Home » Kim Jong Un : किमच्या देशानं उघडले पर्यटकांसाठी दार

Kim Jong Un : किमच्या देशानं उघडले पर्यटकांसाठी दार

by Team Gajawaja
0 comment
Kim Jong Un
Share

उत्तर कोरिया (North Korea) या देशाचे नाव ऐकले की समोर येते ती हुकूमशहा किम जोंग उन याची छबी.  या हुकूमशहाच्या जुलमापुढे उत्तर कोरियातील नागरिकांचे जीवन हे अक्षरशः नकोसे झाल्याचे वाचायला मिळते.  या उत्तर कोरियामधील सर्वच जीवनशैली ही जगाच्या विरुद्ध आहे.  फारकाय तर  येथील कॅलेंडरही वेगळे आहे.  या देशात हुकूमशहा किम जोंग याच्या विरोधात नुसता ब्र जरी काढला तरी आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात येते.  कुणाकडे अन्य धर्माचे पुस्तक वा साहित्य मिळाले तरीही अटक होते. या देशात कुठल्या रंगाचे कपडे घालावेत आणि केस कसे कापावेत यावरही बंधने आहेत. 

अशा देशात पर्यटनासाठी कोणाला जायला आवडेल का…पण सांगितले तर आश्चर्य वाटेल की, उत्तर कोरियामध्ये पर्यटनासाठी जाणा-यांची संख्या सर्वात जास्त होती. किमचा हा देश आहे तरी कसा, हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक या देशात जात असत.  मात्र कोविड-19 च्या महामारीनंतर उत्तर कोरियानं पर्यटकांसाठी आपले दरवाजे बंद केले.  उत्तर कोरियामध्ये रोजगाराच्या संधी कमी आहेत.  मर्यादित उद्योग धंदे आहेत. अशावेळी येथील अर्थव्यवस्थेला या परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून येणा-या मदतीनं सहारा दिला होता.  मात्र परदेशी पर्य़टकांवर बंदी घातल्यामुळे उत्तर कोरियाच्या तिजोरीत आलेला ताण आता किमच्या लक्षात आल्यावर त्यांनी ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.  यातून उत्तर कोरियामधील कमकुवत अर्थव्यवस्था मजबूत कऱण्याचा किमचा इरादा आहे.  (Kim Jong Un) 

उत्तर कोरियाने तब्बल पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत.  गेल्याच आठवड्यात 13 परदेशी पर्यटकांच्या गटाने उत्तर कोरियाला भेट दिली.  उत्तर कोरियामधील रासन हे शहर पर्यटकांचे आवडते शहर आहे, याच शहरात मोठ्या संख्येनं परदेशी पर्यटक येतात.  आत्ताही किमनं परदेशी पर्यटकांसाठी उत्तर कोरियाचे दार उघडल्यावर या रासन शहरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.  उत्तर कोरियामध्ये  जाणाऱ्या पर्यटकांमध्ये रशिया आणि चीनमधील पर्यटकांची संख्या जास्त असते.  बीजिंगमधील यात्रा कंपन्या अशा सहलींचे आयोजन करतात.  याच कंपनीकडे आता लंडन, कॅनडा, ग्रीस, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया आणि इटली येथील पर्यटकांनीही उत्तर कोरियामध्ये जाण्यासाठी नावनोंदणी केली आहे.  (International News)

उत्तर कोरियामधील सर्वच शहरांमध्ये किम जोंग उन याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे पुतळे आहेत.  त्यांच्याच नावानं येथे शाळा, महाविद्यालये, बागा आणि कारखानेही आहेत.  रासन या शहरातही सर्वच शाळा, कारखाने किम जोंग आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावानं आहेत.  पर्यटकांना या सर्वच स्थळी भेट देण्याआधी तेथील कडक नियमांची माहितीही देण्यात येते.  (Kim Jong Un) 

जानेवारी 2020 पासून उत्तर कोरियामध्ये परदेशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती.  कोरोना महामारीमध्ये हे नियम अधिक कडक करण्यात आले होते. उत्तर कोरियामध्ये असलेल्या परदेशी राजनैतिक अधिका-यांनाही आपापल्या देशात परत जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.  शिवाय सीमेवरील वाहतूकही बंद करण्यात आली.  मात्र या सर्वात परकीय चलनाअभावी उत्तर कोरियाच्या तिजोरीवर मोठा ताण आला.  परदेशी पर्यटकांकडून मिळणारा मोठा निधी बंद झाल्यानं हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un)  यांनी पुन्हा पर्यटन चालू करण्याच्या सूचना दिल्या.  तरीही यात रशियामधील पर्यटकांना त्यांनी अधिक पसंती दिली. 

=============

हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?

=============

रशिया आणि उत्तर कोरियामधील मैत्रीचे संबंध पहाता, रशियामधील तब्बल 100 पर्यटकांना पहिल्यांदाच उत्तर कोरियात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली.  त्यापाठोपाठ चीनमधील पर्यटकांचा एक गटही उत्तर कोरियामध्ये गेला.  अर्थात या सर्व पर्यटकांना उत्तर कोरियामधील कडक नियमांची आधी माहिती करुन दिली जाते.  या सर्वांसोबत उत्तर कोरियामधील मार्गदर्शक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.  शिवाय उत्तर कोरियामध्ये अनेक संवेदनशील ठिकाणी फोटो काढण्यास बंदी आहे, या नियमांचीही माहिती पर्यटकांना आधी करुन देण्यात येते.  हे सर्व नियम पाळत आत्तापर्यंत 800 परदेशी उत्तर कोरियाला भेट दिली आहे.  उत्तर कोरियाच्या पर्यटन विभागानुसार हा आकडाही मोठा आहे.  पर्यटकांची संख्या वाढल्यावर आता उत्तर कोरियामधील समुद्र किना-यावर मोठे पर्यटन रिसॉर्ट तयार करण्यात येणार आहे.  शिवाय पर्यटकांसाठी काही नियम शिथिल करता येतील का याचीही चाचपणी सुरु आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.