Home » Kshama Sawant : अमेरिकेत धिंगाणा घालणा-या सावंतबाई आहेत कोण ?

Kshama Sawant : अमेरिकेत धिंगाणा घालणा-या सावंतबाई आहेत कोण ?

by Team Gajawaja
0 comment
Kshama Sawant
Share

अमेरिकेच्या सिएटलमधील भारतीय वाणिज्य दूतावासात सध्या एका क्षमा सावंत नावाच्या बाईनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या क्षमा सावंत यांची ओळख इंडो-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ म्हणून आहे. आपल्या मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली आहे. गेली अनेक वर्ष अमेरिकेत रहाणा-या या क्षमा सावंत बाईंना त्यांच्या आईला भेटण्यासाठी भारतात यायचे आहे. मात्र भारत सरकारनं त्यांचा व्हिसा एकदा नाही, तर तब्बल तीनवेळा नाकारला आहे. त्यामुळे चिडलेल्या या सावंत बाईंना चक्क भारतीय वाणिज्य दूतावासातच मोठा गोंधळ घातला. दुतावासातील अधिका-यांना धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या सगळ्या घटनेचा व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला. तेव्हा या क्षमा सावंत नेमक्या कोण आहेत, याची चर्चा सुरु झाली. सोबतच भारत सरकार त्यांना आपल्या मायभूमीवर का येऊ देत नाही, याबाबतही उत्सुकता आहे. क्षमा सावंत यांचे नाव पहिल्यांदा अमेरिकेत चर्चेत आले ते नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे CAA आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजे NRC संदर्भात भारतानं घोषणा केल्यावर. मोदी सरकारनं भारतात CAA आणि NRC लागू करण्याची घोषणा झाल्यावर ज्यांनी विरोध करायला सुरुवात केली, त्यात क्षमा सावंत हे नाव पुढे होतं. अर्थातच सावंत यांनी अमेरिकेत बसून भारतावर आणि मोदी सरकारवर आगपाखड करायला सुरुवात केली. (Kshama Sawant)

मोदी सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचे त्यांनी अमेरिकेतून सांगून भारत सरकारबाबत अनेकवेळा अपप्रचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यावर असतानाही या सावंत यांनी त्यांच्या दौ-याचा विरोध केला आहे. त्यांच्या या सर्व कारनाम्यामुळे भारत सरकारनं त्यांचं नाव देशविरोधी अजेंडा चालवणा-या व्यक्तिंच्या यादीत समाविष्ट केलं आहे. यामुळेच त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला. पण व्हिसा नाकारल्यावर क्षमा सावंत यांनी सिएटलमधील भारतीय वाणिज्य दूतावासात जो धिंगाणा घातला त्यानं भारतीय अधिकारी हैराण झाले. याबाबत सिएटलमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, सावंत यांनी कार्यालयीन वेळेनंतर परवानगीशिवाय दूतावासात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना प्रवेश नाकारणा-या कर्मचा-यांनाही त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. परदेशात भारतविरोधी प्रचार करणाऱ्या क्षमा सावंत यांचा व्हिसा नाकरण्यात आला तरी, भारतीय वाणिज्य दूतावासाने त्यांचे पती कॅल्विन प्रिस्ट यांना भारतात येण्यासाठी आपत्कालीन व्हिसा दिला आहे. (International News)

क्षमा सावंत स्वतःला भारतीय-अमेरिकन कार्यकर्त्या म्हणून उल्लेख करतात. त्या सिएटल सिटी कौन्सिलची माजी सदस्य आहेत. मात्र भारत सरकारविरोधात त्यांनी सातत्यानं प्रचार मोहीमा राबवल्या आहेत. माहितीनुसार क्षमा सावंत यांनी पहिल्यांदा मे 2024 मध्ये व्हिसासाठी अर्ज केला होता. हा अर्ज नाकरण्यात आल्यानंतर त्यांनी जून 2024 मध्ये त्यांनी पुन्हा अर्ज केला. हा अर्जही नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी जानेवारी 2025 मध्ये आपत्कालीन व्हिसासाठी अर्ज केला. सावंत यांची 82 वर्षीय आई बेंगळुरूला असून आईला क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, मधुमेह आणि हृदयरोग आहे. त्यामुळे आईला भेटण्यासाठी त्यांना भारतात यायचे आहे. क्षमा सावंत यांनी व्हिसा अर्जासोबत आईच्या आजाराबाबत वैद्यकीय कागदपत्रे दिली होती. त्यानंतरही भारतीय दूतावासानं त्यांच्या व्हिसाला परवानगी न दिल्यामुळे त्यांनी दूतावासातच ठाण मांडून आंदोलन सुरु केले. आता त्यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. असे असले तरी, भारतीय वाणिज्य दूतावास आपल्या भूमीकेवर ठाम आहे. सावंत यांचे वर्णन समाजवादी नेत्या असा होतो. (Kshama Sawant)

पंतप्रधान मोदी यांच्या त्या कट्टर विरोधक समजल्या जातात. 2020 मध्ये, त्यांनी सीएएला विरोध करणारा सिएटल सिटी कौन्सिलचा ठराव प्रायोजित केला. यावर भारत सरकारनं नाराजी व्यक्त केली होती. या क्षमा सावंत यांचा पुणे आणि मुंबईचाही संबंध आहे. पुण्यात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यांच्या आई निवृत्त प्राचार्या असून वडिल सिव्हिल इंजिनिअर होते. सावंत यांनी 1994 मध्ये मुंबई विद्यापीठातून संगणकशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले त्यांचे पती विवेक सावंत यांच्यासोबत अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. (International News)

=============

हे देखील वाचा : वयाच्या चाळीशीत आरोग्याची अशी घ्या काळजी, हृदयासह संपूर्ण हेल्थ राहिल फिट

America : चिंता वाढली गायींमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव !

=============

सिएटल सेंट्रल कॉलेज आणि ली विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. सिएटलमध्ये शहरव्यापी निवडणूक जिंकणाऱ्या त्या पहिल्या समाजवादी नेत्या आहेत. सध्या सावंत या रेव्होल्यूशनरी वर्कर्सच्या सदस्य आहेत. त्यांचा घटस्फोट झाला असून सिएटल सोशलिस्ट अल्टरनेटिव्हचे संघटक कॅल्विन प्रिस्ट यांच्याबरोबर त्यांचे दुसरे लग्न झाल्याची माहिती आहे. 2010 मध्ये अमेरिकेच्या नागरिक झालेल्या क्षमा सावंत या अनेक आंदोलनामुळे वादात अडकल्या आहेत. आता भारत सरकारनं त्यांना व्हिसा नाकारल्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. (Kshama Sawant)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.