Marathi Kannada Matter)
तर या बसच्या वादाला सुरुवात झाली २१ फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये बेळगावहून सुलेभावीला जाण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी आणि मुलगा चढले. तेव्हा बसमध्ये कंडक्टर होते महादेव हुक्केरी. मुलीने कंडक्टर महादेवकडून दोन तिकिट्स मागितल्या, कर्नाटक सरकारच्या नियमांप्रमाणे महादेव यांनी मुलीला मोफत तिकीट दिलं. पण, जेव्हा महादेवने मुलीला तिच्यासोबत असणाऱ्या मुलाचं तिकीट काढण्यासाठी सांगितलं. तेव्हा तो सुद्धा मोफत प्रवास करू इच्छितो असं तो म्हणाला.
महादेवने स्पष्ट केले की मोफत तिकीट फक्त महिला प्रवाशांसाठी आहे आणि कोणत्याही मुलाला मोफत तिकीट दिल्यास त्याला निलंबित केलं जाऊ शकतं. यावर मुलीने महादेवला मराठीत बोलण्यास सांगितलं. महादेवने आपल्याला फक्त कन्नड येते तुम्ही कन्नडमध्ये बोला असं सांगितल्यावर बसमध्ये वाद वाढला. तेव्हा बसमध्ये बसलेल्या ६ ते ७ जणांनी कंडक्टरवर हल्ला केला. पुढे सन्ना बालेकुंदरी जवळ बस थांबताच मुलीशी संबंधित सुमारे २० लोक लोकांनी कंडक्टरवर हल्ला केला. (Marathi Kannada Matter)
यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली. कंडक्टरवर हल्ला केल्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं, तर त्या अल्पवयीन मुलीने डक्टरवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. पोलिसांनी कंडक्टरविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. नंतर या प्रकरणाचे पडसाद दोन्ही राज्यात पाहायला मिळाले.
कर्नाटकच्या चित्रदुर्गभागात कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असं म्हणत त्याच्या तोंडाला काळं फासलं आणि बसच्या खिडक्या फोडल्या. या प्रकरणावरुन महाराष्ट्रात उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात कर्नाटक सरकारला इशारा देत कर्नाटकच्या बस वर भगवा ध्वज फडकवला. पुण्यात सुद्धा काही लोकांनी कर्नाटकला जाणाऱ्या बसला काळ फासलं. नंतर दोन्ही राज्यांनीमधील बस सेवा बंद करण्यात आली. आता महत्त्वाचा मुद्दा हा की, हा वाद ज्यामुळे उफाळून आला होता. त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी ksrtc कंडक्टरवर नोंदवलेली तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्माण झालेल्या वादाला शांत करण्यासाठी तिचे पालक तक्रार मागे घेणार आहेत. ते स्वत: कन्नड समर्थक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हा वाद किरकोळ होता का? तर तिकीटावरुन सुरू झालेला हा वाद किरकोळ होता. पण कन्नड आणि मराठी हा वाद संवेदनशील आहे. आणि त्याला इतिहास सुद्धा आहे.
१९४७ ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषेच्या आधारे राज्य विभागले आणि निर्माण करण्याच्या मागणी केली जाऊ लागली. यानंतर, १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला. याअंतर्गत १४ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राला बॉम्बे आणि कर्नाटकाला म्हैसूर म्हणून ओळखलं जायचं. यावेळी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार, बेळगाव, कारवार, बिदर आणि भालकीसह अनेक मराठी भाषिक भाग कर्नाटकात विलीन करण्यात आलं. पण वाद सुरूच राहीला. (Marathi Kannada Matter)
पुढे १९६६ साली या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने सरन्यायाधीश मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापन केली. या आयोगाने २६४ गावं महाराष्ट्राला आणि २४७ गावं ज्यात बेळगाव सुद्धा होतं ते कर्नाटकला देण्याची शिफारस केली. महाराष्ट्राने हा अहवाल नाकारला. कर्नाटकने त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. महाजन आयोगाचा अहवाल देखील हा वाद सोडवू शकला नाही. १९८६ मध्ये कर्नाटक सरकारने बेळगावला दक्षिण कर्नाटकशी जोडण्याचा प्रयत्न केला. ज्याला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात विरोध झाला. यावेळी मराठी आणि कन्नड समर्थकांमध्ये हिंसाचार सुद्धा झाला.
नंतर २००४ मध्ये महाराष्ट्राने ८६५ गावं आणि बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कर्नाटक सरकारने याचा विरोध केला. त्यांचं म्हणण हे होतं की हा एक राजकीय मुद्दा आहे आणि तो कोर्टात सोडवता येणार नाही.
===============
हे देखील वाचा : Indrajeet Sawant : मार्टिनची डायरी आणि कोरटकर-सावंत वाद का घडला ?
===============
2006 मध्ये कर्नाटका सरकारने बेळगावला आपली दुसरी राजधानी घोषित केली आणि तिथे विधानसभेचे सत्र आयोजित केलं. महाराष्ट्र समर्थकांनी याला “कर्नाटक ची जबरदस्ती” असं संबोधलं. महाराष्ट्राचा दावा कमकुवत करण्याची ही एक चाल होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बेळगाववर महाराष्ट्राचाच हक्क आहे. असं वक्तव्य केलं होतं. ज्याच्या कर्नाटकने तीव्र विरोध केला होता. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या नंतर त्यांनी मावर्ती भागात राहणाऱ्या या वादाशी संबंधित आंदोलकांना स्वातंत्र्यसैनिक पेन्शन आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली. त्याच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील कन्नड शाळांसाठी अनुदान जाहीर केलं होतं. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा केला होता. (Marathi Kannada Matter)
थोडक्यात दोन्ही राज्यांचे राजकीय पक्ष आपापल्या राज्यांच्या बाजूने एकजूट आहेत. एवढा इतिहास वादाला आहे. त्यामुळे तिकीटावरुन सुरू झालेला वाद मराठी कन्नडवर पोहचला आणि आता दोन्ही राज्यातील सरकारी बस प्रवास बंद आहे. पोलिसांच्या देखरेखी खाली हा प्रवास पुन्हा सुरू करण्याचं बोललं जात आहे. प्रवास जरी सुरू झाला तरी वाद कायमच राहीलं त्यावर तोडगा निघेल की नाही हे वेळच ठरवेल.