पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तवावर बोलतांना देशातील उद्योगाची माहिती दिली. त्यात पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाचे उदाहरण प्रामुख्यानं दिले. या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांनी बोलतांना भारतातील खेळणी उद्योग हा नव्यानं भरारी घेत असल्याचे सांगितले. खेळण्याच्या उद्योगात तरुणांचा अधिक भरणा असून भारतीय खेळण्यांना आता परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यात खेळण्यांची निर्यांत मोठ्या प्रमाणात होत असून चीनमधील खेळण्यांना रोखण्यात भारताला यश आल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी भारतातील खेळणी उद्योगाचे वास्तव जनतेसमोर मांडले. (India)
एकेकाळी भारतातील खेळणी ही परदेशात निर्यात केली जायची. मात्र मध्यंतरीच्या काळात या खेळणी उद्योगाला ग्रहण लागले. लाकूड, कागद आणि कापडापासून तयार होणारी खेळणी मागे पडली आणि चीनमधून येणा-या प्लॅस्टिकच्या खेळण्यांनी अवघी बाजारपेठ काबीज केली. मात्र चीनमधून येणा-या या खेळण्यापासून होणारे धोके समोर येऊ लागले. भारतातील उत्तरप्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खेळणी उदयोग बहरत असून मेड इन इंडिया उपक्रमामुळे अन्यही अनेक उद्योजक या खेळण्यांच्या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. (Latest News)
भारतात काही वर्षापूर्वी कुठलेही खेळणं हातात घेतलं तर त्यावर मेड इन चायना हा टॅग असायचा. मात्र ही लाट आता कमी झाल्याचं चित्र आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतानं चीनकडून 41.6 दशलक्ष डॉलर्सची खेळणी आयात केली. हा आकडा जर मोठा वाटत असेल तर हे जाणून घेतले पाहिजे की, 2021-23 या काळात भारतानं चीनकडून 214 दशलक्ष डॉलर्सची खेळणी आयात केली होती. त्यावरुन गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत भारतातील खेळणी उद्योगानं चांगलेच पाय रोवल्याचं स्पष्ट होत आहे. चीनमधून खेळण्यांची होणारी आयात कमी झाली आहे, त्यामागे भारतातील खेळणी उद्योगाची वाढ झाली हे कारण आहेच, शिवाय चीनमधील येणा-या खेळण्यांची गुणवत्ताही तपासायला सुरुवात झाली आहे. (India)
मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ही खेळणी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमधून येणारी बहुतांश खेळणी ही प्लॅस्टिकपासून तयार केलेली असतात. लहान मुलांनी ही खेळणी वारंवार तोंडात टाकली तर त्यापासून त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच स्वस्त असली तरी ही प्लॅस्टिकची खेळणी घेण्यास आता पालक टाळत आहेत. त्यापेक्षा भारतीय बनावटीची लाकडाची खेळणी ही अधिक चांगली वाटत आहेत. परदेशातही यामुळेच भारतीय खेळण्यांना मागणी वाढली आहे. भारतातून खेळणी मोठ्या प्रमाणात परदेशातही निर्यात होत आहेत. यात गुजरात आणि उत्तरप्रदेशमधील अनेक उद्योजकांचा समावेश आहे. भारतात मेड इन इंडिया या धोरणाअंतर्गत अनेक तरुण उद्योजक या खेळणी व्यवसायात उतरले आहेत. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बीआयएस खेळणी उत्पादकांसाठी विशेष तरतुदी करत आहे. (Latest News)
भारतात प्रामुख्यानं लाकडापासून खेळणी तयार केली जात आहेत. त्याची गुणवत्ताही चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खेळणी निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होत असल्यानं या खेळण्यांची गुणवत्ता चांगली आहेच, पण त्यांच्या किंमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. खेळणी व्यवसायात उत्तरप्रदेशमधील ग्रेटर नोएडला भारताची टॉय सिटी म्हणून ओळख मिळाली आहे. नोएडाच्या सेक्टर 33 मध्ये टॉय सिटी उभारण्यात येत आहे. खेळणी उद्योगासाठी या शहरात 100 एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. त्यात अनेक खेळणी उद्योग आहेत. सोबत भारतातील खेळणी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात व्होकल फॉर लोकल टॉयज कॅम्पेन, टॉयकॅथॉन, आत्मनिर्भर टॉयज इनोव्हेशन चॅलेंज यांचा समावेश आहे. (India)
==============
हे देखील वाचा : Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !
Narendra Modi : चर्चा फक्त JFK’s Forgotten Crisis पुस्तकाचीच
===============
भारतातील चन्नपटना खेळणी, किन्हल खेळणी, निर्मल खेळणी, राजस्थानातील बाहुल्या, इंदूरमधील चामड्याची खेळणी, आंध्र प्रदेशातील चामड्याच्या बाहुल्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सावंतवाडीमधील लाकडी खेळण्यांची विशेष ओळख आहे. या सर्व खेळण्यांना परदेशात मोठी मागणी आहे. अनेक तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेतून उपक्रम राबवले आहेत. शिवाय भारतीय संस्कृती, इतिहास, पौराणिक कथा आणि नीतिमत्तेवर आधारित नवीन खेळणी तयार करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने टॉयकॅथॉन-2021 सुरू केले आहे. या उपक्रमातून भारतात अधिक बुद्धिमान खेळणी विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवाय या व्यवसायात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. या सर्वांमुळे भारतात खेळणी उद्योग बहरत असून खेळण्यांच्या निर्यातीमध्येही मोठी वाढ झाली आहे. भविष्यात खेळणी निर्मितीमध्ये आणि त्याच्या निर्यांतीमध्ये भारत जगात नंबर एकवर असेल हे स्पष्ट आहे. (Latest News)
सई बने