भारत, आपल्या देशाला जगात विविध कारणांमुळे ओळखले जाते. जसे की जगातील सर्वात मोठी लोकशाही, विविधतेमध्ये एकता असणारा देश, सर्वधर्म समभाव असणारा देश आदी. मात्र या सर्व गोष्टींमध्ये आपल्या देशाची अशी एक ओळख आहे, ज्यामुळे शत्रू भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याआधी नक्कीच दहा वेळा विचार करेल. ही ओळख म्हणजे भारताकडे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. (Indian Force)
अर्थात जगात सर्वाधिक सेना, लष्कर असणाऱ्या देशामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. भारताचे लष्कर हे देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करते. हेच त्यांचे मुख्य काम आणि कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो.
भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य असलेले भारतीय लष्कर आपले ब्रिदवाक्य कायम खरे करत आले आहे. आज १५ जानेवारी. आजचा दिवस संपूर्ण भारतामध्ये भारतीय सेना दिन (Indian Army Day) म्हणून साजरा करण्यात येतो.
आजच्या दिवशी भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला घाबरून न जाते केवळ आपले कार्य करणाऱ्या आपल्या भारतीय सेनेबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाला गर्व आहे.
यावर्षी भारत आपला ७७ वा लष्कर दिन साजरा करत आहे. (77th Indain Army Day) भारतात हा दिवस साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. भारतीय सेना दिवस साजरा करण्यामागे एक मोठा आणि महत्वाचा इतिहास आहे. आजचा हा दिवस आपल्याला भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनेची आठवण करून देतो. चला जाणून घेऊया भारतीय सेना दिवसाचा इतिहास आणि माहिती. (History Of Indian Army Day)
भारतीय सेना दिन फील्ड मार्शल केएम करिअप्पा (Lieutenant General KM Kariappa) यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी लष्करावर ब्रिटिश सेनापतीचा ताबा होता. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. तरीही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्याच व्यक्तीकडे सोपवण्यात आले होते. १९४९ मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते.
पुढे बुचर यांच्या जागी भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांची नेमणूक करण्यात आली. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. खास बाब म्हणजे करिअप्पा हे १५ जानेवारी १९४९ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. म्हणूनच हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
ब्रिटीशांच्या जवळपास २०० वर्षांच्या राजवटीनंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याची सर्व सूत्रे १५ जानेवारी १९४९ रोजी एका भारतीय व्यक्तीकडे सोपवण्यात आली. ही भारतीय इतिहासातील खूप मोठी घटना होती. करिअप्पा लष्करप्रमुख झाले तेव्हा भारतीय सैन्यात सुमारे २ लाख सैनिक होते.
केएम करियप्पा हे ‘किप्पर’ या नावानेही ओळखले जायचे. १९४७ च्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तान विरोधातील युद्धात लेफ्टनंट जनरल करियप्पा यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. १४ जानेवारी १९८६ रोजी ते फील्ड मार्शलच्या उपाधीसह भारतीय सैन्याचे दूसरे सर्वोच्च रँकिंग अधिकारी बनले होते. करिअप्पा १९५३ मध्ये निवृत्त झाले आणि १९९३ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
=====================
हे देखील वाचा : Kinkrant संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या क्रिक्रांतबद्दलची माहिती
=====================
आजच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये आपल्या जवानांचे असामान्य धैर्य, साहस, शहीद जवानांचे बलिदान याची आठवण काढत त्यांच्याबद्दल सन्मान व्यक्त केला जातो. या दिवशी देशातील सर्व कमांड मुख्यालयामध्ये आणि दिल्लीत भारतीय सैन्याच्या मुख्यालयात सेना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आजच्या दिवशी सैन्य परेड होते. तसेच या दिवशी भारतीय सैन्याने मिळवलेल्या किंवा सैन्यात सहभागी केलेल्या नव्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन केले जाते. भारताकडे जगातील दुसरं सर्वात मोठं लष्कर असून, भारतीय लष्करातील जवानांची संख्या जवळपास १४ लाख आहे.