Home » एका जास्तीच्या रोटीमुळे कपिल देव बनला द्रुतगती गोलंदाज…(kapil Dev)

एका जास्तीच्या रोटीमुळे कपिल देव बनला द्रुतगती गोलंदाज…(kapil Dev)

by Team Gajawaja
0 comment
कपिल देव Kapil Dev
Share

सध्या कबीर खानच्या ‘८३’ या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला झाला आहे. हा चित्रपट १९८३ च्या भारताच्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. या चित्रपटाने १९८३ च्या विजयी मोहिमेच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. या चित्रपटाचा नायक आहे रणवीर सिंग, पण पडद्यामागील खरा महानायक आहे, कपिल देव रामलाल निखंज (Kapil Dev)! विश्वविजेत्या संघाचा कप्तान! याच कपिलचा आज म्हणजेच ६ जानेवारी रोजी ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याला ही मानवंदना.

कपिल देवने भारतात जलद गोलंदाजीची स्वतंत्र ओळख निर्माण केली. कपिल देव पूर्वी भारतात वेगवान गोलंदाज झाले नाहीत असे नाही. मोहम्मद निसार, दत्तू फडकर, रमाकांत देसाई यांनी एक काळ गाजवला होता. यातले निसार, रमाकांत देसाई हे निव्वळ गोलंदाज होते, तर फडकर हे कपीलच्याच जातकुळीचे म्हणजे अष्टपैलू खेळाडू होते. किंबहुना दत्तू फडकरांचाच वारसा कपिलने चालवला, असे म्हणणे अधिक योग्य होईल. पण दत्तू फडकरांचा काळ हा कपिलच्या जन्माआधीचा असल्याने कपिलने त्यांना खेळताना पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

kfacts

साधारणतः १९५० च्या दशकापासूनच भारतीय क्रिकेटचा कब्जा विनू मंकड, सुभाष गुप्ते, नाडकर्णी, प्रसन्न, चंद्रशेखर, वेंकट आणि बेदी या अव्वल फिरकी गोलंदाजांनी घेतल्याने भारतीय क्रिकेटला जणू द्रुतगती गोलंदाजीचा विसरच पडला होता.

कपिल देव (Kapil Dev) एका अर्थाने नशीबवान ठरला की, त्याचा उदय भारतीय फिरकी चौकडी अस्तंगत होत असताना झाला. पण कपिलला सुद्धा फिरकीच्या वर्चस्वाचा शाब्दिक फटका बसलाच. १५ वर्षाखालील संघाच्या  शिबिरात असताना त्याने द्रुतगती गोलंदाज असल्याने एक रोटी जास्त मागितली तेव्हा केकी तारापोर यांनी त्याची खिल्ली उडवली व म्हटलं, “भारतात फक्त फिरकी गोलंदाज पैदा होतात.” कपिलने हा अपमान लक्षात ठेवला आणि कठोर मेहनत करून दोन तीन वर्षातच १९७८ च्या  पाकिस्तान दौऱ्यात तो भारतीय संघात द्रुतगती गोलंदाज म्हणून दाखल झाला.

या दौऱ्यात कपिल भलेही गोलंदाज म्हणून फार प्रभाव टाकू शकला नाही, पण त्याच्या उसळत्या चेंडूंनी (बाउन्सर) पाकिस्तानी फलंदाजांना इतके हादरवले की, त्यांनी हेल्मेटचा आसरा घेतला. सुनील गावस्करानी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्यासाठी हा एक सुखद धक्का होता कारण तोपर्यंत भारतीय फलंदाज उसळत्या माऱ्याचे शिकार होत असत. पण आता त्यांच्या हाती जशास तसे उत्तर देणारे शस्त्र उपलब्ध झाले होते.

Kfacts

कपिल एकूण १३१ कसोटी  सामने खेळला. त्यात त्याने २९.६४ च्या सरासरीने ४३४ बळी मिळवले, तर ३१.०५ च्या सरासरीने ५२४८ धावा काढल्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ८ शतकेही झळकावली. ४०० बळी व ५००० धावा अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. एवढ्या भव्य अष्टपैलू कारकिर्दीचा आढावा एका लेखात घेणे केवळ अशक्य. पण कपिलच्या अलौकिक खेळाची झलक  दाखवणाऱ्या काही कामगिऱ्यांची दखल घेणे अनिवार्य ठरते.

सन १९७८ च्या पाकिस्तान दौऱ्यात त्याने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवताना कराची कसोटीत केवळ ३३ चेंडूत अर्धशतक फाटकावले (हे त्यावेळी भारतातर्फे नोंदवलेले सर्वात जलद अर्धशतक होते). त्याच्या या खेळीचे धावते वर्णन ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिल्याचे स्मरते, इतके त्याने इम्रान, सर्फराज, कादिर यांना बदडले होते.

१९७९ मध्ये पाकिस्तान संघ भारतात आला. मुंबई  व चेन्नई येथील सामन्यात कपिल सामनावीर ठरला कारण हे दोन्ही सामने त्याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर जिंकून दिले. चेन्नई येथील फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर त्याने दोन्ही डावात मिळून ११ विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीत झंझावाती ८४ धावा काढल्या. दुसऱ्या डावात तर त्याने ५६ धावात सात बळी मिळवले. पण याहीपेक्षा महत्वाची कामगिरी त्याने बजावली ती झहीर अब्बासला पुऱ्या मालिकेत डोके वर काढू न देण्याची.

पाकिस्तानात भारतीय गोलंदाजी अक्षरशः कुटून काढणाऱ्या झहीरचा लेग स्टंप दिल्लीमध्ये तीन ताड उडवला, तर मुंबईत त्याची लेग स्टंप वरील बेल हळुवारपणे उडवली ती कपिलच्या घातक इंस्वीनगरने. या धक्क्यातून झहीर सावरलाच नाही आणि त्यामुळे भारतीय जनमानस भयंकर सुखावले.

On This Day in 1978: 19-year-old Kapil Dev Made his Test Debut in Faisalabad

त्यानंतरचा १९८१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबॉर्न कसोटी कोण विसरेल? पहिल्या डावात १८२ धावांनी मागे पडलेला भारत तो सामना जिंकेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण जायबंदी कपिलने वेदनाशामक इंजेकशन घेऊन गावस्करांच्या शब्दाखातर शेवटच्या दिवशी गोलंदाजी करून २८ धावात ५ गडी टिपून भारताला स्वप्नवत विजय मिळवून दिला. यावेळी त्यानं आपल्या बुद्धिमानतेचा परिचय करून दिला. खेळपट्टीवर चेंडू खाली राहत होता अशा वेळी त्याने यष्ट्यांवर सरळ मारा केला.

सन १९८२ च्या  इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सच्या पहिल्या कसोटीत त्यानं ८ बळी तर मिळवलेच पण फॉलो ऑन मिळाल्यावर दुसऱ्या डावात ५५ चेंडूत ८९ धावा ठोकून मारता मारता मरेतो झुंजेन या बाण्याची प्रचिती दिली. दुसऱ्या डावात इंग्लंडचे तीन गडी झटपट बाद करून काही काळ इंग्लंडच्या तोंडचे पाणी पळवले .इंग्लंडने सामना जिंकला ही गोष्ट अलाहिदा.

याचवर्षी (१९८२) पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आपले आठ गडी १०० धावांच्या आसपास बाद झालेले असताना त्याने सर्फराज, इम्रान व कादिर यांच्यावर प्रतिहल्ला चढवून ५३ चेंडूत ७३ धावा चोपल्या. ही खेळी टीव्हीवर प्रत्यक्ष बघताना झालेला आनंद शब्दातीत होता. याच मालिकेत त्याने तीन वेळा ५ पेक्षा अधिक बळी मिळवून भारताची थोडीफार लाज राखली.

१९८३ च्या विश्वचषकातील दिग्विजयाविषयी उदंड लिखाण झालेले असल्याने पुनरुक्ती करण्यात अर्थ नाही. पण झिम्बाबवे विरुद्ध ५ बाद १७ अशा स्थितीत मैदानात उतरल्यावर कपिलने जो संयम दाखवला त्याचे गावस्करानी कौतुक करताना सांगितले की, त्याने वैयक्तिक ८० धावा काढेपर्यंत एकही हवाई फटका मारला नाही.

कपिलने रिचर्ड्सचा अंतिम सामन्यात घेतलेला झेल आजपर्यंत विश्वचषकातील सर्वोत्तम झेल मानला जातो, यातच सर्व काही आले.वेस्ट इंडिज चा संघ १९८३ मध्ये  भारताच्या दौऱ्यावर आला होता .या मालिकेत कपिलने २९ विकेट्स घेऊन मालिकावीर हा ‘किताब मार्शलबरोबर संयुक्तपणे मिळवला .अहमदाबादच्या कसोटीत कपिलने दुसऱ्या डावात ८३ धावात ९ बळी ही आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवली, पण ती कसोटी भारताने गमावली.

सन १९८५ मध्ये अडलेडला कपिलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात १०६ धावात ८ बळी मिळवले. त्यातील शेवटचे पाच बळी केवळ सात धावांच्या मोबदल्यात मिळवले. त्याने टाकलेल्या बॉऊन्सर्सवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची तारांबळ उडाली होती.

सन १९८६ मध्ये कपिलच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमधील मालिका २-० अशा फरकाने जिंकली. लॉर्ड्सच्या पहिल्या सामन्यात विजयासाठी १३५ धावांची गरज असताना भारताने ५ विकेट्स गमावल्या, पण कपिलने झटपट २३ धावा काढून सामना लवकर संपवला. या सामन्यात कपिलने आपल्या स्विंग गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन केले आणि एकूण पाच विकेट्स काढल्या व तोच सामनावीर ठरला.

Success story of Kapil Dev कपिल देव - यशोगाथा

सन १९८६ मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चेन्नई येथील टाय सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावून कपिलने फॉलो ऑन वाचवला त्यानंतर बॉर्डरने केलेल्या धाडसी डी क्लेरेशन मुळे चौथ्या डावात भारताला विजयाची संधी निर्माण झाली. सन १९९० च्या लॉर्ड्स कसोटीत समोर ११ वा खेळाडू हिरवानी असताना त्याने एडी हेमिंग्सला लागोपाठ चार षटकार मारून भारताला फॉलो ऑन पासून वाचवले, तो प्रसंग कोण विसरेल?

१९९१-९२ चा ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतासाठी निराशाजनक ठरला, पण कपिलने मालिकेत २५ विकेट्स घेतल्या. मार्क टेलरला पायचीत करून त्याने आपला ४०० वा बळी नोंदवून, भारतातर्फे ४०० विकेट्स  घेण्याचा सर्वप्रथम मान मिळवला. १९९२ च्या दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ कसोटीत दुसऱ्या डावात भारताची ६ बाद ३७ अशी अवस्था झाली होती व पहिल्या डावातील ६० धावांची  पिछाडी भरून काढण्याआधीच भारताचा डाव संपतो की काय अशी वेळ आली होती. पण कपिलने प्रभाकर,कुंबळे, मोरे याना साथीला घेत झुंजार १२९ धावा काढल्या आणि आफ्रिकेला विजयासाठी झगडायला लावले.

हे सुद्धा वाचा: अजित आगरकर(Ajit Agarkar): पूर्ण न उमललेले फुल

रिचर्ड हेडलीचा ४३१ बळींचा त्यावेळचा विक्रम त्याने मोडला तो अहमदाबादला श्रीलंकेविरुद्ध. हसन तिलकरत्नेचा झेल संजय मांजरेकरने घेतला व कोट्यवधी भारतीयांची जागतिक विक्रमाची प्रतीक्षा संपली. कपिल देव आपली अखेरची कसोटी १९९४ मार्चमध्ये न्यूझीलंड मध्ये खेळला आणि नंतर त्याने निवृत्ती पत्करली. निवृत्तीनंतर तो गोल्फ कडे वळला आणि त्या खेळात सुद्धा चॅम्पियन बनला.

कपिलने कसोटीमध्ये एकूण २३ वेळा ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या (दोन वेळा सामन्यात दहा अथवा त्याहून अधिक बळी मिळवले). पण दुर्दैवाने त्यापैकी १० वेळा भारताचा पराभव झाला व केवळ तीन वेळा भारत जिंकला. २३ पैकी १३ वेळा कपिलने हा पराक्रम परदेशी भूमीवर केला हे विशेष. कपिल, इम्रान आणि बोथम या तिघा महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यावेळी एक सुप्त स्पर्धा असायची.

Fit and healthy Kapil Dev "happy" to be playing golf with friends - myKhel

कपिल देव (Kapil Dev) देशांतर्गत स्पर्धांतून सुद्धा खेळत असे. सन १९९१ च्या  मोसमात हरयानाने कपिलच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रणजी स्पर्धा जिंकली ती मुंबईला तीन धावांच्या निसटत्या फरकाने हरवून! कपिलचा गोलंदाजी करतानाचा लयबद्ध रन अप व चेंडू टाकताना अखेरच्या क्षणी त्याची उडी मारण्याची शैली नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरावी. फलंदाजी करताना कपिल जास्तीत जास्त ‘V’ मध्ये म्हणजे ‘मिड ऑफ व मिड ऑन’ च्या पट्ट्यात खेळत असे. त्याचे फटके अत्यंत ताकदवान असत, पण ते  सहजतेने मारलेले असत. गावस्कर म्हणतात त्याप्रमाणे कपिलने स्वतःला फलंदाज मानले असते, तर तो निश्चित ८ हजार धावांपर्यंत पोचू शकला असता.

कप्तान म्हणून मात्र कपिलची कामगिरी तितकीशी उल्लेखनीय नाही. त्याने एकूण ३४ कसोटीत भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी चार कसोटी सामने भारताने जिंकले, तर सात सामन्यात भारत हरला. १९८३ मध्ये अहमदाबादला विंडीज विरुद्ध नवीन खेळपट्टीवर प्रथम फिल्डिंग करण्याचा त्याच्या निर्णयावर सडकून टीका झाली होती. एक दिवसीय सामन्यात सुद्धा शारजातील जावेदच्या चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडुवरील प्रसिद्ध षटकारानंतर तो फक्त अखेरचे षटक स्वतः टाकण्याचे नियोजन करीत असे. त्यामुळे त्याच्या डावपेचात नावीन्य राहिले नव्हते. 

हे ही वाचा: हे वाद टाळता येणार नाहीत का?

‘आयपीएल (IPL)’ मध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा ‘हा’ खेळाडू वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी क्रिकेट मधून बाहेर पडला होता

खेळत असताना कपिल अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. सन १९८४ मध्ये दिल्लीला कपिलने अत्यंत बेजबाबदार फटका मारून इंग्लंडला जणू सामना बहाल केला आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला एका कसोटीसाठी वगळण्यात आले होते. तसेच १९८७च्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात कपिलने पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट फेकली आणि हातातील सामना भारताने गमावला. यानंतर कपिलचे कर्णधारपद काढून घेतले गेले ते कायमचेच. कपिलने प्रांजळपणे कबूल केले आहे की, बेजबाबदार खेळून त्यानेच ही वेळ ओढवून घेतली.

हे देखील वाचा: रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja): एक शांत योद्धा!

असे काही प्रसंग झाले असले तरी कपिल देव (Kapil Dev) भारतीय क्रिकेटसाठी एक युग प्रवर्तक खेळाडू ठरला. त्याच्या पावलावर पाऊल टाकून चेतन शर्मा, मनोज प्रभाकर, श्रीनाथ असे दर्जेदार जलदगती गोलंदाज भारतात निर्माण झाले. जसे श्रीरामाबरोबर लक्ष्मणाचे नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही त्याप्रमाणे गावास्करबरोबर कपिलचे नाव घेतल्याशिवाय भारतीय क्रिकेटचा इतिहास कधीही पूर्ण होणार नाही. गावस्कर व कपिल देव या महानायकांच्या रूपाने भारतीय क्रिकेटमध्ये एक दुग्धशर्करा योग आला होता, असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.

– रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.