सोशल मिडियावर सध्या एकच प्रश्न विचारण्यात येत आहे, तुम्ही आठवड्याचे किती तास काम करता. त्याला कारण ठरले आहेत, एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम. सुब्रह्मण्यम यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान एक विधान केले, त्या विधानाची चर्चा आता सर्व देशात होत आहे. त्यात एल अँड टी मधील कर्मचा-यापासून ते उद्योगपतींपासून आणि अगदी बॉलिवूडमध्येही ही चर्चा रंगली आहे. आठवड्याचे किती तास काम केले पाहिजे. एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांच्या या दाव्यावरुन वादाचीही ठिणगी पडली. त्याला कारण झाली ती सुब्रह्मण्यम यांनी या दाव्यासोबत केलेली एक टिपण्णी. घरी राहून बायकोचा चेहरा बघत बघण्यापेक्षा ऑफीस गाठा आणि काम करा, असा मजेशीर सल्ला त्यांनी त्यांच्या कर्मचा-यांना दिला. त्यामुळे सुब्रह्मण्यम यांनी जो मुद्दा मांडला तो भरकटला गेला आणि वाद सुरु झाला तो त्यांच्या मजेशीर टिपण्णीबाबत. (S.N. Subrahmanyam)
वास्तविकमध्ये भारतामध्ये यापूर्वीही अशाच स्वरुपाचे वक्तव्य केले गेले होते. इन्फोसीसचे नारायण मुर्ती यांनी देशाला सर्वोच्च स्थानावर न्यायचे असेल तर किमान 70 तास काम करावे, अशी सूचना केली होती. अर्थात तेव्हाही थोडाफार वाद झाला. पण आता एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी यापुढे जात आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. असाच सल्ला चीनमधील उद्योगपती आणि अलिबाबा ग्रुपचे संचालक जैक मा यूं यांनीही दिला आहे. जैक यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणांचा हातभार गरजेचा असतो, या तरुणांनी आपल्या कंपनीच्या उन्नतीसाठी शक्यतो सुट्टी न घेता काम करावे असा सल्ला दिला होता. (Latest Updates)
मात्र त्यानंतर जैक मा यांच्यावर चीनमधील तरुणांनी टिका केली होती. चीनमध्ये कंपन्यांमध्ये कामाचे तास जास्त असून तिथे सुट्टयाही कमी देण्यात येतात. अशावेळी कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढल्याचे लक्षात आले आहे. तसेच त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. भारतात इंन्फोसीसचे नारायण मुर्ती यांनीही जैक मा यांच्याच वक्तव्याचा उल्लेख करत आठवड्याला 70 तास काम करावे असे आवाहन केले होते. त्यावरुन सोशल मिडियामध्ये इन्फोसीसच्या कर्मचा-यांवर अनेक मीम्स तयार करण्यात आले होते. या सर्वात आता एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्याचे परिणाम एवढे झाले आहेत की काही चित्रपट कलाकारांनीही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. (S.N. Subrahmanyam)
मात्र या वक्तव्याकडे वेगळ्या अर्थानं बघितले गेल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात येत आहे. देशाला विकसित करण्यासाठी तरुणांच्या योगदानाची मोठी गरज आहे, याच उद्देशातून सुब्रह्मण्यम बोलल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्वतः सुब्रह्मण्यम हे कोणतीही सुट्टी घेत नाहीत. ते स्वतः रविवारीही काम करतात. यासाठी ते चीनी लोकांचे उदाहरण देतात. चीनी नागरिक आठवड्यातून 90 तास काम करतात. त्यामुळेच या देशाची प्रगती झाली असल्याचेही सुब्रह्मण्यम यांचे म्हणणे आहे. अर्थातच सुब्रह्मण्यम यांचा कुठलाही दावा असला तरी त्यांनी हा मुद्दा पटवण्यासाठी जे वक्तव्य केले त्यावरच वाद अधिक वाढला आहे. कारण आठवड्याला 90 तास काम केले पाहिजे, हे सांगतांना त्यांनी रविवारी घरी बसून काय करता, कुटुंबासोबत वेळ घालवण्यापेक्षा आणि बायकोचा चेहरा बघण्यापेक्षा ऑफिसला पोहोचा आणि कामाला सुरुवात करा, असे वक्त्यव्य केले. यामुळे सुब्रह्मण्यम यांनी महिलांची अवहेलना केल्याचा दावा करण्यात येत आहे. अभिनेत्री दिपिका पाडुकोण हिनं हे महिलाविऱोधी वक्तव्य असल्याचे सांगून याचा निषेध केला आहे. (Latest Updates)
================
हे देखील वाचा : Steve Jobs : स्टीव्ह जॉब्सची बायको कुंभ मेळ्यात…
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
त्यानंतर सुब्रह्मण्यम यांनी माघार घेतली असली तरी सोशल मिडियावर तुम्ही किती तास काम करता, या चर्चांना उधाण आले आहे. कंपनीमध्ये कर्मचा-यांनी जास्तीच जास्त काम करुन कंपनीची आणि मग देशाची उन्नती करावी हा उद्देश असणे स्वाभाविक आहे. मात्र त्यासोबत त्या कर्मचा-याचे कौटुंबिक आयुष्यही जपणे गरजेचे आहे. ज्या चीनची उदाहरणे देण्यात येतात, त्या चीनमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दडपणामुळे तरुणांमध्ये उदासीनता वाढत असल्याचा अहवाल आहे. हे तरुण समाजापासून दूर जात असून कार्यालयीन कामकाजामुळे अनेकांनी लग्नही टाळली आहेत. तर ज्यांची लग्न झाली आहेत, त्यांनी मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाचे हे दुसरे रुप आता चीनमध्ये दिसून येत आहे. याचाही सुब्रह्मण्यम यांनी विचार करावा असा सल्ला आता त्यांना सोशल मिडियाच्या मार्फत देण्यात येत आहे. (S.N. Subrahmanyam)
सई बने