मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतं शौर्य, पराक्रम, बलिदान… पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर आली पाहिजे, ती म्हणजे पुरावा, संदर्भ ! शिवकाळात घडलेल्या जवळपास सर्वच घटना कोणत्या ना कोणत्या साहित्यात नमूद आहेत. मग तो श्री शिवभारत ग्रंथ असो, सभासद बखर असो, अज्ञानदासाचा पोवाडा असो किंवा इतर समकालीन कागदपत्र असो… पुरावा असला की तो इतिहास खरा मानायला काहीच हरकत नसते. आपण सर्वच शाळेपासूनच नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास वाचत आलो आहोत. आता तानाजी मालुसरे म्हटलं की सिंहगड आला आणि सिंहगड म्हटलं म्हणजे सुबेदार तानाजी यांनी गाजवलेला पराक्रमसुद्धा आला. पण अजून एका गोष्टीसोबत तानाजी मालुसरे यांचं नाव जोडलं जातं, ते म्हणजे त्यांची यशवंती नावाची घोरपड… शाळेच्या इतिहासापर्यंत घोरपडीच्या सहाय्यानेच तानाजी कडा चढले असं माहित होतं. मात्र मोठे झालो आणि नवीन गोष्टी समोर यायला लागल्या. तानाजी मालुसरे आणि घोरपड यांच्याबाबत अनेक संभ्रमात टाकणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याच्या वेगवेगळ्या थियरी आहेत. (Tanaji Malusare)
आपण तानाजी मालुसरे यांनी कोंढाणाच्या द्रोणगिरीचा कडा चढल्याच्या तीन थियरी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊ. पहिली सुप्रसिद्ध थियरी म्हणजे त्यांची यशवंती नावाची एक पाळीव घोरपड होती आणि तिच्या सहाय्याने ते कडा चढले. दुसरी थियरी हे सांगते की, जसं वाघनख हे वाघाच्या नखासारखं शस्त्र असतं, तसच यशवंती नावाचं हे घोरपडीच्या नखासारखं शस्त्र होतं आणि त्याच्या सहाय्याने सुबेदार तानाजी कडा चढले आणि तिसरी थियरी म्हणजे एक वेगाने कडा चढणारे घोरपडे बंधू होते आणि त्यापैकीच एकाच नाव यशवंत घोरपडे असं होतं.(History)
आता घोरपडीचा पहिला उल्लेख कुठे आलाय, तर उत्तर पेशवे काळात असलेल्या शाहीर तुलसीदास यांनी लिहिलेल्या “तानाजी मालुसरा पोवाडा” यात पहिल्यांदा घोरपडीचा उल्लेख आला आहे.
चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥
बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥
ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥
सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥
भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥
सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥
अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥
आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥
“सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली” ॥
राग आला त्या मर्दाला । “मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥
एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन” ॥
त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥
हा घोरपडीचा एकमेव उल्लेख आपल्याला मिळतो तोसुद्धा पोवाड्यात… मात्र त्याकाळीच असलेला श्री शिवभारत ग्रंथ आणि सभासद बखर घोरपडीचा उल्लेख मात्र कुठेच मिळत नाही. सभासद बखर म्हणते, ‘जसे वानर चालून जातात, त्याप्रमाणे मावळे गड चढून गेले’. याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रात घोरपडीचा उल्लेख नाही. अभ्यासकांच्या मते पोवाडे किंवा कादंबरी यामध्ये काही गोष्टी अतीशयोक्ती करून सांगितल्या जातात. त्यामुळे घोरपड हे पोवाडे, कादंबऱ्या, नाटकं, कविता आणि सिरिअल्स यातुनच दिसून आला आहे. कुसुमाग्रज यांची एक निर्धार नावाची प्रसिद्ध कविता आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, ‘घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले ! त्यामुळेच काही इतिहासकारांच्या साहित्यात घोरपड मिळते पण काहींच्या साहित्यात घोरपडीचा उल्लेख सापडत नाही. (Tanaji Malusare)
मुळातच घोरपड हा पाळीव प्राणी नाही. त्यातच घोरपडीला कोणतही प्रशिक्षण देता येत नाही. त्यामुळे घोरपडीला दोर लावून ती आपल्या इशाऱ्यानुसार कडा चढू शकते, हे जवळपास अशक्य असल्याचं अनेक इतिहासकार आणि यांच्यासोबत प्राणीतज्ञसुद्धा सांगतात. काही इतिहासकारांच्या मते यशवंती या नावाचं एक शस्त्र होत, जसं वाघनख असतं. तसच हे होत, याच्या आधारे आपण कडा चढू शकत होतो. पण या शस्त्राचा उल्लेखसुध्दा कुठेच सापडत नाहीत, त्यामुळे हे मिथकच म्हणावं लागेल. इतकच काय तर कडा चढण्यासाठी जो दोर वापरला जात होता, त्याचच नाव यशवंती होत, असंही अनेकांचं म्हणण आहे. आता शस्त्र आणि घोरपड हे आपण बाजूला सारुया, कारण त्याला सढळ असे पुरावे नाहीत. (History)
आता काहींच्या साहित्यात घोरपडे बंधू किंवा यशवंता घोरपडे असा उल्लेख येतो. मल्हार रामराव चिटणीस लिखित सप्त प्रकरणात्मक चरित्र, चित्रगुप्त बखर, शेडगांवकर बखर, लेखक हरी नारायण आपटे यांचं गड आला पण सिंह गेला पुस्तक तसेच गो नि दांडेकर यांचे झुंजार माची आणि हर हर महादेव या पुस्तकांमध्ये आपल्याला यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्याचा उल्लेख सापडतो. यातल्या एका पुस्तकात लिहिलं गेलं आहे की,
पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेलेला कोंढाणा किल्ला किल्लेदार उदयभानू कडून जिंकूण पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी तान्हाजी मालुसरे यास कोंढाणा किल्ल्याच्या चोरवाटा, चौकी पहाऱ्याच्या जागा व किल्ल्यावर असलेल्या शिबंदीची खडानखडा बातमी रायाजी घेरे सरनाईक, गोंदनाक महार, मल्हारबा, राणबा, शिदबा यांनी पुरविली आणि यशवंता घोरपडे हा अवघड कडा घोरपडीसारखा सरसर चढून वर गेला व तेथील बहाव्याच्या झाडाला दोर बांधून तो त्याने तानाजी व त्याच्या सैन्यासाठी खाली सोडला. (Tanaji Malusare)
आता वरती मी ज्या बखरींचा आणि पुस्तकांचा उल्लेख मी केला, ते सुद्धा उत्तरपेशवे कालीन आहेत. त्यामुळे यशवंता घोरपडे नावाचा मावळा किंवा घोरपडे नावाचे बंधू खरच तानाजी मालुसरे यांच्या सैन्यात होते का ? हा प्रश्नसुद्धा निर्माण होतो. आपल्या सर्वांना अजय देवगण आणि ओम राऊतचा तान्हाजी द अनसंग warrior हा चित्रपट माहितच असेल. यामध्ये २०१९ ला जेव्हा याचं पोस्टर Launch केलं गेलं होतं, तेव्हा यामध्ये घोरपड दाखवण्यात आली होती. त्यानंतर तानाजी मालुसरे यांच्या आजच्या वंशजांसोबत चर्चा केल्यानंतर निर्मात्यांनी ती घोरपड काढून टाकली आणि चित्रपटात घोरपडे बंधू तो कडा चढतात असं दाखवलं. (History)
समकालीन कागदपत्रांमध्ये कुठेही यशवंता घोरपडे नावाच्या मावळ्याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही. तर सर्व उत्तरकालीन कागदांमध्येच त्याचे नाव आहे. त्यामुळे हा पुरावासुद्धा संभ्रमच निर्माण करतो. समकालीन कागदपत्रांमध्ये आपल्याला एकच उल्लेख मिळतो, तो म्हणजे मावळेच दोन लावून हा खडतर कडा चढले. यामध्ये दोन तर्क असे आहेत की, किल्ल्यावरच असलेल्या मराठ्यांच्या एका गुप्तहेर मावळ्याने हा दोर खाली टाकला आणि दुसरं म्हणजे मराठे कडा चढण्यात तरबेज होतेच आणि तसं प्रशिक्षण त्यांना मिळालं होतं. त्यामुळे अनेक इतिहासकार याच गोष्टीला तथ्य मानतात की, मावळे दोन लावून चढण्यात प्रशिक्षित असल्यामुळे तेच द्रोणगिरी कड्याला दोर लावून कोंढाण्यावर चढले.(Tanaji Malusare)
घोरपडीची कथा केवळ सिंहगडाच्या संग्रामापुरती सीमित नाही. तर तिचा सर्वात जुना पुरावा थेट १५व्या शतकात जातो. घोरपड ह्या प्राण्याचा डोंगरी किल्ले जिंकण्यासाठी करण्यात येणारा उपयोग प्राचीन आहे, हे यातून दिसून येतं. याचा एक पुरावा आपल्याला इतिहास संशोधक दत्तोपंत आपटे यांच्या ‘मुधोळ संस्थानाचा इतिहास’ या ग्रंथात मिळतो.(Tanaji Malusare)
महमदशहा बहामनी याने खेळणा किल्ला म्हणजेच विशाळगड जिंकण्यासाठी त्याचा कारभारी महमूद गवानला पाठवलं होतं. त्यावेळी किल्ला शंकरराव मोरे यांच्या ताब्यात होता. काही केल्या किल्ला सर होत नव्हता. त्यामुळे गवानने आपला पराक्रमी सरदार कर्णसिह भोसले आणि त्यांचा पुत्र भीमसिंग यांची मदत घेतली. दोघांनीही आपल्यासोबत खूप घोरपडी आणल्या होत्या. या घोरपडीना दोरखंड बांधून त्या चढल्यावर तो दोर कुठे झाडात किंवा दगडात अडकला की एक एक सैनिक कडा चढायचा. असं करून त्यांनी संपूर्ण सैन्य किल्ल्यावर पोहोचवलं. तुंबळ युद्ध झालं आणि बहामनी विजयी झाला. पण तरीही घोरपड या पाळीव नसलेल्या प्राण्याचा वापर त्यांनी कसा केला, याची समूळ माहिती आपल्याला मिळत नाही.
===============
हे देखील वाचा : kalpana chawla : आपला मृत्यू होणार हे कल्पना चावला यांना आधीच माहीत होतं!
===============
ह्या कामगिरीबद्दल भीमसिंग भोसले यांना सोन्याची घोरपड आणि ‘राजा घोरपडेबहाद्दर’ असा किताब देण्यात आला. तसेच घोरपडचीच्याच चिन्हाचा झेंडा त्यांना प्रदान करण्यात आला. हा प्रसंग जवळपास १४७१ सालचा आहे. यानंतर त्यांनी आपलं नाव घोरपडे हेच ठेवलं, असे उल्लेख आपल्याला मिळतात. याच भीमसिंग यांचे सातवे आणि आठवे वंशज म्हणजे म्हळोजी घोरपडे आणि सरसेनापती संताजी घोरपडे ! आजही सगळ्या घोरपडे राजघराण्याच्या झेंड्यांवर घोरपड या प्राण्याचं चित्र आढळतं. ती सोन्याची घोरपड आजही मुधोळच्या घोरपडे सरकारांच्या वाड्यात आहे. घोरपडे बहादूर घराण्याची भारतात जवळपास ७ ते ८ संस्थाने आहेत त्या प्रत्येक राजाच्या निशाणावर आजही घोरपडीचे चित्र आहे. त्यांचे ब्रिटिश काळातले चलन, सही शिक्के यावर सगळीकडे घोरपडीचे चित्र आढळतं. (History)
त्यामुळे घोरपड आणि सैन्य यांचे जुने संबंध जरी असले तरी तानाजी मालुसरे यांनी घोरपडीचा वापर केला नव्हता, याकडेच अनेक इतिहासकारांचा कल आहे. त्यातच यशवंता घोरपडे असा कोणी मावळा होता, यालाही इतिहास दुजोरा देत नाही.