तुला शेवटचं विचारतोय, मृत्यु की इस्लाम? समोरून उत्तर आलं – मृत्यू.. साखळदंड त्याच्या हाताभोवती आणि गळ्याभोवती गुंडाळलेले होते. तो गुडघ्यांवर बसला होता. एवढं असून सुद्धा तो झुकला नव्हता. मुघलांनी त्याच्या अनेक सहकाऱ्यांना, सैनिकांना त्याच्या डोळ्यासमोर मारलं होतं. इतकं असूनसुद्धा तो इस्लाम न स्वीकारता ताठ मानेने मृत्यूला सामोरं जायला तयार होता. त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्यासाठी त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलाचं हृदय त्याच्या शरीरापासून वेगळ करण्यात आलं. तेच त्याच्या तोंडात कोंबण्यात आलं. तरी त्याचं मृत्यु की इस्लाम? या प्रश्नाचं उत्तर – मृत्यू हेच होतं.. हा योद्धा कोण होता? तर त्याचं नाव होतं बंदा बाहदूर सिंग. बंदा सिंग बहादूर यांची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Banda Singh Bahadur)
१६७० सालात जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका राजपूत कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं लक्ष्मण देव. ज्याला लहानपणापासूनच भाला, धनुष्यबाण अशी हत्यारं हाता खालची झाली होती. तो उत्तम खोडेस्वार सुद्धा होता. तो शिकारीमध्ये सुद्धा माहिर होता. असंच एक दिवस शिकार करताना एक घटना घडली ज्यामुळे लक्ष्मण देवचं पूर्ण आयुष्य बदललं. शिकार करताना त्या दिवशी त्याला एक हरीण दिसलं. त्याने त्या हरणावर निशाणा साधला आणि हरीण खाली कोसळलं. लक्ष्मण देव जेव्हा हरणाजवळ गेला तेव्हा त्याला कळालं की, ती हरणी होती आणि ती गर्भवती होती. तिच्या दोन्ही पोटातल्या हरणांचा सुद्धा त्याने शिकार केल्यामुळे तडफडून मृत्यू झाला. या गोष्टीचा लक्ष्मण देववर इतका खोलवर परिणाम झाला की, त्यानंतर त्याचं कोणत्याच गोष्टीत मन लागत नव्हतं. जगण्यावरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्याने घर कुटुंबाचा त्याग करून संन्यास घेतला आणि ते दर दर भटकू लागले. स्वत:चं नाव बदलून त्यांनी माधो दास असं ठेवलं.
असंच फिरता फिरता ते नाशिकच्या पंचवटीला पोहचले आणि तिथे बाबा औघडनाथांचे शिष्य बनले. पुढे २१ व्या वर्षी नांदेडमध्ये त्यांची भेट शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्याशी झाली. त्या दिवशी त्यांनी शीख धर्म स्वीकारला. माधो दास गुरु गोविंद सिंग यांचे शिष्य बनले. गुरु गोविंद सिंग यांनी त्यांना नवीन नाव दिलं गुरबक्श सिंग. तेव्हा गुरु गोविंद सिंग मुघलांच्या निशाण्यावर होते. गुरु तेग बहादुर यांच्या हत्येपासून शीख आणि मुघलांमध्ये संघर्ष सुरू होता. याच कारणामुळे गुरु गोविंद सिंगांना आनंदपूर साहिब सोडून दक्षिणेकडे यावं लागलं होतं. गुरु गोविंद सिंग यांनी गुरबख्श यांना पंजाबकडे पाठवलं. त्यांना सांगितलं की, पंजाबमध्ये मुघलांच्या विरोधात शिखांचं नेतृत्व तू करावं. त्यानंतर गुरु गोविंद सिंग यांनी गुरबख्श यांना स्वत:ची एक तलवार भेट दिली, पाच बाण दिले आणि ३ साथीदार त्यांच्या सोबतीला दिले.(Banda Singh Bahadur)
गुरुंची आज्ञा पाळत पंजाबच्या लोकांना मुघलांपासून मुक्त गुरबख्श यांनी निश्चय केला. गुरुंनी गुरुबक्शला आदेश दिला होता की, त्याने जाऊन पंजाब मधील सरहिंद नगर ताब्यात घ्यावं आणि तिथे असलेल्या वजीर खांला मृत्यूदंड द्यावा. त्यानंतर गुरु गोविंद सिंग स्वत: तिथे येणार होते.
पण गुरुबक्श हे पंजाबला पोहचण्याआधीच गुरु गोविंद सिंग यांची हत्या झाली. तरी गुरु गोविंद सिंग हे परंपरेनुसार कोणालाही पुढील गुरु म्हणून घोषित करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्यानंतर गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथाला शिखांच्या कायमचा गुरूचा दर्जा दिला. यानंतर शीख साम्राज्याचं नेतृत्व गुरबक्श यांनीच केलं. १७०९मध्ये गुरुबक्श पंजाबच्या सतलज नदीच्या पूर्वेला पोहचले. १७०८ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची सत्ता बहादुर शाहकडे आली. तेव्हा दख्खनमध्ये बहादुर शाहचा भाऊ काम बक्श हा त्याच्या विरोधात बंड करत होता. म्हणून त्याला तिथे जावं लागलं होतं. याचाच फायदा घेत गुरबक्श यांनी घेतला. त्यांनी सतलज नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना आपल्यात सामील केलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सरहिंदमध्ये जमीनदारांची सत्ता वाढली होती आणि ते लोकांकडून भरघोस कर घेत होते. सरहिंदमधील शेतकरी एका सक्षम नेतृत्वाच्या शोधत होतेच. अशात त्यांना गुरूबक्श भेटले. त्यामुळे ते शेतकरी गुरूबक्श यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या सैन्यात सामील होऊ लागले. मुघलांचे असे सैनिक सुद्धा गुरूबक्श यांच्या सैन्यात आले, ज्यांना मुघल सैन्यात चांगलं वेतन मिळतं नव्हतं. तीन ते चार महिन्यांत गुरूबक्श यांच्या सैन्यात पाच हजार घोडे आणि आठ हजार सैनिक सामील झाले होते.(Banda Singh Bahadur)
सर्वात आधी गुरबक्श यांनी सोनीपत आणि कैथल येथील मुघलांचा खजिना लुटला. त्यानंतर त्यांनी सरहिंद ताब्यात घेण्यासाठी सामना या एका छोट्या कसब्यावर हल्ला केला. या कसब्याचा प्रमुख होता, वजीर खां. ज्याला मृत्यूदंड देण्याचा आदेश स्वत: गुरु गोविंद सिंग यांनी दिला होता. कारण त्यांच्या मुलाला वजीर खां याने मारलं होतं आणि शिखांचे नववे गुरु तेग बहादुर सिंग यांची सुद्धा हत्या केली होती. या हल्ल्याचं उद्दिष्ट वजीर खांला संपवणं हेच होतं.
या लढाईसाठी वजीर खांला दिल्लीहून कोणतीही मदत मिळाली नव्हती. २२ मे १७१० रोजी झालेल्या या लढाईत गुरूबक्श यांनी विजय मिळवला. या हल्ल्यामुळे आणि गुरूबक्श यांनी शिखांचे नववे गुरु तेग बहादुर सिंग यांच्या हत्येचा बदला घेतल्यामुळे त्यांना सगळे बंदा बहादूर सिंग असं म्हणू लागले. त्यानंतर त्यांनी लौहगढ ताब्यात घेतं त्याला स्वत:ची राजधानी घोषित केलं. त्यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने नाणी बनवल्या. पुढे काही महिन्यात बंदा बहादूर यांनी राहोन, बटाला, पठानकोट, सहारनपुर, जलालाबाद, मुज़फ़्फ़रनगरवर काबीज केलं आणि पंजाबमध्ये शिख साम्राज्य स्थापन केलं.
लाहोरपासून पूर्व राज्यांपर्यंत शिख साम्राज्य पसरलं होतं. त्यामुळे मुघलांना दिल्लीपासून लाहोरला छुपे संवाद साधणं कठीण जात होतं. बहादुर शाह दख्खनमधून परतला होता. त्यामुळे त्याने शीख सम्राज्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या सैन्यासाठी एक फरमान जारी केलं, मुघल सैन्यातील सर्व हिंदूंनी आपली दाढी काढावी. त्याशिवाय त्याला कोणताही शीख सैन्यात नको होता. कारण मुघल शिखांवर हल्ला करायला जात होते.
त्याने मुनीम खान या सेनापतीच्या नेतृत्वात ६०,००० सैन्य लौहगढला पाठवलं. अर्थात, या सैन्यासमोर बंदा बहादूर सिंग यांचं सैन्य संख्येने कमी होतं. या साठ हजारांच्या सैन्याने लौहगढला वेढा घातला. त्यावेळी गुलाब सिंग नावाच्या माणसाने बंदा बाहदूर सिंग यांची जागा घेतली, आणि बंदा बहादूर हे किल्ल्यातून मुघल सैन्याच्या नजरेतून लपत बाहेर पडले. ते चंबाच्या जंगलात गेले. यानंतर बहादूर शाहने एक फरमान काढलं, जिथे शीख दिसेल त्याला मारून टाका.(Banda Singh Bahadur)
नंतर दोन वर्ष बंदा बहादूर हे असंच जंगलातून शिखांना आणि त्यांच्या सैन्याला आदेश देत राहिले, त्यांना पुन्हा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. म्हणून त्यांनी पंजाबच्या कीरतपूर साहिबमध्ये शिखांना जमा करून राजा अजमेर चंदला हरवलं. कारण अजमेर चंदने वेगवेगळ्या राजांना गुरु गोविंद सिंग यांच्या विरुद्ध भडकवलं होतं. आता हे सगळं होईपर्यंत १७१२ मध्ये बहादूर शाहचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. याचा फायदा घेत बंदा बहादूर सिंग यांनी लोहगढ पुन्हा ताब्यात घेतला. बहादूर शाहच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्वात मोठ्या मुलाने फर्रुख़सियरने मुघल साम्राज्याची कमान आपल्या हाती घेतली. (History)
आणि सत्तेत येताच त्याने बंदा बहादूर सिंग यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली. त्याने लाहोरचा शासक म्हणून समद खानची निवड केली आणि त्याचा मुलगा झकरिया खानला जम्मूचा फौजदार म्हणून नियुक्त केलं. या दोघांनी मग बंदा बहादूर विरोधात मोहीम सुरू केली. ३ वर्षांच्या आत या दोघांनी बंदा बहादूर सिंगला गुरुदासपुर शहरातून ८ किलोमीटर लांब गुरदास नांगलपर्यंत जाण्यास भाग पाडलं. तिथे किल्ल्याच्या सुरक्षिततेमुळे बंदा आणि त्याचे सहकारी कसे तरी बचावले. पण समद खानने आपले डावपेच वापरत गुरदास नांगल किल्ल्याकडे जाणारे सर्व मार्ग रोखले. त्यामुळे किल्ल्यात अन्न पाणी नेण्यासाठी कोणताच मार्ग उरला नव्हता. बंदा बहादूर यापूर्वी सुद्धा लोहगढ मधून मुघलांच्या हातून निसटले होते. त्यामुळे समद खानने वाट पाहण्याचे निर्णय घेतला. (Banda Singh Bahadur)
समद खानने अनेक महीने गुरदास नांगल किल्ल्याबाहेर तळ ठोकला. त्यामुळे किल्ल्याच्या आतमध्ये अन्न पाण्याची कमतरता होऊ लागली. काही महिन्यांनी तर बंदा बहादूर आणि त्यांच्या साथीदारांना किल्ल्यावर उगवणार गवत खाऊन दिवस काढावे लागले. पण ते संपल्यानंतर त्यांना किल्ल्यावर असणाऱ्या जनावरांना मारून खावं लागलं. असे ८ महीने गेले. पण समद खान किल्ल्याबाहेरून हलला नव्हता. शेवटी बंदा बहादूर सिंग यांनी मरू नाहीतर मारू असं म्हणत किल्ल्याचे दरवाजे उघडले. ते उघडताच मुघलांनी हल्ला केला. तो दिवस होता १७ डिसेंबर १७१५, त्या दिवशी ३०० शीख सैनिक मारले गेले. बंदा बहादूर सिंगला अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत ७०० शिखांना सुद्धा अटक केलं गेलं.(History)
मग मेलेल्या शिखांचं मुंडकं भाल्याला लटकवून लाहोर शहराच्या बाजारात एक मिरवणूक काढली गेली. नंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं. बंदा बहादूर आणि त्यांच्या साथीदारांना बघण्यासाठी दिल्लीमध्ये गर्दी जमली. शीख सैनिकांच्या मुंडक्यांसह बंदा बहादूर आणि त्यांच्या उर्वरित सैनिकांना बादशाह फर्रुख़सियरच्या दरबारात नेण्यात आलं. फर्रुख़सियरने बंदा आणि त्याच्या २३ साथीदारांना मीर आतिश इब्राहिम-ओ-दीन-खान यांच्या स्वाधीन केलं आणि मीर आतिशने त्यांना त्रिपोलिया तुरुंगात टाकलं. (Banda Singh Bahadur)
वर्षभरानंतर बंदांच्या उर्वरित साथीदारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. हे काम सरबाह खां याच्यावर सोपवण्यात आलं होतं. तेव्हा प्रत्येक शीख सैनिकाला एक प्रश्न विचारला जायचा, तुम्ही इस्लाम कबूल करता का? जर ते नाही म्हणायचे तर त्यांचं मुंडकं धडापासून वेगळं केलं जायचं. आता पर्यंत अनेक शीख सैनिकांचे शिरच्छेद करण्यात आले होते. हे सलग सात दिवस सुरू होतं. हे करताना सरबाह खां वैतागला होता आणि त्याने फर्रुख़सियरला ही शिक्षा थांबवण्याची विनंती केली. काही दिवस त्यांच्यावर अत्याचार केला तर ते स्वत: इस्लाम स्वीकारतील, असं सरबाह खां याने फर्रुख़सियरला सांगितलं. त्यामुळे ही शिक्षा थांबवण्यात आली.(History)
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
===============
इथे इस्लाम स्वीकारण्यासाठी शीख सैनिकांच उत्तर नाही होतं, तिथे तुरुंगात अत्याचार होत असताना सुद्धा बंदा बहादूर सिंग यांचं उत्तर सुद्धा नाहीच होतं. मग दिवस आला ९ जून १७१६, फर्रुख़सियरने आदेश दिले की, जर बंदा बहादूर सिंगने इस्लाम स्वीकारला नाही तर त्याला मारून टाकलं जावं. त्यादिवशी बंदा बहादूर सिंग यांना शाही कपडे घालण्यात आले आणि कुतुबुद्दीन बख्तियार काकी दरगाहवर नेण्यात आलं. (Banda Singh Bahadur)
तिथे त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला. इस्लाम की, मृत्यू? समोरून नकारच आला.. हे ऐकून सरबाह खां ने बंदा बहादूर यांच्या चार वर्षांचा मुलगा अजय सिंगला समोर आणलं, त्याच्या मानेवर तलवार ठेवली आणि मग पुन्हा तोच प्रश्न, आणि समोरून पुन्हा तेच उत्तर. हे ऐकून सरबाह खां ने अजयच शीर एका क्षणात धडा वेगळं केलं. त्यानंतर त्याने अजय सिंगच्या शरीराला कापून, त्यातून त्या चार वर्षाच्या मुलाचं हृदय कापून काढलं आणि बंदा बहादूर सिंग यांच्या तोंडात कोंबलं. बंदा सिंग बहादूर डगमगले नाहीत, तरीही त्यांनी मृत्यूचं निवडला.(History)
यानंतर मुघलांनी खंजीर खुपसून त्यांचे डोळे उपटून काढले. तापलेल्या लोखंडी सळ्या त्यांच्या शरीरात घुसवण्यात आल्या. छत्रपती संभाजी महाराजांसारखचं मृत्यूपूर्वी जितकं छळता येईल तितकं बंदा सिंग बहादूर यांना सुद्धा छळण्यात आलं. शेवटी त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. मुघल साम्राज्याचा जितका तामझाम होता, तितकाच त्यांनी क्रूरतेचा कळस गाठला होता. बंदा सिंग बहादूर यांनी बहादुरीने बलिदान दिलं.
असं म्हणतात माज जास्त काळ टिकतं नाही आणि फर्रुख़सियरचा सुद्धा टिकला नाही. बंदा सिंग बहादूर यांच्या बलिदानानंतर २ वर्षांनी मराठ्यांनी पेशवा बालाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली फर्रुख़सियरचा पराभव केला. दुसरीकडे महाराज रणजीत सिंग यांनी काबूल, श्रीनगर आणि लाहोर ताब्यात घेतं पुन्हा एकदा शीख साम्राज्य उभं केलं. आज अनेकांना बंदा सिंग बहादूर यांच्याबद्दल फार काही माहीत नाही. पण आपल्या डोळ्यांसमोर आपल्या कोवळ्या मुलाला मरताना पाहणाऱ्या बंदा सिंग यांच्या बहादुरीची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचायला हवी, एवढंच….