जन-गण-मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता! हे भारताचं राष्ट्रगीत (National Anthem) प्रत्येकाला माहिती आहे. तरी वंदे मातरम आणि जन-गण-मन यामध्ये भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं याबद्दल बरेच जण गोंधळत असतात. तो विषय वेगळा आहे. पण जन-गण-मन या गीतामुळेच शाळेच्या पहिल्या वर्गापासूनच देशप्रेमाचं बाळकडू आपल्याला मिळालेलं आहे.
कुठेही राष्ट्रगीत सुरू असेल, तर आपण दक्ष होऊन सावधान उभे राहतो. पण आता याच आपल्या राष्ट्रगीतावरुन एका नव्या वादला तोंड फुटलं आहे. रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज (George V) याच्या स्तुतीसाठी जन-गण-मन हे गीत लिहिलं होतं, असं विधान महंत रामगिरी महाराज यांनी केलं आहे. मात्र, असं म्हणणारे रामगिरी महाराज पहिले नाहीत, याआधी सुद्धा असं म्हटलं गेलं होतं. आपण लहानपणापासून ज्याला राष्ट्रगीत म्हणत आहोत ते रवींद्रनाथ टागोर यांनी एका ब्रिटीश राजाची स्तुति करण्यासाठी लिहिलं होतं का ? या मागचं सत्य काय आहे? जाणून घेऊ.
रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज याच्या स्तुतीसाठी जन-गण-मन लिहिलं होतं, आणि याच स्तुतीसाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. असं महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांचं म्हणण आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जन-गण-मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता! या गीतातील भारत भाग्य विधाता या ओळीचा अर्थ जॉर्ज पंचम हा भारताचा भाग्यविधाता आहे, असा आहे. १९३० साली सुद्धा असाच वाद निर्माण झाला होता. जॉर्ज पंचम याची स्तुती करण्यासाठी हे गीत लिहिलं गेलं आहे, असं तेव्हाही म्हटलं गेलं होतं.
या मागचं सत्य शोधण्यासाठी हे गीत का लिहिलं गेलं, ते पाहूया, १९११ साली ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम आणि त्याची राणी मेरी भारतात येणार होते. दिल्ली दरबारात त्यांच्या स्वागतासाठी या राजाच्या सन्मानार्थ एक गीत लिहिण्याची विनंती काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे केली. आणि त्यांनी एक गीत लिहिलं ही, ते गीत म्हणजेच जन गण मन. पण म्हणजेच जॉर्ज पंचम याच्या सन्मानार्थच हे गीत होतं का?
तर नाही, मुळात ही विनंती रवींद्रनाथ टागोर यांनाच करण्यात आली कारण या अधिकाऱ्यांमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा मित्र होता. जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून अशी विनंती करण्यात आली आणि त्यांनी हे गीत लिहिलं, त्यानंतर यासंदर्भात त्यांनी एक पत्र त्यांचा मित्र पी.बी. सेन यांना लिहिलं. या पत्रात ते म्हटले होते की, “राजाच्या सेवेत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, जो माझा मित्रही होता, मला सम्राटाच्या सन्मानार्थ एक गीत लिहिण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून मी अगदी थक्क झालो. या गोष्टीने माझ्या मनात मोठी खळबळ निर्माण केली. या मानसिक गोंधळातून, मी ‘जन गण मन’ मध्ये भारताच्या त्या ‘भाग्यविधाता’चा जयघोष केला, ज्याने युगानुयुगे भारताच्या रथाचे लगाम स्थिर ठेवले आहेत. उतार-चढावांतून, सरळ आणि वाकड्या मार्गांमधून. तो ‘भाग्याचा अधिपती’, तो ‘भारताच्या सामूहिक विचारांचा वाचक’, तो ‘शाश्वत मार्गदर्शक’ कधीही जॉर्ज पाचवा, जॉर्ज सहावा किंवा इतर कोणताही जॉर्ज असू शकत नाही. माझ्या त्या अधिकारी मित्रालाही या गाण्याबद्दल हे समजलं आहे. त्याला जरी राजसत्तेची फारच प्रशंसा वाटत असली, तरी त्याच्याकडे common sense ची कमी नाही.”
थोडक्यात या पत्रातून रवींद्रनाथ टागोरांनी हे स्पष्ट केलं की, त्यांनी कुठल्याही ब्रिटिश राजाचा सन्मान करण्यासाठी हे गीत लिहिलं नव्हतं. हे गीत लिहिल्यानंतर १९११ सालीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता (Kolkata) अधिवेशनात सादर करण्यात आलं. त्याच दिवशी जॉर्ज पंचमच्या स्तुतीसाठी आणखी एक गीत या अधिवेशनात गायलं गेलं होतं. ते म्हणजे रामानुज चौधरी यांचं ‘जुग जवो मेरा पातशहा’ हे गीत ! मग झालं काय काही माध्यमांनी चुकीची माहिती दिली आणि गोंधळ उडाला. याचं misunderstanding मुळे जो आज वाद आहे तो निर्माण झाला. मुळात जन गन मन हे गीत टागोरांनी पंचमच्या येणाच्या खूप आधीच रचलं होत.
रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत कोणत्याही ब्रिटिश राजाच्या स्तुतीसाठी निर्माण केलं नव्हतं याचा आणखी एक पुरावा म्हणजे, टागोर यांना त्यांच्या हयातीत अनेकदा विचारण्यात आले की “जन गण मन” हे सम्राटाच्या स्तुतीसाठी लिहिले आहे का? त्यावर ते नेहमी म्हणायचे’ “जर कोणी मला इतका मूर्ख समजत असेल की मी जॉर्ज चतुर्थ किंवा जॉर्ज पाचवा यांची मानवजातीच्या अजरामर इतिहासातील अधिनायक आणि शाश्वत सारथी’ म्हणून स्तुती करीन, तर अशा लोकांना उत्तर देणं म्हणजे माझाच अपमान करणं होईल.”
त्याशिवाय आणखी एक पुरावा म्हणजे आपण राष्ट्रगीत म्हणून जन गण मन या गीताच्या काही ओळीच गातो. पूर्ण गीत जर तुम्ही वाचाल तर या गीताच्या एका कडव्यामध्ये स्नेहमयी तुमि माता। अशी एक ओळं येते. आता माता हे संबोधन कोणत्या राजासाठी तर वापरलं गेलं नसेल. एकूणच या सर्व गोष्टींवरुन हे स्पष्ट आहे की, हे गीत कोणाचीही स्तुति करण्यासाठी नाही तर भारतासाठी आणि भारतीय जनतेसाठी लिहिलं गेलं होतं. अजून एक गोष्ट म्हणजे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगच्या म्हणण्यानुसार राजा पंचमने बंगालचं विभाजन रद्द केलं होत, म्हणून त्यांनी या गीताच्या माध्यमातून आणि खास बंगाली भाषेतून त्याची प्रशंसा केली होती.
अनेकदा असंही म्हटलं जात की, टागोर हे नाव त्यांना ब्रिटिशांनी दिल होत किंवा तो त्यांचा ACCENT होता म्हणून वापरलं गेलं. पण मुळात टागोर हा ठाकूरचाच अपभ्रंश आहे. जर मराठीमध्येच पहायचं झालं, तर आपल्या इथे चहमानचे चव्हाण झाले. परमारचे पवार झाले, कदंब यांचे कदम झाले, यादवांचे जाधव झाले. राणाचे राणे झाले, मौर्यांचे मोरे झाले, तसेच हे ठाकूर पासून टागोर झाले. हा प्रॉब्लेम कोणत्याही ब्रिटीश ACCENT चा नाही तर बंगाली बोलीचासुद्धा आहे.
================
हे देखील वाचा : George Soros : सोरोस खरचं प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमसाठी पात्र होता का ?
================
Subhas Chandra Bose यांनी सिंगापूरमध्ये स्थापन केलेल्या आणि घोषित केलेल्या आझाद हिंद सरकारच्या महिला मंत्रालयाच्या मंत्री कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना जन गण मन’ गाणं खूप आवडत होतं. त्यांनी हे गाणं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये ऐकलं होतं. 1941 साली इंडियन नॅशनल आर्मीच्या महिला युनिटच्या सभेत त्यांनी सर्वांसोबत हे गाणं गायलं. या सभेला नेते सुभाषचंद्र बोस हजर होते. आणि हे गाणं त्यांना इतकं आवडलं की त्यांनी ‘जन गण मन’ ला 2 नोव्हेंबर 1941 रोजी इंडियन नॅशनल आर्मीचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं.
पुढे या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी भारताचं अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मते, ‘जन गण मन’ हेच ते गाणं आहे, जे आपल्या शब्दांद्वारे भारताच्या भाषिक, धार्मिक, आणि प्रांतीय विविधतेला एकत्र बांधण्याचं काम करतं. या गाण्याचे बोल प्रत्येक भारतीयाला एकमेकांशी जोडण्याचं कार्य करतात. त्यामुळे जन गण मन हे कोणच्या स्तुतिसाठी लिहिलं होतं का? या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे. याशिवाय ज्या टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडावर सर ही पदवी परत केली होती, त्यांच्या देशभक्तीवर शंका का घ्यावी, असा प्रश्नदेखील उपस्थित होतो. तरीही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.